नेपाळमध्येही हिंदू धोक्यात

21 Apr 2024 21:14:03

nepal
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, दगडफेकीची ही काही नेपाळमधील पहिली घटना नाही. मागील वर्षीही नेपाळमध्ये श्रीरामनवमीला जनकपूर येथे शोभायात्रेवर दगडफेक झाली होती. हिंदूबहुल असलेल्या नेपाळमध्ये मागीलवर्षी पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता. हाच प्रकार सलग दुसर्‍या वर्षी घडल्याने आता नेपाळमधील हिंदू भयभीत झाले आहे. 
 
अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरात रामललाला अभिषेक झाल्यानंतर, जगभरातील हिंदूंनी बुधवारी श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. मात्र, नेपाळमध्ये काही ठिकाणी झालेल्या दगडफेकीमुळे श्रीरामनवमी उत्सवाला गालबोट लागले. नेपाळच्या मोरंग जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकांवर कट्टरतावाद्यांनी हल्ले केले. यावेळी अनेक हिंदू नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आले आहेत. मोरंग जिल्ह्यातील विराट नगर भागात रामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शेकडो हिंदूंनी सहभाग घेतला. ही मिरवणूक विराटनगर येथील मुस्लीमबहुल मानल्या जाणार्‍या प्रभाग क्र.१७ मधून जाणार होती. या प्रभागात राहणारा मजहर आलम हा हिंदूविरोधी अनेक वादांमुळे नेहमी चर्चेतअसतो. मजहरने मोठ्या संख्येने मुस्लीम समाज जमवला होता. त्यांनी मिरवणूक थांबवली आणि पुढे न नेण्याचा इशारा दिला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. हिंदूंनी मुस्लिमांच्या आडमुठेपणाचा निषेध केल्यावर त्यांनी दगडफेक सुरू केली. विशेष म्हणजे, हा सर्व हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. हल्ल्यादरम्यान हिंसक जमावाने ’अल्लाह-हू-अकबर’ आणि ’नारा-ए-तकबीर’च्या घोषणा दिल्या. घटनास्थळी विटांचा ढीग, तर जमावाच्या हातात लाठ्या-तलवारीही होत्या. शोभायात्रेत सहभागी झालेल्या काही वाहनांची जमावाने तोडफोड केली. पोलिसांसमोरच दगडफेक झाली. काही कट्टरतावाद्यांचा जमाव जवळच्या मंदिरात घुसला. मंदिरात लपलेल्या एका मुलाच्या डोक्यावर तलवारीचे वार करण्यात आले होते. तलवारीच्या हल्ल्यामुळे मुलाच्या कवटीला खोल जखमा झाल्याची माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे. 
 
मिरवणुकीसाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगत पोलीस प्रशासनाने आयोजकांनाच अटक केली. मात्र, हिंदूंनी एकजूट दाखविल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, मजहरवर दोन देशांचे नागरिकत्व घेतल्याचा आरोप आहे आणि तोच आता नेपाळ प्रशासनासोबत दोन्ही बाजूंमध्ये शांतता व चर्चा घडवून आणण्याचे काम करत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातही नेपाळमध्ये हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण झाला होता. म्यानमार आणि बांगलादेशातून पलायन करणारे रोहिंग्या मुस्लीम आता नेपाळमध्ये आसरा घेत आहेत. नेपाळमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जवळपास पाच टक्के आहे. मात्र, तरीही आता नेपाळमध्ये हिंदू-मुस्लीम तणाव ही नेहमीची गोष्ट झाली आहे. रोहिंग्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे नेपाळची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळने २००७ साली धर्मनिरपेक्षतेला स्वीकारले खरे मात्र आता त्याला नेपाळमध्ये तीव्र विरोध होत आहे. मोठ्या संख्येने हिंदू नागरिकांनी रस्त्यावर उतरत राजेशाही पुन्हा आणून हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली आहे. राजेशाही गेल्यानंतर तब्बल १३ सरकारे आली. मात्र तरीही नेपाळमधील राजकीय अस्थिरता अद्याप कायम आहे. मागील वर्षी बागेश्वर बाबा यांनी नेपाळमध्ये सत्संग घेऊन नेपाळला हिंदू राष्ट्र बनविण्याची मागणी केली होती. एकूणच नेपाळने वेळीच सावध होत आपली सनातन ओळख जपावी, अन्यथा तोपर्यंत फार उशीर होईल.
-७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0