‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; चरित्रपटाच्या माध्यमातून होणार सुरेल संस्कार

26 Apr 2024 21:35:06
swargandharva-sudhir-phadke-biopic


‘आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा’. खरेच महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी कुटुंबातील लहान मुलांवर बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या गाण्यांचे संस्कार झाले आहेत. त्यांचे प्रत्येक गाणे आपल्याला जीवनाचा नवा अर्थ समजावून जाते, असे म्हटले तर अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही. याच महाराष्ट्राच्या अजरामर कलावंताचा संगीतमय चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ १ मे, महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे आणि चित्रपटात बाबूजी आणि ललिताबाई साकारणारे सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.
 
संगीत क्षेत्रात मोठे कार्य करून गेलेल्या बाबूजींच्या जीवनावर चरित्रपट करावा, हे कसे सुचले, याबाबत बोलताना योगेश म्हणाले की, “बाबूजींच्या जीवनावर येणारा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट तरुण पिढीसाठी विशेष आकर्षण असणार आहे. कारण, बाबूजींच्या जीवनावर चरित्रपट करायचा, हा विचार माझ्या डोक्यात साडेचार-पाच वर्षांपूर्वीच आला होता. याचे कारण असे की, आपण महाराष्ट्रात राहतो, गेली अनेक वर्ष चित्रपट पहात आहोत, संगीत ऐकत आहोत. हे सगळे सुरळीत सुरू असताना काहीतरी उणीव भासत होती. कारण, संगीत क्षेत्र हे इतके अफाट आहे की, ते केवळ रिअ‍ॅलिटी शो पुरते मर्यादित नसून, याच कार्यक्रमांतून ‘बाबूजींची अजरामर गाणी ऐकायची आहेत का?’ असा प्रश्न माझ्या मनात उद्भवला.

शिवाय, बाबूजींचे नाव आले की, डोळ्यांसमोर चटकन त्यांची अनेक गाणी येतात. पण, वैयक्तिक जीवनात त्यांनी किती खडतर प्रवास केला आहे, हे कुणाला ठाऊक नाही. आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रतिभासंपन्न महाराष्ट्रातल्या संगीतकाराने मराठीच नाही, तर हिंदीतही अनेक कामे केली, आजच्या घडीला जगभरात त्यांचे चाहते आहेत. अशा व्यक्तीचे आयुष्य रुपेरी पडद्यावर यायलाच हवे. बाबूजींची महती मोठी आहेच. पण, भविष्यातील पिढीला आणि संगीत क्षेत्रातील नवोदित गायकांना बाबूजी समजायला हवे, अंगात भिनायला हवे म्हणून, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा घाट घातला,” असे चरित्रपटामागचे मूळ उद्दिष्ट्य योगेश देशपांडे यांनी सांगितले.

बाबूजींच्या व्यक्तिरेखेसाठी सुनील बर्वेंची निवड कशी केली, याबद्दल बोलताना योगेश देशपांडे म्हणाले, “सुनील बर्वे यांना ज्यावेळी मी पहिल्यांदा भेटलो, त्यापूर्वीच मी सुनील बाबूजींच्या व्यक्तिरेखेत विविध वयोगटात कसे दिसतील, याचे स्केच रेखाटले होते. त्यामुळे बाबूजींच्या रुपात ते कसे दिसतील, हे आमच्या आणि त्यांच्याही डोळ्यांसमोर होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, सुनील गायक नट आहे. संगीताची त्यांना जाण आहे. त्यामुळे जेव्हा बाबूजींच्या आवाजातीलच गाणी, ज्यावेळी ते चित्रपटात सादर करताना दिसतील, तेव्हा त्या गाण्याच्या भावना सुरांची जाण असल्यामुळे ते योग्यरित्या पोहोचवू शकतील, याची आम्हाला सगळ्यांना खात्री होती,” अशी सुधीर फडके यांच्या व्यक्तिरेखेच्या कलाकाराची निवड झाल्याचा किस्सा योगेश यांनी सांगितला.

“बाबूजींच्या आवाजातीलच गाणी चित्रपटात असावी, असे श्रीधर सुधीर फडके यांचेदेखील सांगणे होते,” असे योगेश देशपांडे म्हणाले. “सुधीर फडके यांच्या आवाजातील गाणी इतर कुणीतरी त्यांच्या आवाजात सादर केली, तर बाबूजींचा हा चरित्रपट पूर्णपणे समर्पित होऊ शकणार नाही. त्यामुळे, त्यांच्या चरित्रपटात त्यांच्याच आवाजातील गाणी संगीत क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे वापरण्याचा माझा अट्टहास होता, आणि त्यासाठी मला ज्येष्ठ गायक आणि बाबूजींचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी मदत आणि मार्गदर्शन केले,” असे म्हणत योगेश देशपांडे यांनी श्रीधर फडके यांचे आभार मानले.
 
“बाबूजी आणि ललिताबाई यांच्या लग्नात सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनी मंगलाष्टके म्हटली होती, हे लोकांना माहीत असले, तरी ती कशी गायली होती, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता आणि अनुभवता येणार आहे. शिवाय, बाबूजींची देशभक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील निस्सीम भक्ती आणि प्रेम आणि त्यातूनच तयार झालेला वीर सावरकर चित्रपट, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेला आमूलाग्र बदल, दादरा नगर हवेली मुक्तीसंग्राम, रा. स्व. संघाचे काम अशा त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना या चरित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे,” असे म्हणत प्रेक्षकांना बाबूजींचे संपूर्ण वैयक्तिक आणि समाजासाठी अर्पित केलेले जीवन पाहता येणार असल्याचे देशपांडे म्हणाले.

बाबूजींच्या जीवनाचा इतका मोठा काळ कमी वेळात मांडताना काय डोक्यात विचार होता, याबद्दल योगेश म्हणतात, “८० वर्षांचा जीवनकाळ, संगीत क्षेत्र, सामाजिक क्षेत्र या सगळ्यांमधील बाबूजी अडीच-तीन तासात मांडणे फार कठीण होते. कारण, बाबूजींचे लक्ष जितके कामात असायचे, तितकेच लक्ष स्वत:च्या कुटुंबाकडेदेखील होते. पण, चित्रपट असल्यामुळे त्या माध्यमांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही तीन तासांत बाबूजींचा सुवर्णकाळ मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.”

“संगीत क्षेत्रात बाबूजी, गदिमा, राजा परांजपे, लता मंगेशकर, आशा भोसले अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेली आहेत. ज्याचं जीवन म्हणजेच एक शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे, या व्यक्तिरेखा स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटाच्या माध्यमातून मला लिहिता आल्या, हे माझे भाग्य. बाबूजींचा प्रवास माझ्या हातून रूपेरी पडद्यावर यावा, हे शुभकार्य बाबूजींनीच माझ्याकडून करून घेतले आहे,” अशा भावना व्यक्त करत जगभरातील बाबूजींच्या चाहत्यांपर्यंत आणि संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील देशपांडे म्हणाले.

Powered By Sangraha 9.0