नवी दिल्ली : 'नवा भारत घरात घुसून मारतो हे शत्रूंनाही कळलं' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथे संबोधित करताना केले आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, सैन्याचा अपमान करणे हे काँग्रेसचे प्रारंभापासूनचे धोरण राहिले आहे. मात्र, गेल्या दहा वर्षात सर्जिकल स्ट्राईक आणि एअरस्ट्राईकद्वारे शत्रूच्या घरात घुसून मारण्याचे सामर्थ्य भारताने दाखवून दिले आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना पंतप्रधान मोदींकडून जाहीर सभांचा सपाटा सुरू आहे. त्यांनी आज राजस्थानमधील चुरू येथे जनतेला संबोधित करताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हा पूर्वीचा भारत नसून घरात घुसून मारणारा हा नवा भारत आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने पाकिस्तानमधील हत्यांबाबत वादग्रस्त लेख प्रकाशित केला होता. ‘द गार्डियन’ने हा लेख ‘भारत सरकारने पाकिस्तानमध्ये मारण्याचे आदेश दिले, गुप्तचर अधिकाऱ्यांचा दावा’ या शीर्षकासह प्रकाशित केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल, "जेव्हा आमच्या लष्कराने सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ले केले, तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कोणती भाषा बोलत होते?, तसेच, अहंकारी आघाडीचे लोक आमच्या सैन्याकडून शौर्याचा पुरावा मागत होते. हा अपमान असून सैन्य... देशाची फाळणी... हीच काँग्रेस पक्षाची ओळख आहे. ज्यावेळेस इंडिया आघाडीचे लोक सत्तेत होते, तोपर्यंत त्यांनी आमच्या सैनिकांचे हात बांधले. परंतु, आता आव्हानांना तोंड देणे हीच आमची ताकद आहे.", असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
राजस्थानमधील प्रचार सभेत काँग्रेसने नेहमीच राष्ट्रहितापेक्षा लांगुलचालनास प्राधान्य दिल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला. तसेच, ते पुढे म्हणाले, हे ते लोक आहेत ज्यांनी न्यायालयात श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी अयोध्येत भव्य श्राराम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, संपूर्ण देश प्राणप्रतिष्ठा साजरा करत होता, पण काँग्रेस पक्षाने मात्र उघडपणे आमच्या श्रद्धेचा अपमान केला होता, असा घणाघात पंतप्रधानांनी काँग्रेसवर केला. हे तेच लोक आहेत ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही, त्यांचाही अपमान करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबिल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.