मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतातील कोळ्यांच्या कुळात आणखी एका कुळाची भर पडली आहे. राज्यातील संशोधकांनी कोळ्यांच्या 'मेडमास्सा' नामक नव्या कुळाचा शोध लावला आहे. या कुळाबरोबरच 'मेडमास्सा सॅगॅक्स' आणि 'मेडमास्सा पोस्टीका' अशा दोन नव्या प्रजातींचा देखील शोध लावण्यात आला आहे. शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी या शोधासंबंधीचा संशोधन अहवाल 'झूटॅक्सा' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला.
कोळ्यांचे 'मेडमास्सा' हे कुळ १८८७ साली पहिल्यांदा नोंदविण्यात आले होते. कोळ्यांच्या 'कोरिनिडे' या वर्गात 'मेडमास्सा' कुळाची यापूर्वी नोंद नव्हती. या नव्या संशोधनामधून भारतातून प्रथमच 'मेडमास्सा' कुळातील कोळ्यांची प्रजात नोंदविण्यात आली असून भारतात आढळणाऱ्या एकूण कोरिनिडे कोळ्यांच्या कुळाची संख्या आता आठवर गेली आहे. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती वेगाने धावणाऱ्या आणि निशाचर आहेत. हे शिकारी कोळी सामान्यतः झाडांच्या खोडांवर आणि खडकांवर आढळतात. त्यांचा निवारा हा निसर्गाशी अनुकूलित असतो. जेणे करून भक्ष्य सहज मिळेल तसेच शिकार होण्यापासून त्या वाचतील. त्यांचा निवारा छदमवेष प्रकारचा असल्याने त्यांना शोधणे फार कठीण असते. मात्र, रात्रीच्या वेळेस ते निवाऱ्याच्या आसपास शिकारीसाठी निघतात. त्यावेळी ते नजरेस पडू शकतात. या कुळातील नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती पश्चिम घाटातून नोंदविण्यात आल्या असून केरळ मधील मुंडकायाम वरून 'मेडमास्सा सॅगॅक्स' आणि तमिळनाडूतील कन्याकुमारी मधून 'मेडमास्सा पोस्टीका' ही प्रजात शोधण्यात आली आहे. संशोधक गौतम कदम, ऋषिकेश त्रिपाठी आणि प्रदिप संकरन यांनी हे संशोधन केले आहे.
आणखी प्रजाती मिळण्याची दाट शक्यता...
संशोधन करताना या कुळातील इतर प्रजातींचे नमुनेही गोळा करण्यात आले होते. यातील काही नमुन्यांविषयीची माहिती ‘iNaturalist’ सारख्या काही संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात आली होती. दोन नव्या प्रजातींचा शोध आणि इतर निष्कर्ष पाहता या कुळामध्ये आढळणारी विविधता अधिक असण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी अधिक संशोधन आणि सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे.
"भारतात कोळ्यावर सखोल संशोधन आणि संवर्धन होण्याची फार गरज आहे. कोळ्यांच्या अनेक प्रजाती त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी एकरूप होऊन निसर्गात छदमवेष (camaouflage) पद्धतीने राहतात. ते बहुतेक वेळा त्याच ठिकाणच्या पर्यावरणाशी अवलंबून असतात. अनेक प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. अशा प्रजातींची नोंद करणे फार गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या, खाणकाम, रस्ते, विदेशी झाडे आणि वाढणारी शेती यांमुळे अशा प्रजाती नष्ट होण्याचा अधिक धोका आहे."
- गौतम कदम,
संशोधक