समाजाला आणि विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम देण्यासाठी सतत धडपडत असणारे शिक्षक हेमंत नेहते यांच्या विषयी...
पुस्तकाच्या पानातील जिला उमगली शाई
माझी आई भीमाबाई झाली पुस्तकांची आई
या ऐश्वर्य पाटेकर यांच्या कवितेतील ओळी आठवण्याचे कारण म्हणजे पुस्तक आजी भीमाबाई जोंधळे यांच्या ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’ सोबत हेमंत नेहते यांच्या पुढाकारातून ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्यावतीने ‘आठवणीतील वाचन’ या एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० वाचनप्रेमींनी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या विषयावरचे वाचन केले. असे अनेक वाचन विषयक उपक्रम राबवून वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व म्हणजे हेमंत नेहते हे आहेत. हेमंत यांचा जन्म दि. २ जून, १९७६ रोजी पाडळसे (जिल्हा जळगाव) येथे झाला. हेमंत यांना शिक्षकी पेशाचे बाळकडू त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाले. १९८५ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी इयत्ता दुसरीपासूनचे शिक्षण जिल्हा परिषद हंबडी येथून घेण्यास सुरुवात केली. पुढे अकरावी-बारावी पी. एस.एम.एस. स्कूल बामणोद येथे करून ‘डीएड’ पदविका अमरावती येथे प्राप्त केली.
हेमंत हे मुंब्र्यातील ज्ञानदीप विद्यामंदिरात गेल्या २८ वर्षांपासून अव्याहत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. ते केवळ शिक्षक म्हणून कार्य करत नाहीत, तर ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विविध उपक्रमात त्यांचे मोलाचे योगदान असते. ते पेशाने शिक्षक असले तरी त्यांचा पिंड साहित्यिकाचा आहे. त्यामुळे लिहिण्याबरोबरच वाचनाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. त्यांनी बेस्ट कॉलर, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रभावी भाषणे, कहाणी एका मिसाईल मॅनची, भाषिक खेळ, सप्तरंगी कविता मैफील अशी पाच पुस्तकांचे लेखन केले आहे व १५ पुस्तकांचे दहा दिवाळी अंक आणि विशेषांकाचे संपादन केले आहे. त्यामुळे समाजात वाचन संस्कृतीची मुळे रूजविण्यासाठी ते आघाडीवर असतात, त्यासाठी त्यांची अव्याहत धडपड सुरू असते.
जानेवारी महिन्यात ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्यावतीने आयोजित पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम, फेब्रुवारी महिन्यात मराठी दिनाचे निमित्ताने भाषा विषयक विविध स्पर्धा, मार्च महिन्यात मुलींसाठी विनामूल्य पुस्तक वितरण, एप्रिल महिन्यात ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आयोजित ‘बुक स्ट्रीट’ , मे महिन्यात बाल साहित्यिक व वाचक यांना यांच्यासाठी अक्षरआनंद ऑनलाईन बाल विशेषांकाचे प्रकाशन, ऑक्टोबर महिन्यात ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्यावतीने अखंड वाचन यज्ञ, विविध साहित्यिकांची, वैज्ञानिकांची, क्रांतिकारकांची जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुस्तक प्रकाशन आणि त्यावर आधारित संस्कार स्पर्धा यामध्ये त्यांचा सक्रिय पुढाकार असतो. वाचन संस्कृतीसाठी ते विनामूल्य पुस्तके भेट म्हणून देण्याचा उपक्रम अव्याहतपणे राबवतात.
अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान कल्याणतर्फे डोंबिवलीतील मान्यवर मुख्याध्यापिका व शैक्षणिक संस्था संचालिका अश्विनी साने यांचे कृतज्ञता सोहळ्यानिमित्त पुस्तकतुला करून त्यातील पुस्तके ४० शाळांना भेट दिली. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या राज्यव्यापी वाचन चळवळीत डॉ. योगेश जोशी यांच्यासह हेमंत नेहेते यांचा घरोघरी पुस्तक’ या उपक्रमात सहभाग आहे. ५० हून अधिक जिल्हा परिषद शाळा, आश्रम शाळा, विविध ग्रंथालयांना सुमारे ५० हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचे अमूल्य योगदान हेमंत यांनी दिले आहे. राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्या स्मरणार्थ राबविण्यात येणार्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त हेमंत यांनी ‘अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान’ व ‘आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था’ यांच्यावतीने १८५ शाळांना ११ हजार ,१११ पुस्तके भेट दिली. भुसावळ आणि ठाण्यातील ५५ शाळांना पुस्तके भेट दिली आहेत. महापुरात नुकसान झालेल्या सांगलीतील शतकोत्तर वाचनालयाला मदतीचा हात दिला.त्यांच्या या पुस्तक दानाच्या कार्याची नोंद ‘बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली आहे.
विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागावी, यासाठी कोरोना काळातहीे विद्यार्थ्यांना दररोज मोबाईलवर ऑनलाईन एक मराठी व इंग्रजी कथा पाठवून त्याचे वाचन लेखन करून घेतले. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. ‘कन्यारत्न पुरस्कार मुलगी वाचवा’, ‘स्त्री भ्रूण वाचवा’ या योजनेअंतर्गत, ६ हजार, ५०० मातांचा सत्कार-सन्मान केला आहे. हेमंत यांच्या समन्वयातून ‘अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान’चे माध्यमातून विश्वविक्रमी पोएट्री मॅरेथॉन उपक्रम म्हणजे दि. १८ एप्रिल ते २३ एप्रिल, २०१९ या कालावधीत यांनी हे ८५ तास सलग कविता वाचनाचा उपक्रम हा आहे. यामध्ये १०७५ कवी सहभागी झाले होते. ४१ सत्रांमध्ये आयोजित या उपक्रमासाठी ४१ सूत्रसंचालक होते . भव्य पुस्तक प्रदर्शन, भव्य चर्चा परिसंवाद या सगळ्याची नोंद विविध बुक रेकॉर्डने घेतलेली आहे. बालजल्लोष, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्पर्धांचे ते आयोजन करतात. समाजाला आणि विद्यार्थ्यांना सतत नवनवीन उपक्रम देण्यासाठी ते सतत धडपडत असतात. ठाणे महानगरपालिकेनेही त्यांचा ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ देऊन गौरव केला आहे. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली आहे. आजवर सुमारे ५० पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत वाचन संस्कृती नेणार्या हेमंत नेहते यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. मुंबई तरुण भारत कडून शुभेच्छा!