ट्रोलिंग केल्यास, दोन महिने तुरूंगात टाका!; महेश मांजरेकरांनी दिला सल्ला

    28-Apr-2024
Total Views |
अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 

mahesh manjarekar  
 
मुंबई : सध्या सोशल मिडियावर कलाकरांना ट्रोल करणं वाढलं आहे. त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर, मतांवर किंवा अन्य कोणत्याही बाबींवर ट्रोलिंग केलं जातं. पण आता या ट्रोलर्सना अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजकेर (Mahesh Manjarekar On Trolling) यांनी चांगलंच सुनावलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले असता त्यांनी ट्रोलिंगवर भाष्य केले असून ट्रोलर्सना (Mahesh Manjarekar On Trolling) तुरुंगाची हवा खायला लावली तरच ते बंद होईल असे मत त्यांनी बेधडकपणे मांडले आहे.
 
महेश मांजरेकर म्हणाले की, ‘‘आज ट्रोलिंग खूप केलं जातं. हल्ली सर्व गोष्टी यूट्यूबवर असतात. मी इन्स्टावर काही टाकत नाही. माझे प्रतिनिधी ते टाकतात. माझे काम आवडले नाही तर त्याविषयी ट्रोल झालं तर चालेल, पण माझ्या आई-वडिलांविषयी बोललं तर मला चालणार नाही. अशा वेळी मी गप्प बसत नाही. मुलांना किंवा घरच्यांना त्याच्यात नका ओढू. त्याविषयी कायदा यायला हवा. शिवीगाळ असेल तर त्यांना दोन महिने तुरूंगात टाका. असा नियम काढायला हवा. त्याची केस पण करू नका. कारण कोर्टात खूप केस आहेत. केवळ समजलं तर लगेच त्याला तुरूंगात टाका आणि तरच ते बंद होईल. कोणी काय नाव ठेवावे, हे त्याचा प्रश्न आहे’.’
 
तसेच, चित्रपटांच्या व्यवसायाबद्दल भाष्य करत ते म्हणाले की, “राज्यात चित्रपट व्यवसाय वाढवायचा असेल तर थिएटर वाढवायला हवेत. छोट्या छोट्या गावात थिएटर हवे. तिथे शंभर प्रेक्षक बसतील, असे थिएटर बांधा. तिथेच एक फूड मॉल तयार करा. तिथे घरातले जिन्नस मिळतील, असा मॉल करा आणि एक कॉफी शॉपही बनवा. तरच त्या ठिकाणी लोकांची गर्दी होईल. त्यातून रोजगारही मिळेल, असे मांजरेकरांनी चित्रपट गावागांवात पोहोचावा आणि चित्रपट व्यवसाय अधिक वाढावा यासाठी पर्याय सुचवले.