मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाला (Mumbai zoo) जगभरातून अनेक पर्यटक भेटी देतात. प्राणीसंग्रहालयातील (Mumbai zoo) प्राण्यांमध्येच रममान होणार्या पर्यटकांचे तेथील संपन्न वृक्षसंपदेच्या वारश्याकडे सहज दुर्लक्ष होते. येथील समृद्ध वनस्पतींचे महत्त्व, ऐतिहासिक स्थान याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. ८ एप्रिल रोजी असलेल्या ‘झू लव्हर्स डे’ निमित्त वनस्पती अभ्यासक सई गिरधारी यांच्याशी साधलेला हा संवाद...
१) मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले (Mumbai zoo) वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीची बाग. पर्यावरणीय आणि इतर अंगांनी मुंबईच्या दृष्टीने या बागेचे काय महत्त्व सांगता येईल?
आपल्याला माहिती आहे की, मुंबईत मुळातच जागेची कमतरता असल्यामुळे खुल्या जागांची उपलब्धता ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. खुल्या जागांमध्ये केवळ मैदानेच येत नाहीत, तर त्यामध्ये उद्याने, राष्ट्रीय उद्याने, बाग यांचा समावेश होतो. मध्यवर्ती भागात वसलेले असले तरीही पर्यावरणीय, जैवविविधतेच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वारसा असलेले हे उद्यान आहे. ५० एकरांपेक्षा अधिक परिसरात पसरलेल्या या उद्यानामध्ये अनेक झाडे, मोठी वृक्षे, झुडूपे, गवतांचे प्रकार यांचा समावेश आहे. त्यामुळेच, प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरणार्या या परिसराला मुंबईचं हरित फुफ्फूस समजले जाते. तसेच, तापमानाचा समतोल राखण्यासाठी मुंबईतील या हरित पट्ट्याचा चांगला उपयोग होतो. याशिवाय अतिशय जुने आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या राणीच्या बागेला अनेक पर्यटक भेटी देत असल्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये ही उद्यान महत्त्वाची भूमिका बजावते.
२) राणीच्या बागेमध्ये (Mumbai zoo) गेली अनेक वर्षे तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने भेट देत असता. हे उद्यान कसे बदलत आणि विकसित होत गेलंय?
राणीची बाग (Mumbai zoo) ही मुळात पूर्वीपासून वनस्पती उद्यान होते. समृद्ध वनस्पती वैविध्याबरोबरच मनोरंजन किंवा विरंगुळ्याच्या दृष्टिकोनातून इथे हळूहळू प्राणी आणले गेले आणि कालांतराने या उद्यानाचे प्राणिसंग्रहालय (Mumbai zoo) झाले. पण, प्राणिसंग्रहालयामुळे मूळच्या वनस्पती उद्यानाचे महत्त्व कमी झालेले पाहायला मिळते. पर्यटक प्राणी पाहायला येतात. पण कधीही वनस्पती पाहताना, झाडांचे निरीक्षण करताना पाहायला मिळत नाहीत. वनस्पतींचे समृद्ध वैभव असतानाही त्या मात्र दुर्लक्षित राहिलेल्या पाहायला मिळतात. पूर्वीच्या काही सर्व्हेंचा आधार घेतला, तर वनस्पतींच्या प्रजाती कमी झाल्याचं दिसतं. प्राण्यांच्या एक्झिबिट्सची ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे झाडांना असलेली जागा कमी कमी होत चालली आहे. प्राणिसंग्रहालयाचा जरी उत्तम विकास झाला असला तरीही वनस्पतींच्या दृष्टीने ही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते.
३) या वनस्पती उद्यानामध्ये (Mumbai zoo) एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या वृक्षसंपदेचे निरीक्षण करणे हा एक सुंदर अनुभव असतो. सामान्य पर्यटकाने ऋतूनुसार याचा कसा विचार करायला हवा?
वनस्पती उद्यानामध्ये रचना करतानाच सुंदर फुले असणार्या प्रजातींची विशिष्ट दर्शनी भागात लागवड तर काही झाडांची इतर ठिकाणांवर लागवड करण्यात आली आहे. अनेक प्रजाती असल्यामुळे काही फुले विशिष्ट ऋतूमध्ये फुलतात.तसेच, काही विशिष्ट वेळी फळे धरतात. काही वेळेला पानांचा आकार आणि रंगामध्येही फरक असलेला पाहायला मिळतो. यामध्ये बरेच जुने असलेल्या बाओबाब अर्थात गोरखचिंचेच्या झाडाला भर उन्हाळ्यात साधारण मे महिन्यामध्ये फुले येतात. ‘गेस्ट ट्री’ नावाच्या एका विदेशी प्रजातीच्या झाडाला ही फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान गुलाबी फुले धरतात, तर स्वदेशी प्रजातींमधील अमलताश, ताह्मण, गणेरी, नागकेसर अशा सुरेख फुलांच्या ही बहरण्याचा हा काळ आहे. लाल चुटूक, काही गुलाबी, काही शुभ्र पांढरी तर काही पिवळी अशी विविधरंगी फुले आत्ता पर्यटकांना पाहायला मिळू शकतात. तसेच काही ठिकाणी असलेली जंगली बदामाची झाडे ही दिसायला सरळसोट उंच वाढणारी आणि फेब्रुवारी- मार्च महिन्याच्या दरम्यान लाल रंगाची छोटी फुले धरतात. या फुलांचा सुंदर वास परिसरात दरवळतानाही अनुभवायला मिळतो.
४) उद्यानामध्ये (Mumbai zoo) अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडेसुद्धा आहेत. तसेच, वर्ल्ड हेरिटेजचं मानांकन असलेली ही काही झाडे आहेत. ही झाडे कोणती आणि त्यांना हे मानांकन का मिळाले त्याबद्दल काय सांगता येईल?
उद्यानामध्ये 256 प्रजातींची एकूण दोन हजारांहून अधिक झाडे असत्तित्वात आहेत, तर जगभरातील सहा खंडातील झाडे ही राणीच्या बागेमध्ये लावण्यात आलेली आहेत. पळस हा वृक्ष मुंबईसाठी दुर्मीळ आहे. जो अनेकांना राणीच्या बागेत बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर निवर, कौशी अशा अनेक प्रजातींचा यात समावेश आहे. राणी बागेत असलेले 150 वर्षांहून अधिक जुने बाओबाब (गोरखचिंच) हे झाड परदेशातून आणलेले आहे. त्याचबरोबर, नागकेसर, सीताअशोक (संकटग्रस्त प्रजात), उर्वशी, कॅनन बॉल अशा झाडांचा ही ङ्मात समावेश आहे. बाओबाब, लेमन सेंटेड गम अरेबिक आणि काजूपूत अशा झाडांचा समावेश आहे. लेमन सेंटेड गम अरेबिक आणि काजूपूत ही दोन्ही झाडे निलगिरी सारखी दिसणारी असून ती दोन्ही ऑस्ट्रेलियामधून आणण्यात आलेली आहेत. या तिन्ही प्रजातीच्या झाडांना हेरिटेज दर्जा देण्यात आलेला आहे.
५) वेगवेगळ्या ६ खंडांमधून तसेच भारताबाहेरील काही देशांमधून ब्रिटिशांच्या काळात अनेक झाडे इथे आणण्यात आली. पण, प्रत्येक खंडांतील वातावरणामध्ये फरक असल्यामुळे त्यांचा अधिवास सोडून ही झाडे भारतात तग कशी धरू शकली?
इतिहासाच्या विचार केला, तर ब्रिटिशांना जगभरातील उत्तम आणि सुंदर वस्तूंचा संग्रह करून ठेवण्याची आवड होती हे आपल्याला दिसतंच. त्यामुळे अगदी पर्ङ्मावरणाच्या किंवा तत्सम कोणत्याही हेतूमधून ही झाडे त्याकाळी आणली गेल्याची शक्यता तशी कमीच. पण, अनेक आणलेल्या झाडांपैकी काही झाडांनी इथल्या वातावरणाशी जुळवून घेत या अधिवासामध्ये तग धरली असेच म्हणावे लागेल. बागेत असलेली झाडं दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अशा भारतासारखं वातावरण असलेल्या प्रांतातून आणली गेली, म्हणून ती आजपर्यंत तग धरुन आहेत आणि आपल्या वातावरणात रुळली आहेत.
६) प्राण्यांच्या एक्झिबिटमध्ये त्यांना राहता यावे, यासाठी विशिष्ट रचनेचा विचार केला जातो. वन्य अधिवासाची निर्मिती करताना झाडांची निवड कशी केली जाते?
एखाद्या प्राण्याच्या पिंजर्याचा विचार केला, तर सर्वप्रथम त्याच्या अधिवासाचा विचार केला जातो. तो प्राणी मुलतः ज्या अधिवासात राहतो साधारण तो अधिवास देण्याचा प्रयत्न केला जातो. बिबट्याचे उदाहरण घेतले, तर पर्णझडी जंगलांमध्ये असलेली झाडे त्या पिंजर्यात लावण्यात येतात. ज्या अधिवासात बिबट्या सामान्यतः आढळतो. झाडांचा विचार योग्य पद्धतीने केला जातो. पण, त्याखाली असणार्या गवताळ भागाचा विचार फारसा होताना दिसत नाही. प्राणिसंग्रहालयात पर्यटकांच्या दृष्टीने छान दिसावे या हेतूने जे गवत लावले जाते ते प्रदेशनिष्ठ नसून एक्झॉटिक असलेले पाहायला मिळते. कारण, अनेकदा सामान्यांच्या मनामध्ये हिरवळ दिसली म्हणजे जंगल आहे अशी धारणा असते. या धारणेला छेद देत वन्य प्राण्यांचा मूळ अधिवास दृष्टिक्षेपात आणणे ही तितकंच गरजेचे आहे. तरीही इतर प्राणिसंग्रहालयांचा विचार केला, तर राणी बागेमध्ये पिंजर्यातील अधिवासांचा, तेथील झाडांचा अधिक विचार झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
७) अनेकदा राणीच्या बागेमध्ये गेल्यानंतर प्राण्यांच्या विशेषतः वाघाचे पिंजरे आणि पेंग्विन जवळ पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. पण, वनस्पती किंवा झाडांचे निरीक्षण करणारे सहसा कोणी दिसत नाही. एकूणच सामान्यांचा या विषयातील रस वाढावा, या दृष्टीने काही उपक्रम केले जातात का? यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत?
हे अगदी खरंय. झाडांच्या सावलीत विसावलेले पर्यटक पाहायला मिळतात, पण झाडांचे निरीक्षण करणारे नाही. त्यामुळे, झाडांचे महत्त्व सामान्यांना समजावून देण्याची नितांत गरज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काही संस्थांच्या माध्यमातून नेचर ट्रेल्स, ट्री वॉक अशा गोष्टी आयोजित केल्या जात आहेत. मात्र, त्याची संख्या वाढण्याची गरज आहे. मी ही मागील दोन वर्षांपासून तिथे ट्री वॉक घेते. उद्यानातील प्रशासकांनी तसेच संस्थांनी एकत्र येत वेगवेगळे उपक्रम घ्यायला हवेत. तसेच ट्रेल्स आयोजित करायला हव्यात. त्याचबरोबर काही ठरावीक झाडांवरच नावाच्या किंवा माहितीच्या पाट्या लावलेल्या दिसतात. पण, ते सर्व झाडांवर असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व झाडांवर पाट्या लावणे शक्य होत नसले तरी किमान दुर्मिळ आणि महत्त्वाच्या झाडांवर पाट्या लावायला हव्यात. जेणेकरून जनजागृतीच्या दृष्टीने त्याचा फायदाच होईल. लोकसहभाग वाढविण्यासाठी उपक्रम करायला हवेत. प्राणिसंग्रहालयाचेच नाही, तर त्याबरोबरीने तेथील वृक्षसंपदेवर ही लक्ष देऊन त्याचे ’ग्लॅमर’ वाढवायला हवे, म्हणजे वनस्पतीशास्त्राची सामान्यांना गोडी लागेल.