मुंग्या, हत्ती, गवे आणि झेब्रे

26 Apr 2024 22:40:51
Social Changes biodiversity


पूर्व आफ्रिकेतील केनियाच्या जंगलात झालेल्या एका मुंग्यांच्या जातीवरील आक्रमणाने त्या भागाच्या खाद्य संस़्कृतीत प्रचंड उलथापालथ झाली. याचा गंभीर परिणाम तिकडच्या जैवविविधतेवर होत झाला. माणसाच्या बाबतीतही सामजिक बदलाचे सुक्ष्म परिणाम होत असतात याबाबत या लेखात जाणून घेऊया...

एका झाडाच्या एका फांदीवर, काही मुंग्या नेहमीप्रमाणे त्यांच्या उद्योगात मग्न होत्या. तेवढ्यात, खालून जाणार्‍या एका हत्तीच्या धक्क्याने ती फांदी गदागदा हलली. सैनिक मुुंग्या संतापल्या आणि म्हणाल्या, ‘फार शहाणा समजतो स्वत:ला. दाबून टाका साल्याला.’ त्यावर कामकरी मुंग्यांची प्रमुख म्हणाली, “जाऊ द्या. मरेल बिचारा. बायकापोरे उपाशी मरतील.” मग सैनिक मुंग्यांनी बेत रद्द केला.

महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात असे काही नेते आहेत की, ज्यांना ‘आपण म्हणजेच अवघा महाराष्ट्र,’ असे वाटत असते. आपल्या एका शब्दासाठी अवघा महाराष्ट्र थांबला आहे, तिष्ठत उभा आहे, असा त्यांचा गोड गैरसमज असतो. महाराष्ट्राला इतर खूप महत्त्वाची कामे असतात. पण, त्यांचा आणि वर दिलेल्या किश्शाचा काहीही संबंध नाही हं. अकेशिया नावाच्या मुंग्याना हत्ती खरेच बिचकून असतो. आपल्याला त्यांचाच गंमतीदार किस्सा जाणून घ्यायचा आहे.

आपल्या भारत देशाच्या नैऋत्येला, पूर्व आफ्रिकेच्या किनार्‍यावर केनिया हा देश आहे. केनिया आणि त्यांच्या पश्चिमेचा युगांडा देश, यांच्या मधोमध व्हिक्टोरिया हे अतिविशाल सरोवर आहे. त्यातून नाईल ही प्रचंड नदी उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत भूमध्य समुद्राला मिळते. माऊंट केनिया या पर्वतामुळे या देशाला केनिया हेच नाव मिळाले आहे. केनियामध्ये दाट जंगलांपेक्षा झुडपी जंगले जास्त आहेत, म्हणजे बराचसा गवताळ भाग आणि अधून मधून झुडपे, वृक्ष आहेत. पण फार मोठे नव्हेत आणि एकत्र दाटी करून नव्हेत, तर अंतराअंतरावर आहेत. अशा झुडपी जंगलांना सॅवाना म्हणतात. या जंगलामध्ये हत्ती आहेत. गवे म्हणजे रानरेडे आहेेत. झेब्रे आहेत आणि सिंहसुद्धा आहेत. वेगवेगळ्या जातींची हरिणे आणि तरससुद्धा आहेत.

आता निसर्गाची योजना कशी ती बघा. हत्ती, गवे, झेब्रे आणि हरिणे हे सगळे शाकाहारी प्राणी आहेत. त्यांना लागणारे गवत, झुडपे, वृक्षांची पाने इथे भरपूर आहेत. सिंह आणि तरस हे मासांहारी आहेत. सिंह मुख्यतः झेब्र्यांची शिकार करतात. मग रुचिपालट म्हणून हरिणांना खातात. तरस स्वतंत्रपणे शिकार केलीच, तर लहान जातीच्या हरिणांना खातात. पण तरस मुख्यतः सिंहांनी केलेल्या शिकरीतले उष्टे-खरकटे खातात. तरस हा घाणेरडा दिसणारा, पण धोकेबाज प्राणी आहे. सिंहांच्या मागावर रहायचे. सिंहांनी आणि त्यांच्या छाव्यांनी मुुख्य शिकार खाऊन संपवली की, उरल्या-सुरल्या मांसावर तरस तुटून पडतात. हे करताना चुकून एखाद्या सिंहाचा छावा मागे राहून त्यांच्या तावडीत सापडला, तर तरस त्याच्यावर दात चालवायला कमी करीत नाहीत. तरस नेहमी घोळक्याने वावरतात, फेंगडे चालतात आणि त्यांचे ओरडणे हे माणसाच्या भेसूर हसण्याप्रमाणे भीतीदायक वाटते. असो.

तर केनियाच्या झुडपी जंगलात ‘व्हिसलिंग थॉर्न ट्री’ या नावाचे एक झाड उगवते. या झाडाच्या डहाळीवर सर्वत्र चांगले मोठेमोठे काटे असतात. एका डहाळीतून दुसरी डहाळी फुटते. त्या सांध्यावर एक फळ असते. त्या फळावरही काटे असतात. पण, फळ पोकळ असते. त्या पोकळीत ‘अकेशिया’ जातीच्या मुंग्या घरटी बांधून राहतात आणि त्या फळातला मध गोळा करतात.

हत्तींना झाडांच्या कोवळ्या डहाळ्या, पाने खायला आवडते. म्हणजे, गवताप्रमाणे तेदेखील त्यांचे अन्नच आहे. पण, हत्ती या अकेशिया जातीच्या मुंग्यांना घाबरतात. जंगलात कुणालाही न घाबरणारा सर्वशक्तीमान हत्ती मुंगीला घाबरतो, ही लहानपणी पंचतंत्रात ऐकलेली गोष्ट खरी असावी. तर, अकेशिया मुंग्यांना चाळवायला नको, म्हणून हत्ती या ‘व्हिसलिंग थॉर्न ट्री’च्या वाटेला जात नाहीत. परिणामी, ही झाडे विपूल वाढतात आणि सिंहांना निवारा देतात. या झाडांची फळे आणि मोठेमोठे काटे पिकून पोकळ होतात, त्यांना भोके पडतात. जोराच्या वार्‍याने त्या भोकांमधून खरोखरच शिट्टी मारल्यासारखा आवाज येतो.

झेब्रा हा प्राणी फक्त पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतच आढळतो. शास्त्रीयदृष्ट्या तो घोडा आणि गाढव यांच्याच कुळातला प्राणी आहे. त्याच्या अंगावरचे पट्टे अतिशय चमकदार आणि आकर्षक असतात. त्यामुळे दिसायला तो फारच छान दिसतो. पण, असायला मात्र तो उमदा नसतो. म्हणजे, तो अत्यंत नाठाळ आणि अजिबात न माणसाळणारा प्राणी आहे. काही प्राणिशास्त्रज्ञ किंवा पशुशिक्षकांनी त्याला माणसाळवून घोडा किंवा गाढव यांच्याप्रमाणे त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांना मर्यादितच यश मिळाले. आफ्रिकन सिंहांना मात्र झेब्र्याचा फारच उपयोग होतो. व्हिसलिंग थॉर्न ट्रीच्या झुडपात दबा धरून बसायचे आणि झेब्य्रांची शिकार करायची, हा आफ्रिकन सिंहांचा शतकानुशतकांचा पोटापाण्याचा उद्योग आहे. अर्थात, झेब्रासुद्धा चपळ असतो आणि गाढवाप्रमाणे भयंकर जोरात लाथा झाडतो. पण, शिकार करायची म्हटल्यावर सिंहांना तेवढे श्रम करावेच लागतात.

परंतु, अनादि कालापासून चालत आलेल्या या निसर्गच्रकात एकाएकी बदल झाला आहे. व्हिसलिंग थॉर्न ट्रीवर आढळणार्‍या अकेशिया जातीच्या मुंग्यांना ‘बिग हेड’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या मुंग्यांनी हुसकावून लावले आहे. या बिग हेड मुंग्या अचानक कोठून आल्या, का आल्या, माहीत नाही. मुंग्यांची ही जात वाळवीसारखीच भयानक आहे, असे शास्त्रज्ञ म्हणत आहेत. या मुंग्या फारच आक्रमक असून, त्या वाटेल ते खाऊ शकतात, असे शास्त्रज्ञांना आढळत आहे. गंमत म्हणजे हत्ती त्यांना घाबरत नाहीत. आता क्रम असा होता पहा, व्हिसलिंग थॉर्न ट्रीवर अकेशिया मुंग्या घरटी करायच्या. हत्ती त्या मुंग्यांना घाबरून त्या झाडाच्या वाटेला जात नसत. त्यामुळे भरभराटलेल्या त्या झाडात, सिंह दडून रहात आणि झेब्य्रांची शिकार करीत.

आता बदललेला क्रम पहा, बिग हेड मुंग्यांनी अकेशिया मुंग्यांना हुसकावून लावून व्हिसलिंग थॉर्न ट्रीवर स्वत:चे राज्य तयार केले. या मुंग्यांना हत्ती अजिबात घारबत नाहीत. असे का? अजून कळलेले नाही. परिणाम असा की, हत्ती इतर झाडाझुडपांप्रमाणे, हे झाडही चघळून खायला शिकले. परिणामी सिंहांची दडण्याची जागा नाहीशी झाली. परिणामी सिंहांना चकवून पळून जाऊन जीव वाचविण्यात झेेब्रे यशस्वी होऊ लागले. हरिणे तर झेब्य्रांपेक्षाही चपळ. मग आता सिंहांना अल्पश्रमात मिळणारी शिकार कोण? तर, अर्थातच गवे म्हणजेच रानरेडे.

खरे म्हणजे गवा किंवा रानरेडा हा अत्यंत खतरनाक प्राणी आहे. पूर्णपणे शाकाहारी असलेला हा गवा, अत्यंत शक्तिमान आणि निर्भय असतो. तो वाघ, सिंह, चित्ता अशा कोणत्याही बलवान, क्रूर, शिकारी प्राण्याला घाबरत नाही. त्याची तीक्ष्ण शिंगे आणि शक्तिशाली लाथा, यांच्या तडाख्यात वाघ सापडला, तरी तो त्याला फाडून काढल्याशिवाय रहात नाही. पण, त्याच्या प्रचंड देहामुळे तो चपळाईत कमी पडतो. त्यामुळे, झेब्रे सहज मिळत नाहीत म्हटल्यावर सिंह गव्यांकडे वळले. आकडेवारीतच सांगायचे, तर गेल्या सुमारे २० वर्षांच्या काळात आफ्रिकन सिंहांच्या शिकारीतील झेब्य्रांचे प्रमाण ६७ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तर, गव्यांच्या शिकारीचे प्रमाण शून्य टक्क्यावरून ४२ टक्के इतके वाढले आहे.


‘पृथ्वीची उलथापालथ तर झाली नाही ना? मुंग्यांनी मेरूपर्वत तर गिळला नाही ना? वडवानलाने समुद्र तर जाळला नाही ना?’ हा जुन्या ऐतिहासिक मराठी नाटकातला प्रसिद्ध संवाद आफ्रिकन गवे बिग हेड मुंग्यांना उद्देशून म्हणत असतील का?
 
आफ्रिकन ऑर्थोडॉक्स चर्च
 
ख्रिश्चन हा संप्रदाय आपल्याला युरोपीय गोर्‍या लोकांचा वाटतो. पण, तो तसा नाही. येशू हा पॅलेस्टाईन या आशियाई देशात, ज्यू किंवा यहुदी आईबापांच्या पोटी जन्मला. दि. ३ एप्रिल इ. स. ३३ या दिवशी ज्यू धर्मगुरूंच्या चिथावणीने जेरूसलेम, या आशियाई शहराच्या रोमन सुभेदाराने येशूला मृत्यूदंड दिला. त्यानंतर, येशूचे शिष्य प्राणभयाने सर्वत्र पळाले. पॅलेस्टाईन हे आशिया खंडात, पण युरोप आणि आफ्रिका खंडांच्या लगतच असल्यामुळे येशूचे हे शिष्य या तीनही खंडांमधल्या वेगवेगळ्या सुरक्षित जागी पळाले. मुख्यतः ईजिप्तमध्ये म्हणजे आफ्रिका खंडात पळाले. खाईस्टचे शिष्य या अर्थाने ख्रिश्चन हे अभिधान त्यांना ईजिप्तमध्ये प्राप्त झाले.
आणि लक्षात घ्या, पुढच्या फक्त नऊ वर्षांमध्ये म्हणजे इसवी सन ४२ व्या वर्षी त्यांनी ईजिप्तची तत्कालीन राजधानी अलेक्झांड्रिया शहरामध्ये, आपल्या चर्चची स्थापना केली. हेच ते ‘ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ अलेक्झांड्रिया’. तत्कालीन ईजिप्तमध्ये ग्रीक लोक राज्यकर्ते होते. त्यामुळे या येशू शिष्यांनी हळूहळू पण निश्चयाने आणि संयमाने या सगळ्या ग्रीकांना बाटवले. बाटवणे हा शब्द निधर्मी, सिक्युलर, कोवळ्या, सुकुमार (पक्षी: बवळट हिंदू) मनाला कसासाच वाटत असेल, तर आकाशातल्या बापाच्या कळपात आणले असे म्हणा. एकूण एकच. आणि हे धर्मांतर ईजिप्तपुरते राहिले नाही. ईजिप्तपासून मोरोक्कोपर्यंत भूमध्य समुद्राच्या काठाकाठाने वेगाने पसरले.

पुढे इसवी सन ३२५ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन, याने अधिकृतपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आता बांधा असा आला की, ईजिप्त ते मोरोक्को आणि तिकडे आशिया खंडातही अरबस्तान, अनातोलिया (आताचा तुर्कस्तान) या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार, प्रसार केला होता येशूच्या पॅलेस्टाईनी म्हणजे ज्यू आणि ग्रीक शिष्यांनी. आत नवीन ख्रिश्चन झालेल्या रोमन लोकांच्या दृष्टीने हे दोघेही हलके, हिणकस, तुच्छ होते. तेव्हा काहीतरी कुरापती काढून रोमनांनी आपाल वेगळा संप्रदाय काढला. त्याला म्हणू लागले, ‘रोमन कॅथलिक चर्च’ मग साहजिकच या आधीच्या संप्रदायाला म्हणू लागले, ‘ग्रीक ऑथ्रोडॉक्स चर्च.’

पश्चिम युरोपीय देश स्वतःला रोमनांचे वंशज समजतात. म्हणून तिथे रोमन कॅथलिक चर्चचा पगडा आहे. तर, पूर्व युरोपीय लोकांना ते ‘स्लाव्ह’ वंशीय, म्हणजे स्लेव्ह किंवा गुलाम वंशीय मानतात. म्हणून, पूर्व युरोपमध्ये ग्रीक ऑथ्रोडॉक्स चर्चचा पगडा आहे. त्यांच्यातही पुन्हा भरपूर अंतर्गत लाथाळ्या आहेतच. रशिया हा पूर्व युरोपातील सगळ्यात मोठा देश आहे. म्हणून, रशियन ऑथ्रोडॉक्स चर्चचा प्रमुख सिरिल अथवा किरिल, हा इतर सर्व चर्च संस्थांना चेपायला बघत असतो. रोमन कॅथलिक चर्चच्या प्रमुखाला पोप ही संज्ञा आहे. तसे या ऑथ्रोडॉक्स चर्च प्रमुखाला पेट्रिआर्क असे म्हणतात.
 
रशिया युक्रेन युध्दात युक्रेनियन ऑथ्रोडॉक्स चर्चने रशियाची बाजू घ्यावी, असे प्रयत्न पेट्रिआर्कने केले. युक्रेनियन चर्चने ताबडतोबच ते फेटाळून लावत ठणठणीत राष्ट्रीय भूमिका घेतली. ऑथ्रोडॉक्स चर्च ऑफ अलेक्झांड्रिया सोडले, तर आता आफ्रिका खंडात ऑथ्रोडॉक्स चर्चचे म्हणावे असे बळ नाही. पण, पेट्रिआर्कने म्हणजेच पुतिन यांनी त्यांनाही पटविण्याच्या प्रयत्न करून पाहिला. ‘ऑथ्रोडॉक्स चर्च ऑफ अलेक्झांड्रिया अ‍ॅण्ड ऑल आफ्रिका’ या संस्थेने पुतिन यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
‘तुम्हा हिंदूंमध्ये भयंकर विषमता आहे,’ असे हे पाद्री नाक वर करून आम्हाला सांगत असतात. तुमच्या पायांखाली तुमच्या कथित समतेच्या किती चिंध्या पसरल्या आहेत, ते अगोदर पहा.


Powered By Sangraha 9.0