अखिल भारतीय साहित्य संमेलनाला खेडेगावांचे वावडे?

    22-Apr-2024
Total Views |

sahitya sammelan 
 
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने दरवर्षी मराठी भाषिक प्रांतातील विविध गावात होत असतात मात्र अपुऱ्या सोयीसुविधा आणि संसाधनांची कमतरता खेडेगावात भासत असल्याने संमेलनानंतर मंडळावर महाराष्ट्रातून टीका होत असते. यावर्षी आलेल्या मुंबई, दिल्ली, इचलकरंजी, धुळे, कराड आणि सांगली पैकी धुळे कराड आणि सांगली (औंध, औदुंबर) या गावातील प्रस्ताव स्वीकारलेच गेले नाहीत तर मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी येथील अहवाल स्वीकारले गेले आहेत. रविवारी दि. २१ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती जाहीर करण्यात आली. लहान गावांमध्ये साहित्य संमेलन यापुढे होणारच नाही, अशा असायच्या अशा चर्चा साहित्य वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
 
प्रतिक्रिया -
 
संमेलने केवळ शहरण्ट होतील असा निर्णय मंडळाने घेतलेला नाही!
यापुढील साहित्य संमेलने केवळ शहरांतच होतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला नाही. यावर्षी आलेल्या ६ प्रस्तावांमधून केवळ, दिल्ली, मुंबई आणि इचलकरंजीच्या प्रस्तावांचा विचार केला जाईल तर इतर प्रस्तावांचा स्वीकार निदान यावर्षी करण्यात आलेला नाही असा निर्णय झाला आहे.
उषा तांबे
अध्यक्ष, मराठी मंडळ
 
गावांपर्यंत संमेलनाने पोहोचायला हवे!
प्रकृतीच्या कारणास्तव मी मुंबईतील बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही, परंतु यापुढील संमेलने केवळ शहरांत भरवण्यात यावीत ही मागणी रास्त नाही. साहित्यिकांनी आणि संमेलनांनी गावागावांत पोहोचायला हवे. तसेच संमेलनासाठी उपलब्ध होणारा ७० टक्के निधी जो व्यवस्थापनासाठी खर्च होतो, तो केवळ साहित्य आणि साहित्यिकांसाठी खर्च व्हावा. म्हणजे खेडेगावांमधून संमेलने घेण्यास अडचणी येणार नाहीत.
नरेंद्र पाठक
संमेलन समन्वयक, अमळनेर
 
लहान गावात संमेलन -
 
फायदे
१ गावागावातील साहित्य रसिकांपर्यंत साहित्यिक पोहोचतात.
२ स्थानिक ग्रामीण संस्कृती मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते.
३ साहित्यिकांना संमेलनाच्या निमित्ताने गावांच्या भेटी घडतात.
४ स्थानिक उद्योग धंद्यांना चालना मिळते.
५ साहित्य रसिकांची भेट महाराष्ट्राच्या विविध प्रांतात होते आणि त्यानिमित्ताने अभिरुची संपन्न होते.
 
तोटे
१ लोकसंख्या कमी असल्याने खर्चाचा बोजा गावावर पडतो.
२ भेट देणाऱ्या साहित्यिकांची गैरसोय होते.
३ दळणवळणाच्या सोयी मर्यादित असतात.
४ गाव आडवाटेस असल्यास संमेलनास गर्दी होत नाही.
५ साहित्य संमेलन केवळ औपचारिकता म्हणून संपन्न होतं.
 
मोठ्या शहरांत संमेलन
 
फायदे
१ सुखसोयी, दळणवळणाच्या साधनांची मुबलकता असल्याने आयोजकांवर फारसा भार पडत नाही.
२ निवास व्यवस्थेचा प्रश्न उरत नाही.
३ लोकसंख्या जास्त असल्याने रसिकांची वर्दळ असते.
४ आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास फारशी तजवीज करावी लागत नाही.
५ आर्थिक पाठबळ मुबलक मिळवता येते.
 
तोटे
१ गावाच्या तुलनेत जागेची कमतरता असते.
२ ग्रामीण माणूस संमेलनास जोडला जात नाही.
३ विविध बोलींचा म्हणावा तेवढा सन्मान शहरातील संमेलनात होत नाही.
४ महाराष्ट्राच्या वैविध्याची दखल शहरातील संमेलनात घेतली जात नाही.
५ संमेलनाव्यतिरिक्त संस्कृतीच्या संवर्धनास चालना मिळत नाही.