(Aniketshastri Maharaj Nashik News)
नाशिक : चार वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात पालघर येथे जमावाकडून झालेल्या मारहाणीत दोन साधूंचे प्राण गेले होते. तसाच काहीसा प्रकार नाशिक येथे घडला, परंतु सुदैवाने साधू हत्याकांडची पुनरावृत्ती टळली. 'अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज'चे महाराष्ट्र प्रमुख महंत पिठाधीश्वर अनिकेतशास्त्री महाराज यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
धर्मांधांनी नाशिक हायवेजवळ हल्ला करून अनिकेतशास्त्री महाराजांच्या गाडीसह अन्य सात-आठ गाड्यांचेही नुकसान केल्याची घटना गुरुवार, दि. ४ एप्रिल रोजी पहाटे १२.१५ वा. दरम्यान घडली. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अनिकेतशास्त्री महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून नाशिकला जात असताना जवळपास ९०० ते १००० च्या जमावाने गाड्यांवर हल्ला केला. लाथा-बुक्क्या आणि काठ्या मारत गाड्यांची तोडफोड केली. मात्र समोरील एका गल्लीतून गाडी नेण्यात यश आल्याने जीव वाचवणे शक्य झाले.
हे वाचलंत का? : दूरदर्शनवर ‘द केरळ स्टोरी’चे प्रसारण थांबवा; डावे-काँग्रेसची निवडणुक आयोगाकडे मागणी
गेल्या काही महिन्यांपासून काही अनोळखी इसमांकडून आश्रमावर दगडफेक, गोशाळेवर दारूच्या बाटल्या फेकण्याचा प्रकार धर्मांधांकडून होत असून त्यांच्यावर झालेला हा चौथा हल्ला असल्याचे अनिकेतशास्त्री महाराज यांनी सांगितले.
प्रवासी बसवरही दगडफेक!
नाशिक-पुणे मार्गावरील सॅण्डी हॉटेलसमोर उभ्या असलेल्या सिटीलिंकच्या बसवरही धर्मांधांनी यावेळी दगडफेक केली. यावेळी बसमध्ये अंदाजे २० प्रवासी होते. बस चालक कृष्णा पावटेकर यांच्या माहितीनुसार, रात्री १२.१५ च्या सुमारास बारदान फाटा ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन प्रवास करत असताना मुस्लिम पोषाख धारण केलेल्या जमावाने बसवर दगडफेक करत काचा फोडल्या.
धर्मांधांविरोधात गुन्हे दाखल
अनिकेतशास्त्री महाराज यांची गाडी, सिटीलिंक बस व इतर अन्य गाड्यांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांविरोधात भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम १४३, १४५, १४७, १४९, ३३६, ४२७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी पोलिसांकडून तपास सुरु आहे.