भास्कर जाधव ठाकरेंना ‘नकोसे’

    24-Apr-2024
Total Views |
भास्कर
 
योद्धा शरण जात नाही, तेव्हा त्याला बदनाम केले जाते...’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नुकतीच उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. पण, त्यांचा रोख सत्ताधार्‍यांकडे नव्हता, तर स्वपक्षातील कट-कारस्थानांना कंटाळूनच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पक्षनेतृत्व आपल्या नाराजीची दखल घेईल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, उद्धव ठाकरेंनी त्यांना फारसे महत्त्व दिले नाही. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांविरोधात रान उठविणारे भास्कर जाधव एकाएकी अडगळीत का गेले, ठाकरेंना ते नकोसे का झाले? याच्या मुळाशी जाता, त्याचे धागेदोरे ‘मातोश्री’च्या ‘किचन कॅबिनेट’पर्यंत पोहोचतात. रत्नागिरी आणि रायगड पट्ट्यात भास्कर जाधव यांच्या तोडीचा नेता उबाठा गटाकडे सध्यातरी नाही. आक्रमक शैली, भाषिक कौशल्य, पहाडी आवाज आणि सभा जिंकण्याचे कसब, या त्यांच्या जमेच्या बाजू. सत्ताबदलानंतर जाधव ज्या वेगाने पक्षनेतृत्वाच्या जवळ जात होते, ते पाहता भविष्यात कोकणात आपला निभाव लागणार नाही, अशी भीती ‘किचन कॅबिनेट’मधल्या दोन सदस्यांच्या मनात उत्पन्न झाली आणि तिथेच भास्कर जाधव यांचे पंख छाटण्याचा कट शिजला. त्यात भर म्हणजे, जाधव मुलाच्या आमदारकीसाठी आतापासूनच अडून बसले. गुहागरमधून मुलगा विक्रांत आणि चिपळूणमधून आपण स्वतः विधानसभा लढवू, यास दिशेने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. ही बातमी ‘एकात चार घालून’ पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात आली. भास्कर जाधव यांच्यासारख्या ‘फायरब्रॅण्ड’ नेत्याने लोकसभा जिंकण्यासाठी ताकद खर्ची घालण्याऐवजी मुलाच्या आमदारकीसाठी आतापासूनच तयारीला लागणे, ही बाब ठाकरेंना पटली नाही. त्यामुळे त्यांच्यावर खप्पामर्जी आली, ती कायमचीच! त्याचा फायदा घेत कोकणावर वर्चस्व राखू पाहणार्‍या ‘त्या’ दोन्ही नेत्यांनी भास्कर जाधव यांना लोकसभेच्या घोडेमैदानापासून लांब ठेवण्याचे नियोजन केले, त्यात ते यशस्वीही झाले. परिणामी, जाधव ना विनायक राऊतांच्या प्रचारात उतरले, ना अनंत गितेंच्या. किंबहुना, उद्धव ठाकरेंच्या दौर्‍याकडेही त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे येत्या काळात ते नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सांगलीत ‘अळीमिळी गुपचिळी’
 
ताकद नसताना, केवळ हट्टापायी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांवरही दावा ठोकला. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले खरे; मात्र हायकमांडच्या आदेशापुढे बोलणार कोण? सांगली लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती. कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेल्यामुळे ठाकरेंनी सांगलीत परस्पर उमेदवार जाहीर केला आणि वादाची ठिणगी पडली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील येथून तयारीत होते. पण, मविआची अधिकृत उमेदवारी चंद्रहार पाटलांच्या गळ्यात पडल्याने ते नाराज झाले. स्थानिक आमदार विश्वजित कदम यांच्यासह अन्य नेत्यांनी विशाल पाटलांच्या तिकिटासाठी शर्थीचे प्रयत्न केले, इतर मतदारसंघात असहकार्याचा इशारा दिला, बंडखोरीची धमकीही दिली. त्यामुळे तिढा हायकमांडच्या दारी गेला, पण शेवटपर्यंत तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. अशावेळी पक्षाची इभ्रत चव्हाट्यावर येऊ नये आणि अन्य मतदारसंघांत ठाकरेंच्या रोषाचा फटका बसू नये, यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. त्याचवेळी पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी, ‘काही बंडखोर्‍या या पक्षाच्या हातात राहत नाहीत, त्याला काही इलाज नसतो,’ असे सूचक विधान केले. त्यामुळे सांगलीत काँग्रेसचा नेमका विचार काय आहे, असा प्रश्न विशेषतः ठाकरे गटाला सतावू लागला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गोटात डोकावता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील किंवा ठाकरे गट, दोघांपैकी एकालाही दुखावून चालणार नाही, या भावनेपर्यंत काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि विक्रमसिंह सावंत पोहोचले आहेत. त्यामुळे आमदारकी राखण्यासाठी ते ’तू धरल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’ ही नीती अवलंबतील, तर वसंतदादा पाटील यांच्या नातवावर कारवाई केल्यास, सांगलीतील जनाधार गमावण्याच्या भीतीने काँग्रेस विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार नाही, असे संकेत मिळत आहेत. परिणामी, लोकसभेच्या प्रचारात काँग्रेसचे सर्व नेते चंद्रहार पाटलांच्या व्यासपीठावर दिसतील, पण प्रचार विशाल पाटलांचा करतील, अशी चिन्हे दिसून लागली आहेत.

-सुहास शेलार