छत्तीसगढमध्ये भाजपची पुन्हा मुसंडी?

22 Apr 2024 21:12:05

chattisgarh
छत्तीसगढमधील लोकसभेच्या ११ पैकी भाजप किती जागा जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या. आता भाजप सर्व ११ जागा जिंकतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
लोकसभा निवडणुका सात टप्प्यांमध्ये होत असून, त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी पार पडले. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यातील एकूण १०२ जागांसाठी त्या दिवशी मतदान पार पडले. देशाच्या विविध भागांमध्ये कडक उन्हाळा असूनही पहिल्या मतदान फेरीत ६५.५ टक्के मतदान झाले. मागील २०१९च्या निवडणुकीत झालेल्या ६६ टक्के मतदानाच्या तुलनेत मतदान थोडे कमी झाले असले, तरी एकूण शांततापूर्ण मतदान झाले. ज्या राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झाले, त्यामध्ये छत्तीसगढ राज्यातील बस्तर या नक्षलग्रस्त प्रभावित मतदारसंघाचाही समावेश होता. बस्तरमध्ये शांततापूर्ण मतदान झाले.
 
बस्तर मतदारसंघात नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मतदारांना केले होते. पण, त्या धमकीची पर्वा न करता मतदार मोठ्या संख्येने मतदानात सहभागी झाले होते. बस्तरमध्ये ६७ टक्के मतदान झाले. नक्षलग्रस्त भागातील मतदारांना मतदानासाठी दूरवर जावे लागू नये, म्हणून यावेळी प्रथमच ५६ खेड्यांमध्ये मतदानकेंद्रे उभारण्यात आली होती. त्या केंद्रांवरही मतदारांनी गर्दी केली होती. शुक्रवार, दि. १९ एप्रिलच्या मतदानाआधी काही दिवस बस्तर भागातील कांकेर-नारायणपूर सीमेवर सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी मारले गेले होते. पण, या घटनेचा विपरीत परिणाम मतदानावर झाला नाही.
 
छत्तीसगढमध्ये गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र केल्याने माओवादी सुरक्षा दलांच्या गोळ्यांना बळी पडत आहेत. छत्तीसगढ राज्यातील ही सर्वात मोठी नक्षलवादविरोधी मोहीम मानली जात आहे. याआधी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये २०१८ साली हाती घेतलेल्या मोहिमेत ३७ माओवादी मारले गेले होते. कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे त्या भागातील मतदान व्यवस्थित पार पडले. बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा मतांची शक्ती ही प्रबळ असते हे बस्तरमधील मतदारांनी दाखवून दिले. बस्तरमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चुरस आहे. भाजपने या मतदारसंघात महेश कश्यप यांना उभे केले आहे, तर काँग्रेसने विद्यमान आमदार कवासी लखमा यांना उभे केले आहे. हा मतदारसंघ मागास जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे.
 
बस्तरमधील मतदान एकंदरीत शांततेत पार पडले. आता या राज्यातील अजून दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये तीन जागांसाठी शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी आणि तिसर्‍या टप्प्यामध्ये उरलेल्या सात जागांसाठी मंगळवार, दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगढमध्ये लोकसभेच्या एकूण ११ जागा आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत या राज्यातून भाजपचे दहा खासदार निवडून आले होते, तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. तर, २०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपची एक जागा कमी झाली होती आणि त्या पक्षास नऊ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसच्या पारड्यात एका जागेची भर पडून त्या दोन जागा झाल्या होत्या.
 
२०२३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली होती. त्यामुळे भ्रष्टाचाराचे विविध आरोप असलेल्या भूपेश बघेल यांना सत्तात्याग करावा लागला होता. त्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ५४, काँग्रेसला ३५ आणि गोंडवन गणतंत्र पक्षाला एक जागा मिळाली होती. छत्तीसगढ राज्यामध्ये लहानमोठे असे प्रादेशिक पक्ष असले, तरी त्यांच्या निवडणुकांवर काही प्रभाव पडत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातच लढत होत असल्याचे दिसून आले आहे.
 
या राज्यातील केवळ बस्तर मतदारसंघात मतदान झाले आहे. हा नक्षलग्रस्त भाग असल्याने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये म्हणून त्या मतदारसंघात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आळा होता. एकूण ६० हजार जवान तैनात करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दलाचे निम्मे जवान होते. बस्तर मतदारसंघात हिंसाचाराच्या दोन घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या पुवर्ती या गावातील ग्रामस्थांनी मात्र मतदानावर बहिष्कार टाकला होता.
 
राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यात ५० नक्षलवाद्यांची हत्या केली होती. याच कालावधीत माओवाद्यांनी ७४ लोकांची हत्या केली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी कांकेर जिल्ह्यात २९ नक्षलवाद्यांची हत्या केल्याच्या घटनेबद्दल राज्य शासनाचे आणि सुरक्षा दलाच्या जवानांचे कौतुक करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री बघेल यांनी, या नक्षलवाद्यांना खोट्या चकमकीत मारल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री बघेल यांनी केलेल्या आरोपांचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी खंडन केले. या खोट्या चकमकी असल्याचे भूपेश बघेल यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान त्यांना देण्यात आले, तर असा आरोप केल्याबद्दल भूपेश बघेल यांनी सुरक्षा दलांच्या जवानांची माफी मागावी, अशी मागणीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नका, असा सल्लाही या नेत्यांनी भूपेश बघेल यांना दिला.
 
बस्तरमधील मतदान पार पडल्याने आता त्या राज्यात जान्ज्गीर-चाम्पा, रायगड, सुरगुजा, राजनंदगाव, महासमुंद, कांकेर, दुर्ग, रायपूर, बिलासपूर आणि कोरबा या दहा मतदारसंघात निवडणूक होणे बाकी आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल आणि मंगळवार, दि. ७ मे रोजी उर्वरित मतदान पार पडल्यानंतर निकालाच्या दिवसाची म्हणजे मंगळवार, दि. ४ जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भाजपने आपल्या सर्व ११ उमेदवारांची नावे सर्वात आधी घोषित केली होती. भाजपने रायपूर मतदार संघातून ब्रिजमोहन अगरवाल यांना उभे केले आहे, तर तीन महिला उमेदवारांना भाजपने तिकीट दिले आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर महासमुंद मतदारसंघात तमराध्वज साहू यांना आणि राजेंद्र साहू याना दुर्गमधून उमेदवारी दिलेली आहे.
 
विविध प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप ज्या भूपेश बघेल यांच्यावर आहेत, त्यांना लोकसभेचे तिकीट देऊन काँग्रेस मतदारांना कोणता संदेश देऊ इच्छित आहे? भूपेश बघेल हे २०१६ मध्ये एका वादग्रस्त सीडी प्रकरणात अडकले होते. “मला या प्रकरणात अडकवले जात आहे. पण, मी निर्दोष आहे,” असे बघेल त्यावेळी म्हणाले होते. २०२३ मध्ये राईस मिल गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने त्यांच्यावर आरोप ठेवले होते. पण, बघेल यांनी त्या आरोपांचे खंडन केले होते. छत्तीसगढ राज्यातील एका दारू घोटाळ्याशी त्यांचे नाव जोडण्यात आले होते. भूपेश बघेल यांचे नाव जोडण्यात आलेला आणखी एक मोठा घोटाळा म्हणजे महादेव अ‍ॅप घोटाळा. महादेव अ‍ॅपच्या चालकांनी भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपयांची लाच दिली होती, असा आरोप ‘ईडी’ने केला होता. पण, या आरोपांचेही बघेल यांनी खंडन केले होते. आपली प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याचा प्रयत्न ‘ईडी’ करीत आहे, असा उलट आरोप बघेल यांनी केला होता.
 
छत्तीसगढमधील लोकसभेच्या ११ पैकी भाजप किती जागा जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१४ मध्ये भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या. आता भाजप सर्व ११ जागा जिंकतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बघेल यांना सत्तेवरून बाजूला सारून, त्या राज्यात भाजप सत्तेवर आले आहे. विधानसभा निवडणुकांप्रमाणेच छत्तीसगढचा मतदार भाजपच्या पारड्यात पुन्हा घसघशीत मतदान टाकतो का, हे आता पाहायचे!
९८६९०२०७३२
Powered By Sangraha 9.0