रॉकस्टार क्वीन

26 Apr 2024 21:07:27
Pallavi Dabholkar


बालपणी घरात तबला पेटीवर भजन ते मोठेपणी भारतीय आणि पाश्चिमात्य संगीतामध्ये, आपल्या पार्श्वगायनाने भूरळ घालणारी मराठमोळी रॉकस्टार क्वीन पल्लवी दाभोळकर हिच्याविषयी...

ठाण्यात राहणारी पल्लवी अशोक दाभोळकर हिचा जन्म ३० मे १९८५, रोजी विलेपार्ले (मुंबई) येथे झाला. दाभोळकर कुटुंब मध्यमवर्गीय असून तिचे लहानपण वरळी गावात गेले. वरळीत घर असले, तरी काही वर्षांनी, दाभोळकर कुटुंब ठाण्यात वास्तव्यास आले. अगदी १० बाय १०च्या चाळीतील छोट्याशा घरातून पल्लवीच्या आयुष्याचा श्रीगणेशा झाला. राजा शिवाजी विद्यालयात मराठी माध्यमातून शिक्षण झाले. शाळेत असल्यापासूनच तिला संगीत शिकण्याची आवड होती. शाळेचा अभ्यास आणि संगीताचा अभ्यास दोन्ही जोमाने सुरू असताना, करिअर मात्र संगीतातच करायचे, हे तिने लहानपणापासूनच मनाशी ठरवले होते. यात आई आरती दाभोळकर आणि वडील अशोक दाभोळकर हे जरी संगीत क्षेत्रात नसले, तरी तेच तिचे पहिले गुरू असून, त्यानंतर गुरू मानसिंगजी जाविर यांच्याकडून जवळजवळ आठ वर्षे तिने शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पल्लवीने एसएनडीटी महिला महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेतले. आनंदाची गोष्ट म्हणजे, दोन विषय संगीत विषयक होते. त्यामुळे, शिक्षणासोबत संगीत शिकता आले. सोबतच, मुंबई विद्यापीठामधून संगीतात पदवीदेखील मिळवली.

कालौघात पल्लवीने स्वतःला बदलले. हिंदी क्षेत्रात काम करायचे असेल, तर उर्दू सुधारावी म्हणून तिने हिंदी आणि उर्दू भाषेचा अभ्यास केला. पालकांनीही भरभरून प्रोत्साहन दिले. अन् चाळीतील छोट्या घरातून आलेली एक सामान्य मुलगी आज ‘रॉकस्टार क्वीन’ म्हणून रूपेरी दुनियेत प्रसिद्ध आहे. गायनाव्यतिरिक्त पल्लवीला चित्रकलेची आवड असून, तिचे हस्ताक्षरही उत्तम आहे. तिच्या कुटुंबातील प्रत्येकाला कलेची आवड आहे. किंबहुना, संपूर्ण कुटुंबच संगीतात रममाण असते. त्यामुळे पल्लवीला कधी ताल आणि सूर शिकावा लागला नाही. उलट, गायन शिकण्याआधीच तिला सूर आणि ताल अवगत होते. ती पेटीदेखील उत्तम वाजवते. मितभाषी आणि शांत असलेल्या पल्लवीला गायनाव्यतिरिक्त फिरायलाही आवडते. संगीताच्या माध्यमातून तिला एक उत्तम जीवलशैली मिळाली. अगदी पाल आणि झुरळावरही प्रेम करेल, इतकी पल्लवीला पक्षी-प्राण्यांची आवड आहे. या कामी तिची प्राणिमित्र बहीण मेघना हिची नेहमीच मदत मिळते. या प्रेमामुळे भूतदया म्हणून आयुष्यात काहीतरी भरीव काम करण्याची तिची इच्छा आहे.

पल्लवीच्या संगीताचा प्रवास हा भजनाने सुरू झाला. त्यानंतर, मराठी भावगीतांचे कार्यक्रम ती करू लागली. पुढे हिंदी भाषेत तिची रूची जास्त वाढू लागली. आणि मग, हिंदी भावगीते, जुनी गाणी यांचे कार्यक्रम करण्यास तिने सुरूवात केली. सुरूवातीपासून वेगळे काहीतरी करण्याची आवड होती. ‘जे गाणे गाणार ते नेहमी माझ्याच आवाजात आणि माझ्याच स्टाईलने गाणार, कॉपी करणार नाही,’ असे तिने ठरवले होते. याला अनेकांनी विरोधही केला. पण, तिने नेहमी मनाचेच ऐकले. अनेकजण जे आता मॅशअप्स वगैरे ऐकतात, हे ती यूट्युब येण्याआधीपासूनच करत आली आहे. नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची आवड आणि मेहनत करायची प्रचंड तयारी यामुळे पल्लवीने स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

संगीताच्या या वाटचालीत आईवडिलांच्या बरोबरीने आशाताई, लतादीदी, किशोरदा, रफीसाहेब या प्रभूतीना तिने फॉलो केले आहे. मग गायकीत ‘वेस्टर्न टच’ येण्यासाठी बियोन्स, मायकेल जॉन्सन अशा बर्‍याच पाश्चिमात्य गायकांनाही तिने फॉलो केले. आणि मग असेच वेगवेगळ्या स्टाईलचे संगीत ऐकून ऐकून स्वत:ची एक ‘वर्सटाईल सिंगिंग‘ स्टाईल विकसित केली. ज्यात तिला लोकप्रियता मिळाली असून प्रत्येक सादरीकरणात याची पावती मिळते. “खरेतर सर्वांना माझे गाणे आवडते, हाच माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे. माझी जी इच्छा होती, की मी वेगळ्या माझ्या स्टाईलने म्युझिक सादर करावे, आणि ते करताना माझ्या श्रोत्यांना ते आवडले पाहिजे, ही माझी इच्छा खरेच पूर्ण झाली आणि हीच माझी खूप मोठी कामगिरी आहे,” असे पल्लवी सांगते.
आतापर्यंत सहा ते सात भाषांत तिने पार्श्वगायन केले आहे. सोनू निगम, विनोद राठोड, कुमार सानू, उदित नारायण अशा नामांकित गायकांसोबतही गाणी गायल्याचे सांगते. देश आणि विदेशात तीन हजारपेक्षा अधिक कार्यक्रम केले असून अनाथ मुले, कॅन्सर रुग्ण, वृद्धाश्रमातही दरवर्षी विनामूल्य कार्यक्रम करीत असल्याचे नमूद करते.

“गाण्याद्वारे आपण समोरच्या व्यक्तीला थोडेफार तणावमुक्त करू शकतो. त्यांच्या चेहर्‍यावर हास्य आणू शकतो, यापेक्षा मोठी अचिव्हमेन्ट काय असेल. मला संगीत एका वेगळ्या पद्धतीने रसिकांसमोर सादर करायचे आहे. स्वतःचे आयुष्य नक्कीच जगा. मनाला जे आवडते ते करा. पण, सोबत माणूसकी आणि विनम्रता कधीच विसरू नका. कारण, आजकाल त्याचीच उणीव भासत आहे,” असेही पल्लवी सांगते. अशा अनोख्या पद्धतीने गायनक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार्‍या ‘रॉकस्टार क्वीन’ला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा...

Powered By Sangraha 9.0