प्रत्येक निवडणुकीला एक मुद्दा लागतो. या निवडणुकीचा मुद्दा भ्रष्टाचारमुक्त भारत हा होईल का? केजरीवालांच्या अटकेमुळे त्यांच्या मद्य घोटाळ्याची चर्चा २४ तास वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू असते. वेगवेगळ्या वाहिन्या नवनवीन किस्से सांगतात. त्यातले खरे किती, खोटे किती, याचा निवाडा करणे कठीण आहे; परंतु केजरीवाल आणि भ्रष्टाचार हा मुद्दा रंगत चालला आहे. काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाजूने उभी आहे.
'पक्ष कार्यकर्त्यांमधे प्रचंड निराशा आहे. सैद्धांतिक आघाडीवर देखील गोंधळ आहे. काँग्रेस स्वतःला ’सेक्युलर’ पक्ष समजतो. महात्मा गांधीजी सर्वधर्मसमभाव यावर विश्वास ठेवून होते. ’नेहरुविअन सेक्युलॅरिझम’मध्ये धर्माला नाकारले गेले. गांधींजींनी धर्म नाकारला नव्हता. ’नेहरुविअन’ विचाधारेचा अंत झाला आहे, ही गोष्ट स्वीकारायला, आजची काँग्रेस तयार नाही. प्रत्येक विचारधारेचा एक कालखंड असतो. १९१७ साली कम्युनिस्ट विचारधारेवर आधारित रशियात क्रांती झाली. त्या विचारधारेचा बोलबाला झाला. १९९० साली ही विचारधारा कोसळली.आता संपूर्ण भारत धर्ममय झालेला आहे. अयोध्येत रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती. त्याचे निमंत्रण सर्वांना होते. हा कार्यक्रम भाजपचा आहे, असे म्हणून काँग्रेसने हे निमंत्रण नाकारले. आज संपूर्ण भारत धर्ममय झालेला आहे. पूर्वी एखादा उद्योगपती किंवा समाजातील मोठी व्यक्ती लपून मंदिरात जात असे. आता तो गर्वाने मंदिरात जातो. सैद्धांतिकदृष्ट्या आणि संघटनात्मकदृष्ट्या काँग्रेसची स्थिती गोंधळाची आहे. वास्तवाशी काँग्रेसचा संबंध राहिलेला नाही. अर्ध्याहून अधिक नेते कालबाह्य झाले आहेत, त्यांना दूर केले पाहिजे.”
ही सगळी वाक्ये टीकाकाराची नाहीत किंवा काँग्रेसला चार समजुतीचे शब्द सांगणार्या तटस्थ, राजकीय विश्लेषकाची नाहीत. संजय निरूपम यांनी दिलेला हा घरचा आहेर आहे. एका दृष्टीने विचार केला, तर संजय निरूपम यांच्या उपरतीला फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. पूर्वी ते शिवसेनेत होते. बाळासाहेबांनी त्यांना दोनदा राज्यसभेवर पाठविले. खासदारकीची चटक लागलेले संजय निरूपम काँग्रेसमध्ये पळाले. एकदा निवडूनही आले. खासदार झाले. टोपी बदलणार्याच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नसते.असे असले तरी कोणते ही कारण का असे ना, संजय निरूपम खरे बोलले. काँग्रेसची अवस्था वैचारिक सुकाणू हरवलेल्या गलबतासारखी झालेली आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर सोहळ्याला विरोध करून, आपण हिंदूविरोधी आहोत, हे काँग्रेसने दाखवून दिले. राहुल गांधी यांच्या नावात ‘गांधी’ आहे. हे गांधी म्हणजे महात्मा गांधी होय. महात्मा गांधी रामभक्त गांधी होते. रामराज्य हा त्यांचा आदर्श होता. राहुल हे ‘गांधी’ नसलेले गांधी आहेत. त्यांना रामराज्य नको असून, सोनिया राज्य हवे आहे. दहा वर्षांचे सोनिया राज्य भारताने अनुभवलेले आहे. त्यावर सा. ’विवेक’मध्ये चार लेखांची लेखमाला आहे, ती वाचकांनी वाचावी.
लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आहे. या प्रचाराच्या काळात अनेक जण काँग्रेस सोडून चालले आहेत. सर्वांचे कारण एकच आहे. ते कारण म्हणजे काँग्रेसमध्ये राहिल्याने, राजकीय सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग बंद होतो. ज्यांना सत्तेच्या जवळच राहायचे आहे, ते काँग्रेस सोडून देतात. कोणी भाजपमध्ये जातात, तर कोणी शिंदे सेनेत जातात. त्यांना रोखून धरण्याची शक्ती काँग्रेसमध्ये नाही. नाना पटोले एके काळी भाजपत होते. आज ते काँग्रेसमध्ये आहेत. आणखीन दोन वर्षांनंतर कुठे जातील, हे कोणी सांगू शकत नाही. असा माणूस पक्ष राखू शकत नाही, तो वक्तव्य देऊ शकतो.दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक झाली आहे. ते तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल हे जबरदस्त धूर्त आणि खतरनाक राजकारणी आहेत. ’ईडी’च्या तावडीतून ते लवकर बाहेर पडतील, असे आज तरी दिसत नाही. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस मैदानात उतरली आहे. काँग्रेस दिशाहीन कशी झाली आहे, हे केजरीवाल प्रकरणावरूनच लक्षात येते. केजरीवाल यांचा सर्वात मोठा धोका काँग्रेस पक्षाला आहे. केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा देशाचे पंतप्रधान बनण्याची आहे. म्हणून ते फार सावध खेळ खेळत असतात. भाजपला पर्याय काँग्रेस अशी चर्चादेखील चालते. राहुल गांधी पर्याय याचीदेखील चर्चा चालते. त्याचे कारण असे की, काँग्रेस हा सर्व देशभर पसरलेला पक्ष आहे. त्याचे नाव आणि निशाणी लोकांना माहीत आहे.
मोदींच्या स्थानी येण्याचा सर्वात मोठा अडसर काँग्रेस पक्ष. म्हणून अगोदर काँग्रेस पक्ष नेस्तनाबूत केला पाहिजे. केजरीवाल तसे म्हणत नाहीत. ते म्हणतात की, ”लोकशाही धोक्यात आहे. राज्यघटना धोक्यात आहे, लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे, ही लोकशाहीची हत्या आहे.” मोदींच्या विरोधी लढण्यासाठी, ही विषय सूची चांगली आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. म्हणून ते केजरीवालांची बाजू घेऊन उभे आहेत. केजरीवालांनी दिल्लीतून काँग्रेस संपविली. पंजाबातून संपविली, गोव्यातून संपवण्याचा प्रयत्न केला, राजस्थान हरियाणातूनही काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला; परंतु काँग्रेस आपल्या घमेंडीत जगत आहे.प्रत्येक निवडणुकीला एक मुद्दा लागतो. या निवडणुकीचा मुद्दा भ्रष्टाचारमुक्त भारत हा होईल का? केजरीवालांच्या अटकेमुळे त्यांच्या मद्य घोटाळ्याची चर्चा २४ तास वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालू असते. वेगवेगळ्या वाहिन्या नवनवीन किस्से सांगतात. त्यातले खरे किती, खोटे किती, याचा निवाडा करणे कठीण आहे; परंतु केजरीवाल आणि भ्रष्टाचार हा मुद्दा रंगत चालला आहे. काँग्रेस भ्रष्टाचाराच्या बाजूने उभी आहे.
आणखीन एक मुद्दा आहे. महात्मा गांधीजींनी नशाबंदीचे आंदोलन चालविले. ते मद्यपानाविरुद्ध होते. केजरीवाल मद्य घोटाळ्यात अडकलेले आहेत आणि गांधी हरवलेले राहुल गांधी दारू घोटाळा करणार्या, केजरीवालच्या समर्थनार्थ उभे आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान ते कोणती भाषणे करतील आणि ही भाषणे लोकांना किती आकर्षित करतील, हे काँग्रेसचे नेतेच सांगू शकतील.राजकीय पक्षाला काळानुरूप भूमिका घ्याव्या लागतात. या भूमिका घेताना, मूलभूत सिद्धांताशी एकनिष्ठ राहावे लागते. काँग्रेसची मूलभूत सैद्धांतिक बैठक हे प्राचीन राष्ट्र आहे. त्याची सनातन संस्कृती आहे, सर्वसमावेशकता हा तिचा गुणधर्म आहे, विश्वकल्याण हे तिचे लक्ष्य आहे, या चौकटीवर उभी आहे. ती कशी उभी केली गेली, हे समजून घ्यायचे असेल, तर लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना वाचायला पाहिजे. या चौकटीला काळाच्या संदर्भात मांडता आले पाहिजे. नेहरूंच्या वैचारिक वारशापासून कौशल्याने फारकत घेता आली पाहिजे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची ती क्षमता नाही. डाव्या विचारसरणीच्या सल्लागारांनी दिलेल्या काँग्रेस नेतृत्वाला आपला वारसा समजून घेणेदेखील कठीण आहे.लोकसभेच्या निवडणूक यशापयशाचा विचार जरा बाजूला ठेवून विचार करायचा, तर काँग्रेसने या सनातन वारशाच्या आधारावर उभे राहणे फार आवश्यक आहे. काँग्रेसची ती पक्षीय गरज आहे. लोकशाहीची ती आवश्यक गरज आहे आणि राष्ट्राची ती मूलगामी गरज आहे. आज वर्तमानपत्रात झळकणारी नावे आणि त्यांची बौद्धिक कुवत लक्षात घेता, हे लगेच घडणे फार अवघड आहे. अवघड असले तरी काँग्रेसच्या जीवंत राहण्याचा तोच एक मार्ग आहे, असे माझे मत आहे.