मनोज बाजपेयींनी आपल्या अभिनय कौशल्याला सिद्ध करत राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले आहे.
मुंबई : बिहार ते मुंबई असा अभिनयासाठी प्रवास करणारे अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांचा आज ५५ वा वाढदिवस. मनोज वाजपेयी यांचा जन्म २३ एप्रिल १९६९ ला बिहारमध्ये झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मनोज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी (Manoj Bajpayee) घरच्यांना आयएसचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे सांगितले होते. पण काही वर्षांनी मातीतला एक उत्तम नट तयार होत त्यांचे हे खोटे एका चांगल्या कारणासाठी हे मात्र सिद्ध झाले. चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारणारे मनोज वाजपेयी सध्या ओटीटी किंग झाले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या जीवनातील काही किस्से....
मनोज चाळीत राहत होता
मनोज बाजपेयी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा ते एका चाळीत राहत होते. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगताना म्हटले होते की दिवसभर मी कामात असायचो आणि रात्री शांत झोपी जाण्यासाठी ती खोली माझा आधार असायची.
नकारामुळे आत्महत्या करायची होती
मनोज यांना अनेक नकारांना सामोरे जावे लागले होते. त्यांना एनएसडीमधूनही नकार मिळाला होतो; आणि तो पचवू न शकल्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचेही विचार आले होते. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाले होते की, "सर्वात कठीण काळ तेव्हा होती जेव्हा माझी NSD साठी निवड झाली नव्हती. मी सातवीत असल्यापासून हे स्वप्न पाहिले होते. पण ते पुर्ण होणार नाही असं वाटल्यामुळे दु:खी झालो आणि मी आत्महत्या करण्याचा विचार केला. त्यावेळी माझे मित्र इतके घाबरलेले की ते झोपतानाही माझ्या एकदम शेजारी झोपायचे मला अजिबात एकटे सोडायचे नाही."
एकाच वेळी तीन प्रॉजेक्टमधून काढण्यात आले होते
मनोज यांना अभिनयाची प्रेरणा मिळाली होती ती त्यांच्याच गावातून. कारण ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर हे त्यांच्याच गावचे. त्यामुळे अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मुंबई गाठली होती. मात्र, इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. "मी वयाच्या १७ व्या वर्षी माझे गाव सोडले तेव्हापासून ती चार वर्षे ४० वर्षांसारखी वाटली. सर्व काही तुटत चालले होते, एकदा मला तीन प्रॉजेक्ट मिळाले, एक मालिका, एक कॉर्पोरेट चित्रपट, एक डॉक्युड्रामा आणि दुसरी सीरिज, पण मला एका दिवसात या सर्वांमधून बाहेर काढण्यात आले होते."
'सत्या'ने बदलले नशीब
१९९४ साली अखेर मनोज यांनी 'द्रोहकाल' मधील एका मिनिटाच्या भूमिकेतून आणि शेखर कपूरच्या 'बँडिट क्वीन' मधील एका डाकूच्या छोट्या भूमिकेतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर मनोज यांना छोटेखानी भूमिका मिळत गेल्या. पण १९९८ मध्ये आलेल्या राम गोपाल वर्माच्या 'सत्या' या क्राइम ड्रामामधील गँगस्टर भिकू म्हात्रे या भूमिकेने त्यांचे जीवनच बदलले. त्यानंतर गँग्स ऑफ वासेपूर, अलीगढ असे अनेक चित्रपट साकारत त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आणि त्यांची ही झेप थेट त्यांना राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन गेली. मनोज यांनी आत्तापर्यंत 'द फॅमिली मॅन' 'सिर्फ एक बंदा काफी है', 'किलर सूप', 'गुलमोहर' आणि इतर अनेक शो आणि ओटीटीवरील चित्रपटांमध्ये काम केले आहे.