मध्य रेल्वे महाव्यवस्थापक पाहणी दौऱ्यासाठी पहाटेच हिल स्टेशनवर

20 Apr 2024 14:07:15

railway
मुंबई, दि.१९ : पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासात अडथळा निर्माण होतो. इतकेच नाही तर दरड कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. हे रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून पावसाळापूर्व विविध खबरदारीचे उपाय योजना केली जातात. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शुक्रवार दि.१९ रोजी पुणे-मुंबई मार्गावरील कर्जत - लोणावळा विभागाची सर्वसमावेशक मान्सूनपूर्व पाहणी केली.

मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावरील कर्जत - लोणावळा विभागात ५२ बोगदे, २५० मीटर पर्यंत उंच टेकड्या आणि तीव्र उतारांसह तीक्ष्ण वक्र असलेला हा विभाग मुंबई विभागाच्या कामकाजासाठी महत्त्वाचा आहे. हे पाहता यादव यांनी गुरुवार पहाटे लोणावळायेथील मंकी हिल बोगदा घाटाची पाहणी केली. हा बोगदा मुंबई आणि पुणे यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.
महाव्यवस्थापक यादव यांनी ट्रॅक आणि टेकडी या दोन्ही भागांची पाहणी केली. गुरुवार दि.१८ रोजी ट्रॅक तपासणीसाठी विशेष तपासणी कारचा वापर केला. दि.१९ रोजी खडक कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या कारणांची माहिती समजून घेतली. तसेच, उपाययोजना करण्यासाठी टेकडी आणि टेकडी उताराची तपासणी केली. यावेळी त्यांनी कॅच वॉटर ड्रेनच्या देखभालीची देखील पाहणी केली. कॅच वॉटर ड्रेन धोका टाळण्यासाठी डोंगर उतारावरून पाणी वळवण्यात महत्त्वपूर्ण आहे.

महाव्यवस्थापकांचा हा दौरा एक ऐतिहासिक आणि उल्लेखनीय दौरा आहे. कारण महाव्यवस्थापक स्तरावरील अधिकाऱ्याने पहाटे पाच वाजता पाहणीसाठी टेकडीवर चढाई करण्याची बहुधा पहिलीच वेळ होती. जवळपास ३.५किलोमीटरचे अंतर कापून सुमारे सकाळी ७ वाजता ते टेकडीच्या शिखरावर पोहोचले. डोंगराळ मार्गाने, टेकडीच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर मंकी हिल केबिन ते ठाकूरवाडीपर्यंतच्या सर्व संवेदनशील ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या टेकडी पाहणीदरम्यान महाव्यवस्थापकांसोबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0