महादेव बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांनी साहिल खानला छत्तीसगडमधून केली अटक

    28-Apr-2024
Total Views |
महादेव बॅटींग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला पोलिसांनी घेतले ताब्यात
 

sahil khan  
 
मुंबई : महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अडचणीत सापडले होते. याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याच्यासह तीन जनांना समन्स पाठवले होते. परंतु त्या चौकशीसाठी साहिल आला नव्हता. यानंतर पुढील कारवाई करत साहिल खान (Sahil Khan) याला महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे. यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आणि आता मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) साहिल खानला अटक केली असून त्याला एसआयटीकडून डिसेंबर महिन्यात समन्स बजावण्यात आलं होतं. पण तो चौकशीसाठी गैरहजर होता.
 
महादेव बेटिंग ॲपचा प्रसार आणि प्रचार, ॲपचा प्रचार करून त्याने मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याचं देखील समोर येत आहे. काही दिवसांपुर्वी साहिलने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली होती. महादेव बेटिंग हे ॲप बेकायदेशीर असून यात पैशांची मोठी गुंतवणूक करण्यात आली होती आणि यासाठी बनावट बँक खाती देखील उघडण्यात आली होती अशी माहिती समोर आली.
 
 
 
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी २०२३ साली तक्रार दाखल केली होती आणि त्याच्या आधारे माटुंगा येथे साहिल खान याच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मुंबईतून साहिलने पलायन केले होते. मुंबईतून गोवा, कर्नाटक, हैदराबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. आणि अखेर त्याचा पाठलाग केल्यानंतर छत्तीसगढमधील जगदलपूर येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
यापुर्वी मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस गुन्हे शाखेने आरोपी अमित शर्मा, साहिल खान आणि त्याच्या दोन भावांना यापुर्वी देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले असता कोणीही हजर राहिले नव्हते. दरम्यान, या प्रकरणात ३१ आरोपींच्या नावे एफआयरची नोंद झाली असून यापैकी बरेच जण देशात नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी पलायन करण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस ‘लुक आउट सर्कुलर’ (एलओसी) जारी करण्याबाबत विचार करत आहेत. दरम्यान, नागपूरमध्ये झालेल्याहिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणाची कसून चौकशी केली जाईल असे म्हटले होते. काही दिवसांपुर्वी रणबीर कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, हिना खान, हुमा खुरेशी यांना देखील ईडीने समन्स पाठवले होते.