मराठी चित्रपटसृष्टीत कुणाच्या नावमुळे कुणाला काम मिळत नाही”, अभिनय बेर्डेने महाएमटीबीला दिलेल्या मुलाखतीत नेपोटीझमवरुन महत्वाचे विधान केले.
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अनेक अजरामर कलाकृती भावी पिढीसाठी घडवून ठेवल्या. आणि आता त्यांच्या कलेचा वारसा त्यांची दोनही मुलं स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बेर्डे (Abhinay Laxmikant Berde) पुढे नेत आहेत. ती सध्या काय करते या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात करणाऱ्या अभिनयने आता रंगभूमीवर देखील पदार्पण केले आहे. रंगभूमीवरील पहिले AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून अभिनय बेर्डे रंगभूमीवर येत असून यात त्याच्या सोबतीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत असणार आहेत. या नाटकाच्या निमित्ताने ‘महाएमटीबी’शी गप्पा मारताना अभिनयने (Abhinay Laxmikant Berde) नेपोटीझमवर भाष्य करत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावामुळे कधीच कामं मिळाली नाही हे ठामपणे सांगितले.
अभिनय बेर्डे म्हणाला की, “आत्तापर्यंत मी ज्या-ज्या भूमिका साकारल्या त्या केवळ मी लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे म्हणून कधीच मिळाल्या नाहीत. पहिला चित्रपट मला मिळण्याचं कारण म्हणजे, माझी एक एकांकिका युथ फेस्टिवरला नंबरात आली होती. आणि मला पण बक्षीस मिळालं होतं. याची बातमी पेपरमध्ये आणि मला झी स्टुडिओजने ती सध्या काय करते या चित्रपटासाठी विचारणा केली. मुळात कुणाच्याही नावामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत काम मिळत नाही. कारण मराठी प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा एकमेकांशी संबंध हिंदी मनोरंजनसृष्टीपेक्षा अधिक आहे. प्रेक्षकांशी घट्ट नातं असण्याचं प्रमुख कारण म्हणजे आजही अनेक दिग्गज मराठीतील कलाकार नाटक करतात. आणि त्याचमुळे थेट रसिक प्रेक्षकांशी त्यांचा संवाद होतो आणि त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळते”.
पुढे अभिनय म्हणाला की, “माझ्या वडिलांचाच एक संवाद आहे मुळात कोणत्याही दगडाला आकार असावा लागतो. कुठल्याही दगडाला शेंदुर फासून देव बनवता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यात काहीतरी कला आणि आणि त्या कलेला आकार आहे. आणि मी केवळ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आहे म्हणून मला काम देणार नाही. मी आजही ऑडिशन देऊनच भूमिका मिळवतो. पण लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव माझ्याशी जोडलं गेल्यामुळे माझ्याकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. त्यामुळे मी एक नक्की सांगेन की मला प्रेम हे माझ्या वडिलांचा नावामुळे मिळतं आणि कामं ही माझ्यामुले मिळतात”, असे अभिनय नेपोटीझमच्या बाबतील आपलं मत मांडताना म्हणाला.