मृतदेहांचे उत्तमचि ते अग्निकर्म!

    24-Apr-2024
Total Views |
agnikarma
 
हे सूक्ष्मशरीर जन्मोजन्मी देहासोबत येते. आत्मा नित्य आहे, तर शरीर हे मात्र नश्वर आहे. आत्म्याने तर पुढील जन्माच्या यात्रेला प्रयाण केले आहे. उरलेल्या मृतदेहावर मात्र आप्तेष्ट व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. म्हणजेच स्थूल शरीराला अग्नीदेवाला समर्पित करून त्यास भस्मिभूत केले जात आहे. म्हणूनच तर ‘वेदमंत्रांशात भस्मान्तं शरीरम्’ असे म्हटले जाते.
ये निखाता ये परोप्ता ये दग्धा ये चोद्धिता:।
सर्वास्तानग्न आ वह पितृन्हविषे अत्तवे॥
(अथर्ववेद -१८/२/३८)
अन्वयार्थ
जे (निखाता:) जमिनीमध्ये पुरले गेले आहेत, (परोप्ता:) कोणत्याही संस्काराविना इतर ठिकाणी फेकले गेले आहेत, (दग्धा:) जे जाळले गेले आहेत, (उद्धिता:) कोण्या एका जागेवर उंच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत, (तान् सर्वान् पितृन्) त्या सर्व पालनकर्त्या वयोवृद्धांच्या मृतदेहांना (अग्ने हविषे अत्तवे) अग्नीद्वारे हविकर्मांच्या रूपात भक्षण करण्यासाठी (आ वह) घेऊन ये.
 
विवेचन
या मंत्रात निधन पावलेल्या व्यक्तीच्या मृत शरीरावर कोणकोणते क्रियाकर्म करावे, त्यासंदर्भात वेगवेगळे प्रकार वर्णिले आहेत. यात निखाता:, परोप्ता:, दग्धा:, उद्धिता: या चारांची गणना आढळते, पण त्यातही या चारहींमध्ये दग्धा: म्हणजेच अग्नीद्वारे प्रेताला दग्ध करणे अर्थातच अग्निसंस्कार करणे, ही क्रिया सर्वोत्तममानली आहे. वैदिक ऋषींच्या चिंतनात नेहमीच व्यापकता असते. मृतदेह म्हणजे केवळ माणसाचा नव्हे, तर तो कोणत्याही प्राण्याचा असो! त्या सर्वांच्या बाबतीत अंतिम संस्काराचा विचार करणे अगत्याचे ठरते. म्हणूनच वरील चार प्रक्रिया वर्णिल्या आहेत. त्यातदेखील ‘अग्ने हविषे अत्तवे!’ अग्नीद्वारे आहुतिरुपाने भक्षिण्यासाठी त्या मृतदेहांना घेऊन यावे, म्हणजेच मृतदेह अग्नीला समर्पित करावेत, असा मौलिक उपदेश मिळतो.
 
सद्ययुगात या जगात नानाविध संप्रदाय मृतदेहावर वेगवेगळ्या पद्धतीने अंत्यसंस्कार करतात. काहीजण ‘निखाता:’ म्हणजेच प्रेतांना जमिनीत उडतात. जसे की इस्लामी, ईसाई किंवा भारतातीलच लिंगायत वगैरे जनसमूह! काहीजण ‘परोप्ता:’ म्हणजेच प्रेताला पाण्यात किंवा जंगलामध्ये दूर अंतरावर फेकून देतात. जसे की, आपल्या देशातील काही साधूसंन्यासी लोकांची प्रेते नदीच्या पाण्यात प्रवाहित केली जातात. ‘दग्धा:’ म्हणजेच वैदिक धर्मी, पौराणिक हिंदू, जपानी, ब्रह्मदेशीय, नेपाळी वगैरे प्रेतांना जाळतात, तर ‘उद्धिता:’ म्हणजेच प्रेतांना उंच ठिकाणांवर नेऊन ते जीव-जंतूंना भक्षिण्यासाठी ठेवले जातात. जसे की पारशी इतर लोकसमुदाय या सर्वांनाच जणू काही या मंत्रात आवाहन करताना म्हटले आहे- ‘अग्ने हविषे अत्तवे!’ म्हणजेच आपण सर्वांनी काही जरी केले असले तरी मृतदेहांना अग्नीला समर्पित करणे, हेच सर्वोत्तम कार्य आहे.
 
मानवी देह हा पवित्र देह आहे. याच देहाच्या माध्यमाने आजपर्यंत आपण खूप चांगली कामे करून घेतली. काहींनी धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ साधले, तर काहींनी या तिन्ही बरोबरच मोक्षदेखील साधण्याचा प्रयत्न केला. आता मात्र या देहाचा शेवट झाल्यानंतर यावर विशेष संस्कार करणे गरजेचे ठरते.
 
संस्कृतात मृत्यूसाठी ‘पञ्चत्वं गत:!’ म्हणजेच पंचतत्वात विलीन होणे असे म्हटले जाते. आपले शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी बनले आहे. म्हणूनच मृत्यूनंतर आत्मतत्त्व निघून गेल्यावर या पाचही भूतांना लवकरात लवकर सूक्ष्मरूप प्रदान करून आपल्या मूलभूत रूपात पोहोचविणे, आपले कर्तव्य बनते, अशी आपली वैदिक संस्कृती सांगते. पृथ्वी म्हणजे भूमी किंवा माती नव्हे, जल म्हणजे केवळ पाणी नव्हे, वायू शब्दाचा अर्थ म्हणजे वाहणारी हवा नव्हे. आकाश म्हणजे केवळ विशाल पोकळी नव्हे, हे तर यांचे स्थूल रूप आहे. या स्थूल रूपांपेक्षाही त्यांचे सूक्ष्मरूप महत्त्वाचे ठरते. आपल्या दृष्टीस पडणारे हे पाच तत्व म्हणजेच त्यांचे स्थूल होय, तर न दिसणारे म्हणजेच अदृश्य असे सूक्ष्मरूप वेगळे आहे. मृत शरीराला अदृश्य म्हणजेच सूक्ष्म पाच महाभुतांमध्ये शीघ्रगतीने रुपांतरित होण्याचे एकमात्र साधन जर कोणते असेल? तर ते म्हणजे अग्नी होय. इतर सर्व तत्वेही उशिराने कामे करतात. पण, अग्नी हे एक असे साधन आहे की, जे कोणत्याही मोठ्यात मोठ्या वस्तूंची किंवा पदार्थांची काही वेळातच राखरांगोळी करते.
 
मृतदेहाला जमिनीमध्ये पुरल्यानंतर त्याचे मातीत रुपांतरित होण्यास किती तरी महिने लागतात. पाण्यात प्रवाहित केल्यास ती प्रेते पाण्याने फुगून सडू लागतात. पाण्यातील मासे व इतर जलचर प्राणी त्यांना भक्षण केले की, तेदेखील रोगी बनतात. देहाचे पाण्यात रुपांतर होण्यासाठी खूपच वेळ लागतो. प्रेतांना उंच जागी ठेवल्यावर त्यांचे मांस गिधाडे व इतर पक्षी भक्षण करतात व हाडे तशी शिल्लक राहतात. त्या हाडातूनही दुर्गंधी पसरू लागते. पण, अग्नीच्या माध्यमाने प्रेताचे दाहकर्म हे एक असे साधन आहे की, त्याच्या माध्यमातून मृतदेहाचे पाचही तत्व आपल्या मूळ स्वरूपात अति शीघ्रगतीने प्राप्त होतात.
 
याबाबतीत एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो म्हणजे शरीरातून आत्मतत्व निघून गेल्यानंतर जड पडलेल्या मृतदेहावर अग्नीने संस्कार केले काय किंवा त्याला भूमीत पुरले काय? देहावर कोणत्याही संस्कारांची छाप पडणारच नाही, तर मग कशासाठी अंतेष्टीसारख्या धार्मिक विधी? याचे समाधान विचारपूर्वक करता येईल. शरीराचे तीन प्रकार आहेत - १) स्थूल शरीर, २) सूक्ष्म शरीर आणि ३) कारण शरीर जे काही दृष्टीस पडणारे आहे व ज्याद्वारे आपण कर्म करतो, त्या सर्व कर्मांचा मूळ संचय सूक्ष्म शरीरात आहे. हे सूक्ष्म शरीर मोक्षापर्यंत जी आत्म्यासोबत राहत असते. जन्म जन्मांतरापर्यंत संचितकर्मांचे संस्कार हे सूक्ष्म शरीरासोबत निवास करतात. प्रयत्न करून माणूस या संस्कारांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो. यासाठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी मानव निर्मितीसाठी एक-दोन नव्हे, तर १६ संस्कारांची श्रृंखला प्रतिपादित केली आहे.
 
आजच्या वैज्ञानिक युगातदेखील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांच्या आधारे सिद्ध झाले आहे की, लहानसहान मुलांवर संस्कारांचा फार प्रभाव पडत असतो. ती मुले सूक्ष्म संस्कारांना ग्रहण करतात. अशी ही संस्कारित मुलेच देशाचे महान आधारस्तंभ ठरतात म्हणून तर बालकांना उत्तम विचारांच्या वातावरणात व सुसंस्कारांच्या परिसरात ठेवले जाते. यावरून हे सिद्ध होते की, अग्नीच्या माध्यमाने केले जाणारे संस्कार हे भौतिक शरीरावर होतात, तर त्यासोबत म्हटल्या जाणार्‍या मंत्रांचे संस्कार हे सूक्ष्म शरीरावर सूक्ष्मशरीराच्या अंतर्गत बुद्धी, पंचतन्मात्रा, सूक्ष्म पंचज्ञानेंद्रिय व पंचप्राण आणि सतरावे मन यांचा एक समुदाय येतो. या समुदायालाच तर सूक्ष्म शरीर असे म्हणतात. हे सूक्ष्मशरीर जन्मोजन्मी देहासोबत येते. आत्मा नित्य आहे, तर शरीर हे मात्र नश्वर आहे. आत्म्याने तर पुढील जन्माच्या यात्रेला प्रयाण केले आहे. उरलेल्या मृतदेहावर मात्र आप्तेष्ट व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. म्हणजेच स्थूल शरीराला अग्नीदेवाला समर्पित करून त्यास भस्मिभूत केले जात आहे. म्हणूनच तर ‘वेदमंत्रांशात भस्मान्तं शरीरम्’ असे म्हटले जाते. त्या त्या देहातील दुर्गंध वातावरणात पसरून वायू किंवा जल ही तत्वे दूषित होऊ नयेत, यासाठी त्या मृत शरीरावर अग्निसंस्कार, तर या संस्कारप्रसंगी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांद्वारे आत्मा व सूक्ष्म शरीराच्या उन्नयनासाठी केली गेलेली प्रार्थना! (क्रमश:)
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८