अंबरनाथ नगरपरिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालयात साजरा झाला जागतिक पुस्तक दिन

25 Apr 2024 14:52:05

अंबरनाथ नगरपरिष, शिवप्रेरणा ग्रंथालय, जागतिक पुस्तक दिन, Ambernath Nagar Parish, Shivprerna Library, World Book Day
 
मुंबई : "उत्तम बोलण्यासाठी उत्तम वाचन हवं. एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर ते लिहिणारे लेखक कोण आहेत? त्यांच्याविषयी जाणून घेण्याचं कुतूहल विद्यार्थ्यांनी जोपसावं. यातूनच पुढे तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल" अश्या शब्दात अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी जागतिक पुस्तकदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साथला.
 
निवेदन, सूत्रसंचालन, अभिवाचन अशा विविध क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. कोणत्याही प्रकारच्या सादारीकरणासाठी उत्तम वाचन, योग्य संदर्भ काढणे, माहितीचे संकलन करणे अत्यंत आवश्यक असते. महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी या विषयावर विशेष सत्र अंबरनाथ नगरपरिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय, अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आले. ग्रंथपाल तपस्या नेवे यांनी त्याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.
 
जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या विषयावरील पुस्तकांचा संदर्भ घेऊन कविता वाचन, अभिवाचन, वक्तृत्व असे सादरीकरण केले. श्यामची आई पुस्तकातील प्रसंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, सफदर हश्मी यांची पुस्तकावरील कविता, पर्यावरण अशा विविध प्रकारच्या सादरीकरणासाठी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. यावेळी नगरपरिषदेचे प्रशांत पवार, महात्मा गांधी विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली जोशी, ग्रंथसखा वाचनालयाच्या ग्रंथपाल अर्चना कर्णिक आदि मान्यवर उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0