एकबाणी, एकवचनी श्रीराम...

24 Apr 2024 21:48:30
ram
 
रामाच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द विवेकधिष्ठित असल्याने तो निश्चियात्मक असतो. तो शब्द फिरवण्याची वेळ कधी रामावर येत नाही. म्हणून रामाला ‘एकवचनी’ म्हणून ओळखतात. कोणत्याही परिस्थितीत राम आपल्या वचनावरून मागे फिरत नाही.
 
रामदासस्वामींनी तत्कालीन परिस्थितीनुसार, सर्व देवांच्या कथेतरामकथा श्रेष्ठ आहे, असे सांगून ’रामासारखा देव नाही’ असा निष्कर्ष काढला. हे आपण यापूर्वीच्या लेखातून पाहिले. हा निष्कर्ष पुढील काळालाही लागू पडणारा आहे. तथापि, स्वामींच्या काळात त्याची अत्यंत गरज होती. आपल्या कार्याची सुरुवात करताना, लोकांना राम व हनुमान यांची उपासना सांगण्यामागे स्वामींच्या मनात अनेक हेतू होते. भक्ती करायची तर रामासारखे दैवत नाही, असे स्वामी का म्हणाले, यावर विचार करताना असे वाटते की, स्वामींच्या मनात हिंदवी स्वराज्याबरोबर रामराज्याचा संकल्प सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन जावा असे होते.
 
तत्कालीन जुलमी, अत्याचारी, न्यायाची चाड नसलेल्या म्लेंच्छ राजवटीला लोक कंटाळले होते. ती राजवट कधी बदलता येणार नाही, या विचाराने लोक गांगरून गेले होते. त्या काळात हिंदू धर्म व हिंदू संस्कृती, सदाचार यांची अवस्था बिकट झाली होती. लोकांना त्यातून बाहेर काढून, त्यांचे स्वातंत्र्य व स्वाभिमान अबाधित राखून स्वामींना आपली तीर्थक्षेत्रे, मंदिरे मुक्त करायची होती. लोकांना तीर्थयात्रेचा आनंद मिळवून द्यायचा होता. स्वामींच्याकार्याची ही दिशा होती. स्वामींना वाटत होते की, रामाच्या उपासनेने लोक रामराज्याबद्दल विचार करू लागतील. रामचरित्रातून लोकांना रामाच्याठायी असलेले अनेक गुणविशेष समजतील. रामचरित्रात रामाचे अनेक गुणविशेष आले आहेत. पण, त्याहीपेक्षा रामकथेतून रामाच्या वागण्याने व विवेकपूर्ण निर्णयांनी अनेक गुणांचे वेगळे पैलू समजूनयेतात आणि त्यापासून मिळणारा सात्विक आनंद अनुपमेय व प्रेरणादायी आहे. कोदंडधारी रामाच्या स्मरणातून, चिंतनातून अतुल पराक्रम, शौर्य, न्याय, नीती, राष्ट्रभावना, सुष्टीचे पालन, दुष्टांचे निर्दालन, कुटुंबाविषयी आदर, प्रेम, पितृ आज्ञेचे-इच्छेचे पालन, स्त्रीसन्मान इत्यादी उत्तम संस्कृतीवर्धक गुण शिकता येतात, याची जाणीव झाल्याने लोक रामराज्याचा आग्रह धरतील, असे समर्थांना वाटत होते. हनुमानाच्या उपासनेतून निःस्पृहता,निगर्वी पराक्रम, स्वामिनिष्ठा हे गुण शिकता येतात आणि त्यातून समाज सुसंस्कृत होत जातो.
 
मनाच्या श्लोकांत स्वामींनी जागोजाग रामाचे, त्याच्या गुणविशेषांचे वर्णन केलेले आहे. त्यापैकी रामाची विशेषतः थोडक्या शब्दांत सांगणारा श्लोक क्र. १३१ पुन्हा उद्धृत करतो-
भजाया जनीं पाहतां राम येकु।
करी बाण येकु मुखीं शब्द येकु।
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकू।
धरा जानकीनायकाचा विवेकु ॥१३१॥
 
वरील श्लोकात लोकांनी भक्ती करावी, असा हा राम एक असे स्वामी म्हणतात. धनुष्यबाण हे रामाच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. पराक्रमाची आठवण करून देणार्‍या रामाच्या हातातील बाण तोही एक. रामाच्या मुखी निश्चयात्मक असलेला शब्द एक. रामाच्या विचारात कसलाही संभ्रम नसल्याने त्याचे बोलणे निश्चयात्मक व त्यातून आलेला शब्द एक त्यात धरसोड वृत्ती तीळमात्र नाही. रामाच्या बाबतीत बोलायचे, तर त्याचे थोडक्यात वर्णन, एकबाणी, एक वचनी, एक पत्नी असे केलेले आढळते. यातून राम व रामकथा, चरित्र एकमेवाद्वितीय आहे, याची जाणीव होते. या प्रत्येक एकत्वात खूप अर्थ दडलेला आहे.
 
या श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत रामाचे वर्णनकरताना समर्थ सांगतात की, ‘करी बाण येकु’ असे रामाचे ध्यान करावे लागते. यातून रामाच्या अलौकिक पराक्रमाचे दर्शन घडते. रामाची पूजा, उपासना, चिंतन कोदंडधारी राम अशा स्वरुपात केले जाते. धनुष्यबाण हे रामाच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. धनुष्यबाण हा रामाच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. रामाला एकच बाण पुरेसा असतो. कारण, बाण सोडताना रामाचे चित्त आपल्या कार्यावर पूर्णतः एकाग्र असल्याने त्याचा वेध, नेम चूकत नाही. लक्ष्य कितीही प्रचंड आकाराचे, क्रूर, चपळ, मायावी, फसवे, वेगवान असले तरी पूर्ण एकाग्र चित्ताने सर्व शक्यता विचारात घेऊन धनुष्यातून सुटलेला जोरदारा गतिमान बाण लक्ष्याचा वेध घेतल्याशिवाय राहत नाही. रामाचा बाण कधीही फुकट जात नाही, अचूक परिणाम साधतो. त्यामुळे कुठल्याही बाबतीत अचूक निश्चयात्मक परिणाम साधण्याला ‘रामबाण’ हा शब्द रुढ झाला. राम एकबाणी आहे, तरी रामाच्या धनुष्यबाण उपयोगात, सर्व कृतीत, पराक्रमात विवेक आहे. रामाचा बाण, ‘परित्राणाय साधूनां। विनाशाय’च दुष्कताम्।’ या हेतूने दुष्टांच्या नाशासाठी चालवलेला असतो. त्याचे उद्दिष्ट सज्जनांचे रक्षण असते. रामाच्या प्रत्येक कृतीत विवेक असतो. राम हा राजा असला तरी रामाने आपल्या राज्यविस्तारासाठी किंवा सम्राट म्हणून मान मान्यता मिळवण्यासाठी शेजारच्या राज्यावर बाण सोडल्याचे उदाहरण नाही. रामाचा पराक्रम मान्य करून इतर राजांनी युद्धाची भाषा केलेली नाही. म्हणूनच रामराज्याची राजधानी अयोध्या या नावाने प्रसिद्ध आहे. राम हा एक आदर्श राजा आहे. राम हा मर्यादा पुरुषोत्तम राजा असल्याने रामाने सर्व ठिकाणी आपल्या आचरणाने आदर्श निर्माण करून ठेवले आहेत.
 
रामाच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द विवेकधिष्ठित असल्याने तो निश्चियात्मक असतो. तो शब्द फिरवण्याची वेळ कधी रामावर येत नाही. म्हणून रामाला ‘एकवचनी’ म्हणून ओळखतात. कोणत्याही परिस्थितीत राम आपल्या वचनावरून मागे फिरत नाही. दशरथाने पूर्वी केव्हातरी कैकयीला दिलेल्या वराची पूर्तता म्हणून तिने रामाला १४ वर्षे वनवासात धाडले. वास्तविक प्रत्यक्ष पित्याच्या तोंडून रामाला वनवासात जाण्याची आज्ञा झाली नव्हती. तरी पित्याने कैकयीला दिलेल्या वचनाखातर राम अयोध्या सोडून चित्रकूट पर्वतावर आला. रामाच्या विरहाने दशरथ मृत्यू पावला. तेव्हा, भरत रामाला शोधत चित्रकूट पर्वतावर आला. परिस्थिती बदलली असून राज्यरक्षणार्थ रामाने परत यावे, अशा भरताने आग्रह धरला, तरी रामांनी कैकयीला दिलेला शब्द पाळला व वनवासातून मागे परतले नाहीत.
 
रामचरित्रातील अनेक घटना पाहता, रामाचे आचरण विवेकपूर्ण आहे. रावणाला मारल्यानंतर ती भूमी आपल्या राज्याशी न जोडता तेथील राज्यपद बिभीषणाला दिले. युद्धात मदत करणार्‍यांच्या यथोचित सन्मान केला. राम मर्यादा पुरुषोत्तम असल्याने त्याच्या चरित्राच्या, विवेकी आचरणाचा अभ्यास केल्यास सर्व लोकांना आपल्या उद्धाराचा मार्ग सापडेल. राम राजा असला तरी एक पत्नी आहे. सीतेवर रामाचे अत्यंत प्रेम होते. अनेक संकटांशी सामना करून त्याने सीतेला सोडवून आणले. त्यामुळे रामाचा उल्लेख ‘सीताराम’ असा आढळतो. स्वामींना याची जाणीव असल्याने शेवटच्या ओळीत स्वामी रामासाठी ‘जानकीनायक’ शब्द वापरतात व त्याचा विवेक धरायला सांगतात, त्याचे अनुकरण करायला सांगतात. विवेक हा रामाचा गुणविशेष लोकांनी कसा आचरणात आणावा, हे स्वामी पुढील श्लोकात सांगणार आहेत.
(क्रमश:)
७७३८७७८३२२
Powered By Sangraha 9.0