मुलांचे जन्म प्रमाणपत्र काढताय तर नवी अट जाणून घ्या!
05-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : आता मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात पालकांच्या नावासह दोघांच्या धर्माचीही माहिती द्यावी लागणार आहे. केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून मुलाच्या आई आणि वडील दोघांनाही धर्माची माहिती देणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेल्या नव्या नियमांनुसार, आता मुलाच्या जन्माची नोंदणी करताना मुलाचे वडील आणि आई दोघांनाही स्वतंत्रपणे त्यांच्या धर्मात प्रवेश करावा लागेल, असे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जन्म प्रमाणपत्र नोंदणीबाबत नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. या ड्राफ्टनुसार, आता पालकांना त्यांचा धर्म सांगावा लागेल, तरच मुलाच्या जन्माची नोंद होईल. तसेच, द हिंदू अहवालानुसार, प्रस्तावित “फॉर्म क्रमांक १-जन्म अहवाल” मध्ये मुलाच्या “धर्मासाठी” पर्याय निवडण्याची आवश्यकता असलेला स्तंभ आता “वडिलांचा धर्म” आणि “आईचा धर्म” समाविष्ट करण्यासाठी विस्तारित केला जाईल.
केंद्रीय गृह मंत्रालयाने तयार केलेल्या नियमांनुसार आता मुलाच्या जन्माची नोंदणी करताना मुलाचे वडील आणि आई या दोघांच्या धर्माची माहिती देणे आवश्यक असणार आहे. हे नियम राज्य सरकारांनी अद्याप अधिसूचित केलेले नाहीत. मूल दत्तक घेण्याच्या बाबतीतही हा नियम लागू असेल, ज्यामध्ये मूल दत्तक घेणाऱ्या दोन्ही पालकांच्या धर्माचा उल्लेख करणे आवश्यक असेल. सदर प्रक्रिया मोदी सरकारने जन्म प्रमाणपत्र बनविण्याकरिता तयार केली आहे.
दरम्यान, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी संसदेत जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा मंजूर करण्यात आला होता. ज्यामध्ये जन्म आणि मृत्यूशी संबंधित डेटाबेस राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याचा उपयोग राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासोबतच मतदार यादी तयार करणे, आधार, रेशनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मालमत्ता नोंदणी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी याचा वापर केला जाणार आहे.