गृहनिर्माण प्रकल्पांत सुखसोयी उपलब्धतेची मुदत द्या !

तपशील देणे बंधनकारक करण्याचा महारेराचा निर्णय

    29-Apr-2024
Total Views |

aminities



मुंबई,दि.२९: प्रतिनिधी 
पार्किंग मधील त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणणारा अपरिवर्तनीय तरतुदीचा आदेश जारी केल्यानंतर महारेराने आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधा, सुखसोयीतील अनिश्चितता संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदर्श विक्री करारात अनुसूचि दोनमध्ये आतापर्यंत सुविधा आणि सुखसोयींचा फक्त उल्लेख होता. आता या प्रस्तावित आदेशात दिल्याप्रमाणे प्रत्यक्षात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार यांचा तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात इमारतीत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात द्यायच्या तरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाट्यगृह, सोसायटीचे कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट इ. अशाप्रकारच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार ? त्याचा आकार काय राहील ? याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक राहणार असल्याचे नवीन आदेशात प्रस्तावित करण्यात आले आहे. विक्री करार करताना या प्रस्तावित आदेशासोबत दिलेल्या जोडपत्राच्या मसुद्यानुसार विक्री कराराचा भाग म्हणून देणे बंधनकारक आहे. घर खरेदीदारांच्या दृष्टीने याचेही महत्त्व लक्षात घेता ही तरतूदही अपरिवर्तनीय राहणार आहे.
यापूर्वी प्रमाणित विक्री करारातील दैवी आपत्ती, दोषदायित्व कालावधी, चटई क्षेत्र, हस्तांतरण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या पार्किंग नंतर ही सहावी तरतूद अपरिवर्तनीय राहणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सर्व संबंधितांनी [email protected] या इमेलवर याअनुषंगाने सूचना , हरकती २७ मे २०२४ पर्यंत पाठवाव्या, असे आवाहन महारेराने केले आहे. यासाठी हा आदेश महारेराच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आलेला आहे. येथून पुढे याबाबत घरखरेदीदारांची फसवणूक होऊ, यात प्रवर्तकाची जबाबदेयता वाढून पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी महारेराने विक्री करारात ही बाब जोडपत्रात सर्व तपशीलासह देणे बंधनकारक केलेली आहे. ही तरतूद अपरिवर्तनीय बाब म्हणूनही प्रस्तावित केलेली आहे.
कुठल्याही नवीन गृहनिर्माण प्रकल्पाच्या विक्री करारात प्रकल्पाचे बांधकाम, सदनिकांचा विनिर्देशांसह तपशील, आतील, बाहेरील कामे, प्रकल्प उभारणीच्या, पूर्ततेच्या टप्पेनिहाय विविध तारखा, त्यानुसार पैसे भरण्याचे वेळापत्रक, सदनिकांची किंमत , सदनिका हस्तांतरणाची तारीख, त्यास विलंब झाल्यास प्रवर्तकाने द्यायचा दंड आणि ठरल्यानुसार पैसै भरण्यास विलंब झाल्यास घर खरेदीदाराने द्यायचे व्याज.,असा सर्व बारीक सारीक तपशील विक्री करारात असतो. परंतु या करारात प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात , इमारतीत , इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात द्यायच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार ? त्याचा आकार काय राहील ? याचा कुठलाही तपशील नसतो. अपवादाने असलाच तर ह्या सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार याचा तपशील नसतो. त्यामुळे अनेकदा सदनिका नोंदणी करताना आश्वासित सुविधा, सुखसोयी राहायला गेल्यानंतर आश्वासनानुसार उपलब्ध असतातच असे नाही.