प्रयोगशील पर्यावरणशाळा

24 Apr 2024 22:34:47
mansa 
 
‘ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत ‘ऋषी वाल्मिकी इको-स्कूल’ या प्रयोगशील-कृतिशील शाळेच्या कर्त्याधर्त्या निकिता पिंपळे-सावंत यांच्याविषयी...
 
मज आवडते ही मनापासूनी शाळा
लाविते लळा ही जसा माऊली बाळा...
 
केशवकुमारांच्या या ओळींना सार्थ ठरविणार्‍या शाळा आजच्या काळात तशा विरळ्याच. एकूणच शिक्षणव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना, अजूनही काही कर्तव्यतत्पर हात आपल्यापरीने पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशीच एका आगळ्यावेगळ्या शाळेचा प्रयोग असलेली ‘इको-स्कूल’ मुंबईतील गोरेगाव आणि मालाड येथे निकिता पिंपळे यांच्या पुढाकारातून सुरु आहे.
 
गोरगरिबांच्या आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी उभारलेल्या या शाळेच्या संस्थापिका निकिता पिंपळे-सावंत यांचा जन्म पालघरचाच. निकिता या लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि चपळ. वडील शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ असल्यामुळे घरचे वातावरण प्रारंभीपासूनच शैक्षणिक. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच निकिता यांनाही तीच शिकवण मिळाली. निकिता यांच्या जन्मानंतर अवघ्या वर्षभरात त्यांच्या वडिलांनी मालाडच्या मनोरी येथील छोट्याशा गावात समाजकार्याचा एक भाग म्हणून ‘ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. १९९० पर्यंत या संस्थेने आकार घेत, १९९० मध्ये ‘ज्ञानसाधना एज्युकेशन’ संस्थेच्या शाळेचीही स्थापना केली. या शाळेमार्फत गोरगरीब मुलांसाठी विशेषतः कोळी आणि आदिवासी समाजातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
 
एकीकडे मोठे होत असलेल्या निकिता यांच्यावरही हा संस्कार होत होता. थेट पहिलीला प्रवेश घेतलेल्या नगरपालिकेच्या शाळेनंतर ‘इंडियन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेमध्ये त्यांनी दुसरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, तर पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी ‘बिमानगर एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेमध्ये घेतले. भवन्स महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर, त्यांनी तिथेच पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. प्राणीशास्त्रामध्ये पदवीच्या शिक्षणादरम्यान त्यांना आपल्याला ‘जीवशास्त्र’ हा विषय खूप आवडतो, याचा साक्षात्कारही झाला. त्यानंतर शिक्षक व्हावे, या उद्देशाने त्यांनी २००५ मध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठातून ‘बीएड’ केले. शिकविण्यामध्ये रसही होता. पण, एक वर्षाच्यावर त्या शिक्षकी पेशातील नोकरीवर टिकू शकल्या नाहीत. वडिलांनी सरकारी शाळेतही नोकरीला लावले. पण, तिथेही पठडीतले शिक्षण आणि सर्जनशीलतेला वाव नसल्यामुळे निकिता यांचे मन रमेना. चौथ्याच दिवशी हीसुद्धा नोकरी सोडून त्या घरी आल्या आणि कुटुंबीयांचा अगदीच निरस झाला. २००७ पर्यंत मुंबईतील रुईया महाविद्यालयातून ‘ओशनोग्राफी’मध्ये त्यांनी आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.
 
एक दिवस वडिलांसोबत गोरेगावच्या झोपडपट्टीतील मुलांना भेटण्यासाठी गेल्यानंतर ते जगत असलेल्या आयुष्याची त्यांना कल्पना आली आणि हा दिवस त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या मुलांसाठी काम करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि २०१० साली वडिलांनी स्थापन केलेल्या ‘ज्ञानसाधना एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत अवघ्या चार वर्गांची ‘ऋषी वाल्मिकी इको-स्कूल’ सुरू केली. नऊ विद्यार्थ्यांचा हात धरून सुरू केलेल्या या शाळेने यशस्वी दशकाचा टप्पा पार केला असून, आता शाळेमध्ये ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
एवढ्यावरच न थांबता, त्यांनी ‘रेमेडियल एज्युकेटर कोर्स’ केला. तसेच, नामांकित 'TISS' म्हणजेच 'Tata Institute of Social Sciences' मधून २०१७ मध्ये ‘पोस्ट ग्रॅज्युएट काऊंसिलिंग’ डिप्लोमाही केला. अधिकाधिक उत्तम शिक्षण आणि व्यवस्था देता यावी यादृष्टीने नुकतेच २०२० मध्ये त्यांनी ‘स्कूल मॅनेजमेंट’ डिप्लोमाही पूर्ण केला. जवळजवळ गेली १४ वर्षे ही अनोखी शाळा चालविणार्‍या निकिता यांनी या शाळेचा अभ्यासक्रम, घेतले जाणारे उपक्रम या सगळ्यांमध्येच विचारशील फेरबदल केले. राज्य शासनाचा अभ्यासक्रम चालू ठेवला आहे. मात्र, त्यामध्ये कृतिशील आणि कथायुक्त शिक्षण, रेमेडियल एज्युकेशन, निसर्ग आणि पर्यावरणाचा समावेश असणारे वर्ग, वन्यजीवांविषयी माहिती देणारी सत्रे असा बहुआयामी विचार करण्यात आला आहे. या माध्यमातून वर्षभरात ३० ते ४० प्रजातींची माहिती विद्यार्थ्यांना होते. तसेच, व्यावसायिकता रूजविण्याच्या दृष्टीने आंत्रप्रिन्युरशिप प्रोग्रॅम, पब्लिक स्पिकिंग, भावनिक व्यवस्थापन, नेतृत्व कौशल्य, सोशियो-इमोशनल लर्निंग तसेच कराटे, फुटबॉल, कला अशा गोष्टींवरही भर दिला जात असल्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे.
 
या शाळेमध्ये ‘यंग नॅचरलिस्ट’ प्रशिक्षणही दिले जात असून यामधून अनेक मुले ‘नॅचरलिस्ट’ही झाली असून, शाळेमध्ये भेट द्यायला येणार्‍या पाहुण्यांना तेथील जैवविविधता दाखवायला घेऊन जातात. तसेच, या माध्यमातून पुढे गेलेली काही मुले केंद्रीय पातळीवरही कार्य करत आहेत. अनेक तरुण शिक्षक असलेली ही शाळा विद्यार्थ्यांचा अर्ध्याहून अधिक शिक्षणाचा खर्च उचलते. निकिता यांच्या या कामासाठी त्यांना ‘सँच्युरी एशिया’चा ‘ग्रीन टिचर’ पुरस्कार, ‘इनर व्हिल क्लब ऑफ बॉम्बे सेंटर’चा ‘चेंज मेकर पॉर इंडियन युथ’, ‘क्वेस्ट अ‍ॅण्ड नॅशनल लाँच पॅड’च्यावतीने ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर’ तसेच ‘रोटरी क्लब’च्या काही पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. या पर्यावरणशाळेची निर्मिती करणार्‍या कृतिशील, सृजनशील आणि कर्तव्यतत्पर शिक्षिकेच्या जिद्दीला दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून मनस्वी शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0