प्रतिभेचे देणे

27 Apr 2024 22:08:17
 pratibheche dene book review
 
स्त्रीची आत्मचरित्र, व्यक्तिचित्र किंवा तिच्या कर्तृत्वाविषयीचं लेखन माझ्या नेहमीच आवडीचं. कारण, तिचं व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचं असतं. एकाचवेळी अनेक ठिकाणी लक्ष घालून अनेक आघाड्यांवर हुकूमत गाजवण्याची त्यांची हातोटी विलक्षण असते. प्रतिभा रानडे हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. ‘पैस प्रतिभेचा’ हे पुस्तक म्हणजे त्यांची चहू बाजूंनी वेध घेणारी एक प्रदीर्घ मुलाखत आहे.

 एका प्रतिभावंत आणि अनुभवसंपन्न स्त्रीला दुसर्‍या एका जिज्ञासू स्त्रीने विचारलेले प्रश्न आणि त्या दोघींव्यतिरिक्त वाचकांचे मनही समृद्ध करणारी त्यांची उत्तरे, असे साधेसे स्वरूप या पुस्तकाचे आहे. कोणत्याही असामान्य स्त्रीप्रमाणे प्रतिभाताईंनाही गूढ, अस्तित्वाचा अर्थ आणि भविष्याविषयी ओढ आहेच. काहीतरी शोधण्याच्या प्रेरणेने झपाटल्यासारखा त्यांचा जीवनप्रवास आहे. हा भावविभोर जीवंत जीवनप्रवास दीपाली दातार यांनी तेवढ्याच उत्कटतेने मांडला आहे. पुस्तक उघडल्यावर आणि दोन पाने उलटल्यावर समोर येते ती थक्क करणारी अर्पणपत्रिका! पुस्तकाची अर्पणपत्रिका म्हणजे लेखिकेच्या ऋजुतेचा पैस असतो. तिच्या इतके दिवसांच्या परिश्रमाचे सार ती कुणाला अर्पण करते, हे जाणून घेतल्याने तिचे मनोगत लक्षात येते. दीपालीताई लिहितात, ‘माणसाच्या मनात असलेल्या कुतूहलाला समर्पित.’ दीपाली दातार यांनी या पुस्तकात स्वतःचे असे केवळ प्रश्नच विचारले आहेत. पण, ते प्रश्न केवळ उत्तरे मिळवण्याच्या उद्देशाने विचारले आहेत, असे नाही. त्या प्रश्नांमधून त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची जाणीव होते. त्यांच्या जिज्ञासेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. एक वेग देतात हे प्रश्न प्रतिभाताईंच्या आयुष्याला. एक सुस्पष्ट अशी दिशा देताना त्याचवेळी एका प्रश्नातून विविध पैलू उलगडून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.

दीपालीताई प्रतिभा रानडेंविषयी बोलताना म्हणतात, “लेखनात मुशाफिरी करताना कोणत्याही एका विशिष्ट साहित्यप्रकारात त्यांची लेखणी कधी अडकून पडली नाही. मोजकेच का होईना, पण अनुवाद, कथा, कादंबरी, चरित्र, ललितबंध, सामाजिक, वैचारिक, राजकीय असं विविधांगी लेखन ५० वर्षे त्या करत आहेत. जिथे वास्तव्य असेल, तिथे राहून तिथली भाषा शिकत त्यांच्यासारखाच पेहराव करून त्यांच्यापैकीच होऊन जात. स्त्रियांचे भावविश्व, त्यांचे मानापमान, त्यांचा आत्मसन्मान, स्त्री-पुरुष समानता, त्यांच्यामधले नातेसंबंध, धर्म आणि स्त्रिया, धर्माने आणि न्यायाने स्त्रियांना दिलेले आणि न दिलेले अधिकार, हे विषय त्यांच्या लेखनातून फार ठळकपणे येतात.” मनोगत लिहून झाल्यानंतर पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणासुद्धा त्यांनी सविस्तर लिहिली आहे. यात त्यांचे आणि प्रतिभाताईंचे संबंध, त्या कशा जवळ आल्या, त्यांची ओळख कशी झाली, त्यांना भेटायला जातानाचे प्रसंग इतक्या विस्तृत पटात मांडले आहे की, असे वाटते आपणसुद्धा याच कुटुंबाचा एक भाग आहोत.

यातून पुढे त्यांची अनौपचारिक पण अर्थगर्भ प्रश्नोत्तरे आपल्याला आपलाही संवाद आहे, असे वाटू लागते. मुख्य सात आणि त्यानंतर प्रत्येक भागात अनेक विषय आहेत. यात धर्म, संस्कृती मानवी जीवन हा पहिला अध्याय आहे, तर धर्म, देश, राष्ट्र आणि जागतिकीकरण हा दुसरा पाठ आहे. तिसर्‍या पाठात धर्म, स्त्रिया आणि आधुनिकता या विषयांचा समावेश आहे, तर प्रतिभाताईंच्या लेखनप्रवासावर एक स्वतंत्र पाठ घेण्यात आला आहे. पुढे त्या कला दृष्टी आणि साहित्य चिंतनाकडे येतात, तेथून पुढे व्यक्तिविशेष आणि भावजीवन याविषयी त्या सविस्तर लिहितात. सरतेशेवटी प्रतिभाताईंचं कल्पनाविश्व आणि विचारविश्व यावर बोलून त्या परिशिष्ट देतात. मध्ये प्रतिभा रानडे आणि त्या भेटलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्ती, तसेच त्यांच्या भावजीवनातील व्यक्तींचेही फोटो पुस्तकात देण्यात आलेले आहेत. परिशिष्टात प्रतिभा रानडे यांचा प्रदीर्घ परिचय त्यांनी दिला आहे. पुस्तक वाचायला सुरुवात कारण्यापूर्वी परिशिष्टाची पाने वाचावी, असे मला वाटते. यातून पुस्तकाकडे पाहण्याची एक दृष्टी येते. प्रतिभाताईंविषयी आपल्याला कल्पना आहेच. परंतु, लेखिका दीपाली यांच्याविषयी मला आवर्जून सांगावेसे वाटते. दीपाली या २० वर्षांहून अधिक आयटी क्षेत्रात डेव्हलपर, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. पण, तरीही त्यांना वाङ्मयाची आवड पूर्वीपासूनच असल्याने त्यांचे साहित्यातील योगदानही वाखाणण्याजोगे आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक.

पुस्तकाचे नाव : पैस प्रतिभेचा
लेखकाचे नाव : दीपाली दातार
प्रकाशक : डिम्पल प्रकाशन
पृष्ठसंख्या : ४४२
मूल्य : रु. ७००/-


मृगा वर्तक
Powered By Sangraha 9.0