महाराष्ट्राची कुलस्वामिनी रेल्वेच्या नकाशावर

25 Apr 2024 20:50:43


railway


मुंबई, दि.२५:
 सोलापूर ते धाराशिव या बहुचर्चित रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धाराशिव ते तुळजापूर या मार्गासाठी मध्य रेल्वेने नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. धाराशिव ते सोलापूर या टप्प्यातील धाराशिव ते तुळजापूर हा ३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाने जी पी टी कन्स्ट्रक्शन या कंपनीसोबत करार केला आहे. अडीच वर्षांत काम पूर्ण होईल, अशी आशा आहे.

तुळजापूरला रेल्वेच्या माध्यमातून दळणवळण सुविधा निर्माण करण्यासाठी सोलापूर-तुळजापूर-धाराशिव अशी ही मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा महत्वाचा रेल्वेमार्ग आहे. तसेच दक्षिण-उत्तर मार्ग जोडण्यासाठी तुळजापूर-सोलापूर मार्ग महत्वाचा आहे. २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव जिल्ह्यातील जनतेला या रेल्वेमार्गाबाबत शब्द दिला होता. यानुसार, मागील कित्येक वर्षांपासून या मार्गिकेच्या उभारणीची मागणी करण्यात येत होती. मात्र, महाविकास आघडी सरकारच्या काळात केंद्र सरकाराच्या प्रकल्पांचा निधी रोखण्यात आल्याने या मार्गाचे काम रखडले.
सोलापूर- तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात २२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर राज्याचा ५०% हिस्स्याचे ४५२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे रेल्वेने या प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा प्रकाशित केली. रेल्वेमार्ग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे टप्पे पाडण्यात आले आहेत. या एकूण ८४.४४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यात धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे केले आहेत. या रेल्वेमार्गावर एकूण ११० पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. तर १० स्थानक असणार आहेत. धाराशिव, सांजा, तुळजापूर, वडगाव, रायखेल, मालांबा, तामलवाडी, मार्डी, खेड, सोलापूर अशी १० स्थानके असतील. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ याना कनेक्टिव्हीटी मिळेल.
पहिल्या टप्प्यात तीन नवीन रेल्वेस्थानक

धाराशिव-तुळजापूर या ३० किलोमीटर रेल्वेमार्गावर तीन नवीन रेल्वेस्थानके उभारली जाणार आहेत. धाराशिव ते सांजा या १० किलोमीटर अंतरावर सांजा येथे पहिले रेल्वे स्थानक असणार आहे. सांजा ते वडगाव या १२ किलोमीटर अंतराच्या टप्प्यावर दुसरे रेल्वेस्थानक तर वडगाव ते तुळजापूर या आठ किलोमीटर अंंतरावर तिसरे स्थानक उभारले जाणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण चार स्थानके असणार आहेत. त्यात धाराशिव येथील सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. या मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे कामही सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0