चिपळूण - शाळकरी मुलांनी टिपले गावातील दुर्मीळ वन्यजीव; 'कॅमेरा ट्रॅपिंग'चा अवलंब

06 Apr 2024 00:17:19
chiplun wildlife


मुंबई (अक्षय मांडवकर) :
वन्यजीव संशोधनामधील ’कॅमेरा ट्रॅपिंग’सारख्या अत्याधुनिक तंत्राची कास धरत चिपळूणमधील (chiplun wildlife) शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या गावांमधील वन्यजीवांची नोंद केली आहे. ’सह्याद्री निसर्ग मित्र-चिपळूण’ यांनी ’डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लि.’ कंपनीच्या सहकार्याने राबवलेल्या ’ई-बायोडायव्हर्सिटी’ प्रकल्पाअंतर्गत मुलांनी आपल्या गावातील जैवविविधतेची नोंद केली (chiplun wildlife). ’कॅमेरा ट्रॅपिंग’च्या माध्यमातून या मुलांनी त्यांच्या आसपासच्या परिसरात वावरणारे पाणमांजर, पिसूरी हरिण, बिबटे, कोल्हे आणि मगरींसारख्या अनेक वन्य प्राण्यांची छायाचित्रे टिपली आहेत. (chiplun wildlife)

ग्रामीण भागातील शाळकरी मुलांना निसर्ग आणि वन्यजीवांसंबंधीचे पारंपरिक ज्ञान अवगत असते. या ज्ञानाला आधुनिकतेची जोड देऊन त्यांचा जैवविविधतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी ’सह्याद्री निसर्ग मित्र-चिपळूण’ या संस्थेने विशेष प्रयत्न केले. ’डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लि.’ कंपनीच्या आर्थिक सहकार्याने संस्थेने चिपळूण तालुक्यात ’ई-बायोडायव्हर्सिटी’ हा प्रकल्प राबवला. गेल्या वर्षभर राबवलेल्या या प्रकल्पात करंबवणे आणि धामणंद गावातील दोन शाळांमधील 65 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रकल्पांतर्गत सर्वप्रथम संस्थेने विद्यार्थ्यांना जंगलात नेऊन ’कॅमेरा ट्रॅपिंग’चे प्रशिक्षण दिले. कॅमेरा ट्रॅप यंत्र, दुर्बीण, त्यासंबंधीची पुस्तके, छायाचित्र साठवण्यासाठी पेन ड्राईव्ह अशी साधनसामुग्री देऊ केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जंगलात जाऊन वन्यजीवांच्या वावराच्या जागा हेरून त्याठिकाणी कॅमेरे बसवले. या माध्यमातून टिपलेली छायाचित्र त्यांनी गोळा केली आणि आपल्या गावातील जैवविविधतेची नोंद केली.


करंबवणे हे गाव खाडीनजीक आहे. त्यामुळे येथील ’न्यू इंग्लिश स्कूल’मधील विद्यार्थ्यांनी खाजण क्षेत्रात कॅमेरा बसवले होते. या विद्यार्थ्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन खाजणात आढळणार्‍या वन्यजीवांच्या वावरण्याच्या जागा हेरल्या आणि त्याठिकाणी कॅमेरे बसवल्याची माहिती ’सह्याद्री निसर्ग मित्र’चे प्रकल्प अधिकारी सोहम घोरपडे यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना बिबट्या, सोनेरी कोल्हा आणि मगरीसारखे प्राणी कॅमेर्‍यात टिपण्यात यश मिळाले. पाणमांजरासारखे बुजरे प्राणीदेखील या विद्यार्थ्यांनी अचूक जागा हेरल्याने कॅमेर्‍यात टिपले गेले, तर सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याच्या क्षेत्रात असलेल्या धामणंद गावातही विद्यार्थ्यांनी ’कॅमेरा ट्रॅपिंग’ केले. येथील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या कॅमेर्‍यात बिबट्यासह मुंगूस, लंगूर आणि काही पक्षी टिपले गेले. पिसूरी हरिणासारखा लाजाळू आणि सहज न दिसणारा प्राणीदेखील याठिकाणी कॅमेर्‍यात टिपला गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वन्यजीव संशोधनाविषयीची प्राथमिक माहिती मिळाली असून आपल्या आसपास असलेल्या जैवविविधतेची जाणीवदेखील झाली आहे.


उपक्रम राबवण्याची गरज
विद्यार्थ्यांनी टिपलेली ही छायाचित्रे संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे. या छायाचित्रांसह सर्व माहिती ही ‘सह्याद्री निसर्ग मित्र-चिपळूण’च्या संकेतस्थळावर आम्ही लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. वन्यजीवांकडे संवर्धनाच्या अनुषंगाने पाहण्याचा दृष्टिकोन ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी, अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्याची गरज आहे. - भाऊ काटदरे, संचालक, सह्याद्री निसर्ग मित्र


प्राण्यांचा अभ्यास करायला आवडेल
मी सह्याद्री निसर्ग मित्रच्या इ-बायोडायव्हर्सिटी प्रकल्पात सहभाग घेऊन शाळेजवळच्या जंगलात कॅमेरे लावले. या कॅमेर्‍यात टिपलेल्या छायाचित्रावरुन आम्ही प्राण्यांची नोंद केली. आमच्या गावात बिबट्या येतो हे ऐकून माहीत होते, पण चक्क आमच्या कॅमेर्‍यात बिबट्या बघून आश्चर्य वाटले. साळिंदर, पिसूरी हरीण, काळमांजर असे खूप नवीन प्राणी आम्हाला छायाचित्रांच्या आधारे पहायला मिळाले आणि शाळेत त्यांच्याबाबत माहिती देखील मिळाली. पुढच्या वर्षी सुद्धा असाच प्राण्यांचा अभ्यास करायला आवडेल. - दिव्या जंगम, विद्यार्थी: यशवंत विद्यालय, धामणंद


Powered By Sangraha 9.0