घागर में सागर!

    20-Apr-2024
Total Views |
bhirbhira
सह्याद्री’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील निर्माते आणि माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे यांचे ’भिरभिरं’ हे पुस्तक त्यांनी वेळोवेळी केलेल्या विविधांगी लेखनाचा संग्रह आहे. त्यांनी कथांपासून ललितलेखांपर्यंत निरनिराळे लेखनप्रकार हाताळले आहेत. या संग्रहात त्यांच्या आठ कथा आहेत. त्यातील ‘पेशंट’ आणि ‘भिरभिरं’ या कथा १९८०च्या दशकात ‘सत्यकथा’ मासिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, आजही त्या ताज्या वाटतात. ‘भिरभिरं’ ही अगदी अनोखी कथा. अनंत विचार-संवाद यांच्या कोलाहलातून वाट काढत जाणारी ही कथा कथानायकाला महसूल लिपिकाची नोकरी मिळाल्यावर आनंददायी झालेल्या वातावरणाच्या टप्प्यावर संपते. भिरभिरण्याला स्थैर्य मिळते, असा संकेत देणारी ती कथा.
 
‘प्रवास’ या रूपककथेत लेखकाने एकाच गर्भाशयातील दोन जीव नव्याने जन्म घेत असताना, त्यांची अधीरता; परस्परांना सावरत-साथ देत करीत असलेला प्रवास; सुखाच्या इप्सितापर्यंत पोहोचण्याची वेळ आल्यावर दुसर्‍या जीवाचा जीव घेण्यापर्यंत एकाची गेलेली मजल; जवळ आहे असे वाटणारे सुख प्रत्यक्षात दूरच आहे, असा आलेला अनुभव याचा मागोवा घेतला आहे. या कथेला लेखकाने दिलेली कलाटणी मुळातूनच वाचायला हवी. नवीन आलेल्या, वरवर गंभीर भासणार्‍या साहेबाचे रंग कसे बदलतात आणि तोही सहकार्‍यांमधीलच एक होऊन जातो, याचे वर्णन ‘कळप’ या कथेत लेखकाने केले आहे, तर ‘पेपरवेट’ कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेल्या; आपल्या भावनांच्या कोंडीत सापडलेल्या नंदा या स्त्रीची कथा आहे. ‘माणसाच्या मनातल्या प्रत्येक गोष्टीवर काळाचे, परिस्थितीचे सुंदर पेपरवेट ठेवलेले असते’ असे वाक्य कथानायिकेच्या तोंडी घालून लेखकाने या कथेचे मर्म त्यातून उलगडले आहे. ‘डमी’, ‘हायफन’ या कथाही वाचनीय आहेत. ‘नदीकाठचे दिवस’ हा पुस्तकातील एकमेव ललितलेख स्मरणरंजन करणारा आहे.
 
‘मुलखावेगळी माणसे’ या विभागात लेखकाने ज्या माणसांबद्दल लिहिले आहे, ती खरोखरच ‘मुलखावेगळी’ आहेत. ‘अस्सल खाकी चेहरा’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील इफ्तेकार या अभिनेत्याबद्दलचा लेख. इफ्तेकार हा ‘फाईन आर्ट्स’ची पदविका घेतलेला चित्रकार होता; मेहंदी हसन या गजलगायकाला भारतात सर्वप्रथम इफ्तेकारने ‘पेश’ केले, अशी अनोखी माहिती लेखक देतो. ‘कुत्तेवाले खरे’ हा मुंबईतील पश्चिम बोरिवलीतील पुरुषोत्तम खरे यांच्यावरील लेख. नोकरीतून मिळणारे वेतन चरितार्थासाठी पुरत नाही, म्हणून खरे यांनी जोडधंदा म्हणून कुत्रे पाळणे आणि त्यांना गस्त इत्यादी प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय सुरु केला; ते प्रशिक्षित कुत्रे ‘हॅन्डर’ संध्याकाळी गस्तीसाठी घेऊन जात आणि सकाळी पुन्हा आणून सोडत.
 
चित्रपटांत कुत्र्यांची भूमिका असली तर तेथेही खरे यांच्याकडून कुत्रे घेऊन जात असत. घडाळ्यांचा संग्रह करणारे विष्णू खांडेकर, नकलाकार सदानंद जोशी यांच्यावरील लेख वाचनीय आहे. जोशी अत्रेंच्या नकलांचा कार्यक्रम करीत हे सर्वश्रुत; पण जोशी यशवंतराव चव्हाण, नेहरू यांच्या त्यांच्या लकबींसह हुबेहूब नकला करीत, हे लेखकाने सांगितले आहे. सुरेश खानविलकर हे खासगी गुप्तहेर. लग्नात आणि पुढे संसारात फसगत होण्यापासून या हेराने कसे अनेकांना वाचविले इत्यादी माहिती लेखकाने दिली आहे. या विभागातील सर्वांत हृद्य लेख हा प्रदीप भिडे यांच्यावरील. लेखक आणि गंधे सहकारी असल्याने त्यांना सहवास खूप लाभला आणि त्यामुळे भिडे यांच्या सहृदयतेविषयी, उमदेपणाविषयी लेखकाने जिव्हाळ्याने लिहिले आहे.
 
‘लेख’ या विभागात विविध विषयांवरील सात लेख आहेत. ‘दृश्य माध्यमांतील साहित्यविश्व’ या लेखात या दोन माध्यमांतील संबंधांचा धावता आढावा लेखकाने घेतला आहे. ‘प्रसारमाध्यमे आणि सामाजिक दायित्व’ या लेखात बदलत्या प्रसारमाध्यमांच्या वाटचालीवर; त्यांच्याकडून असणार्‍या अपेक्षांवर भाष्य केले आहे. ‘इंटरनेटची पंचविशी’ या लेखात तंत्रज्ञानाचा होणारा विकास, त्याचे लाभ आणि मर्यादा यावर लेखकाने दृष्टिक्षेप टाकला आहे. ‘पर्यावरणीय लघुपटांची अनोखी दुनिया’ हा लेख उल्लेखनीय. ‘मुंबई दूरदर्शन स्मरणरंजन की मनोरंजन’ हा लेख दूरदर्शनचे गतकाळचे वैभव हरवले आहे, अशी व्यथा व्यक्त करणारा; ओघात सोनेरी काळाचे कवडसे दाखवून देणारा. लेखकाला आलेली समीक्षक-वाचकांची काही पत्रे-आठवणी शेवटच्या विभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. पु. ल. देशपांडे यांची मुलाखत घ्यायला गेले असता, त्यांनी लेखकाला ‘अरे! सत्यकथेत भिरभिरं लिहिणारे गंधे तुम्हीच का?’ असे विचारले, तेव्हा भरून पावल्याची भावना लेखकाने नमूद केली आहे. त्यामुळे पुस्तकाला दिलेले शीर्षक उठावदार ठरते. विविधांगी प्रकारांचे साहित्य असल्याने या पुस्तकाचे वर्णन ‘घागर मे सागर’ असे करता येईल. मनोज आचार्य यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक आहे.

पुस्तकाचे नाव : भिरभिरं
लेखकाचे नाव : रविराज गंधे
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
पृष्ठसंख्या : १७६
मूल्य : रुपये ३००


- राहुल गोखले