छत्तीसगढ, बस्तर परिसरातील अबुझमाडच्या जंगलात घुसून सीमा सुरक्षा बल आणि जिल्हा राखीव सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून नुकतेच २९ नक्षल्यांना ठार केले. या नक्षलवाद्यांना काँग्रेसी नेत्या सुप्रिया श्रिनेत हिने चक्क ‘शहीद’ संबोधले. तसेच, नक्षलवाद्यांविरोधातील या कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय सैन्याने पाकमध्ये केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असो की, ‘एअर स्ट्राईक’ याबद्दल शंका-कुशंका उपस्थित करणारे काँग्रेसी आता जवानांच्या नक्षलविरोधी कारवाईलाही खोटे ठरविण्याचा उद्योग करत आहेत, हे दुर्दैवच! या पार्श्वभूमीवर बस्तर, नक्षलवादी आणि काँग्रेसचे राजकारण यांचा मागोवा घेणारा हा लेख...
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्याचे राजकारण होता कामा नये. या कारवाईबद्दल गंभीर चौकशी झाली पाहिजे. या कारवाईमध्ये मृत्यू पावलेल्या शहिदांबद्दल आणि जखमी झालेल्या जवानांबद्दल मी संवेदना व्यक्त करते.” काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रिनेत हिने नुकतेच असे म्हटले. तिच्या विधानाचा अर्थ जाणून घ्यायचा, तर भूपेश बघेल काय आणि कशासंदर्भात म्हणाले, हे जाणून घ्यायला हवे. छत्तीससगढच्या बस्तरमधील कांकेर जिल्ह्यातील अबुझमाडच्या जंगल परिसरातील हापाटोला जंगल भागात सीमा सुरक्षा बल आणि जिल्हा सुरक्षा राखीव दलाच्या जवानांनी एकूण २९ नक्षवाद्यांचा खातमा केला. छत्तीसगढच्या इतिहासातील नक्षलविरोधी कारवाईची ही एक अभूतपूर्व घटना होती. कारण, नक्षलवाद्यांचा जवानांनी जिथे खातमा केला, ते अबुझमाडचे जंगल म्हणजे नक्षलवाद्यांची राजधानीच. या जंगल परिसरात २३७ गावे आहेत. मात्र, इथे २०१७ सालापर्यंत कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारी सुविधा पोहोचली नव्हती. इथे नक्षल्यांचेच राज्य. ‘या अशा परिसरात जवान कसे काय गेले आणि कसे काय नक्षलवाद्यांना मारले? ते तसे करूच शकत नाहीत,’ असा भूपेश बघेल यांचा ठाम विश्वास.
जवान नक्षलवाद्यांना ठार मारूच कसे शकले, हा विचार मनात असल्यामुळेच भूपेश म्हणाले की, “ही खोटी चकमक आहे. भाजप सत्तेत आल्यावरच हे कसे घडले?” तर, भूपेश यांनी जवानांच्या शूरत्वाचा अक्षरशः असा अपमान केला. जवानांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करायचा नव्हता वगैरेही त्यांनी म्हटले. मात्र, सुप्रिया श्रिनेत हिने भूपेश बघेल यांच्या विधानानुसार ‘खरेच नक्षलवादी मेले आहेत का? खरेच जवानांनी कारवाई केली का? याची चौकशी व्हावी,’ अशा आशयाचे विधान तर केलेच, त्याशिवाय मृतांना ‘शहीद’ म्हटले. या कारवाईमध्ये कुणीही जवान मृत्यू पावला नाही. मेले ते नक्षलवादीच. याचाच अर्थ श्रिनेत नक्षल्यांना चक्क ‘शहीद’ म्हणाली.
तेच नक्षलवादी ज्यांनी २०१३ ते २०२२च्या दरम्यान छत्तीसगढमध्ये ३ हजार, ४४७ नक्षलवादी हल्ले केले. त्यामध्ये ४१८ जवान ठार झाले. तेच नक्षलवादी ज्यांनी छत्तीसगढच्या अबुझमाडमध्ये ८०च्या दशकात आसरा घेतला आणि तिथे बसून छत्तीसगढमध्ये ठिकठिकाणी नक्षलवादी हल्ले केले. या नक्षलवाद्यांनी गावेच्या गावे उजाड केली, उद्धवस्त केली. दहशत बसावी म्हणून गावातल्या बालकांची, तरूणांची सामूहिक हत्या त्यांच्या पालकांसमोर केली. परिसरात वीज, रस्ते आणि पाणी यांदसर्भात कोणताच विकास होऊ नये, तसेच इथे कोणताही उद्योग-व्यवसाय उभाच राहू नये, यासाठी या नक्षलवाद्यांनी ही कामे करणार्या कंत्राटदारांना आणि मजुरांना किड्या-मुंग्यांसारखे मारले. देशातल्या लोकशाहीला, सरकारला प्रशासनाला विरोध करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्त्व नाकारत, हे नक्षलवादी इथे या परिसरात राक्षसी राज्य करत होते. ते नक्षलवादी सुप्रिया श्रिनेतच्या मते ‘शहीद’ आहेत.
अबुझमाड परिसरातील नक्षलवादी किल्ल्याला कोणीच भेदू शकत नाही, अशी काँग्रेसी मानसिकता होती. त्यामुळे आपले जवान हुतात्मा होत राहिले. २०१३ साली तर नक्षलवाद्यांनी हल्ला करत छत्तीससगढमधील काँग्रेसचे नेतृत्त्वच संपविले. छत्तीसगढमधून नक्षलवाद्यांना संपवणे ही अशक्यच गोष्ट आहे, असे काँग्रेसी नेत्यांच्या मनात घट्ट बसलेले. मात्र, २०१४ साली भाजप सत्तेत आले. ‘अबुझमाडच्या जंगलात कसेही घुसायचेच’ हा पण करून केंद्र सरकारने कारवाया सुरू केल्या. त्यानंतर २०१७ साली कुठे या २३७ गावांपैकी काही गावांमध्ये राजस्व सर्वेक्षण सुरू झाले.
असो. सध्या देशात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. नेहमीप्रमाणे नक्षलवाद्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. कोणीही मतदान करू नये, अशा आशयाची पत्रकं नक्षलग्रस्त परिसरात नक्षलवाद्यांनी वाटली आहेत. ‘बस्तर जिल्ह्यात काही शांती सुरक्षा नाही, आमचेच राज्य आहे,’ असे दाखविण्यासाठी आणि लोकांना घाबरवून मतदानापासून परावृत्त करण्यासाठी नक्षलवाद्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या हल्ल्यांची तयारी केली आहे, असे संबंधित प्रशासकीय व्यवस्थेच्या लक्षात आले. नक्षलवाद्यांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान अबुझमाडच्या जंगलात पोहोचले.
या अबुझमाडच्या जंगलात भारत सरकारचे कुठलेही सुरक्षा दल येईल, असे स्वप्नातही नक्षलवाद्यांना वाटले नव्हते. मात्र, इथे नदी पार करून, डोंगर चढून जवानांनी हापाटोला परिसरातील अबुझमाडच्या जंगालाला घेराव घातला. ‘जंगल आपल्या बापाची संपत्ती’ असे मानणारे नक्षलवादीतेव्हा बिनधास्त जेवणखाण करून बसले होते, तर ज्याला पकडून देण्यासाठी २५ लाखांचे बक्षीस होते, तो नक्षलवादी शंकरराव नक्षलवाद्यांची बैठक घेण्याची तयारी करत होता. भारतीय जवान इथे पोहोचले आहेत, हे कळताच या नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामध्ये तीन जवान जखमी झाले. नक्षलवाद्यांचा खातमा करायचा, या जिद्दीने लढाईला उतरलेल्या जवानांनी २९ नक्षलवाद्यांना ठार केले. त्यात १४ पुरूष आणि १५ महिला नक्षल्यांचा समावेश होता. आपली कोणतीही जीवितहानी न होता, २९ नक्षलवादी ठार झाले, ही आनंदाचीच घटना.
जीवावर उदार होऊन, दुर्गम परिसरात तैनात असलेले आणि देशाचे संरक्षण करणारे हे जवान. त्यांचे वीर्य आणि शौर्य शब्दातीतच. दिवसाही रात्र वाटावी, असे जंगल आणि परिसराला घेरणार्या टेकड्या, त्या टेकड्यांमधून जंगालात उतरणार्या पायवाटा, कोठे सुरू होतात, कोठे संपतात, ते समजतही नाही असा हा सगळा परिसर. या परिसरात हे जवान तळ ठोकतात. कसलीच भौतिक सुविधा नाही, उलट कधीही नक्षलवादी हल्ला होऊ शकतो, असेच वातावरण.या वातावरणात जवानांनी २९ नक्षलवाद्यांना ठार केले. ही सर्वस्वी एक अभूतपूर्व कारवाई होती.
सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या काळात भूपेश बघेल यांनी जवानांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि काँग्रेसी प्रवक्त्या सुप्रिया श्रिनेत हिने नक्षलवाद्यांना ‘शहीद’ मानले. हे सगळे दुःखदायक आणि संतापजनकच.
दुसरीकडे माओवाद्यांनी दोन दिवसांनी एक पत्रक जाहीर केले. त्यात त्यांनी म्हटले की, “आमचे २९ लोक ठार झाले. या कारवाईची खोल चौकशी व्हावी.” याचाच अर्थ, देशद्रोही माओवादी नक्षलवाद्यांनीही काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणेच या जवानांच्या कारवाईची चौकशी करायची मागणी केली. पुढे या माओवाद्यांचे म्हणणे आहे, “२९ पैकी १७ नक्षवलवादी निःशस्त्र होते. निःशस्त्र असताना त्यांना मारण्यात आले.” नीती-अनीती, शस्त्र-निशस्त्रांच्या गोष्टी आणि कायद्याच्या गोष्टी माओवाद्यांनी कराव्यात? ते जेव्हा गावावर हल्ले करतात किंवा विश्रांती घेत असलेल्या भारतीय सुरक्षा दलावर हल्ला करतात, तेव्हा ही न्यायाची व्याख्या कुठे असते? १७ तारखेला न्याय-अन्यायाच्या बाता मारणार्या या माओवाद्यांचे नक्षलवादी १६ तारखेच्या रात्री स्थानिक भाजप नेता, उपसरपंच पंचमदास मानिकपुरी यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांच्या घरात घुसले. त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची निर्घृण हत्याही केली होती.
पंचमदास त्यावेळी निःशस्त्र होते. हो, आणखी एक विशेष- जिथे २९ नक्षलवादी ठार झाले, त्या बस्तर लोकसभा क्षेत्रासाठी कवासी लखमाला यांना काँग्रेसने बस्तरची उमेदवारी जाहीर केली आहे. ३० वर्षे ही व्यक्ती काँग्रेसची आमदार आहे. ‘आदिवासी हिंदू नाहीत, आदिवासींना वनवासी बोलणार्यांना गावातून मारून हाकला,’ असे या कवासीचे बोलणे आणि गावातल्या तरूणांना विडी ओढून नाकातून कसा धूर सोडायचा, असे प्रात्यक्षिक देणारी ही व्यक्ती. या लखमाने नुकतेच जाहीर सभेत नारा दिला की, “लखमा जिंकणार मोदी मरणार!” हे कशाच्या जोरावर तो म्हणत असेल? २०१३ साली नक्षलवादीहल्ल्यात छत्तीसगढचे मान्यवर नेते मारले गेले. तेव्हा त्या नेत्यांसोबत लखमाही होता. मात्र, सगळे मारले गेले आणि लखमा सहिसलामत बाहेर आला. कसे? याबाबात अनेक प्रश्नचिन्ह आहेत. नक्षलवाद्यांचे त्यातही शहरी नक्षलवाद्यांची नाती कोठे कशी जुळली आहेत, हे देशाला आता कळले आहे. त्यामुळेच भूपेश बघेल असू देत की सुप्रिया श्रिनेत, त्यांनी २९ नक्षलवाद्यांच्या मृत्यूवर कितीही गळे काढले, तरी जनता आता भूलणार नाही. भारताच्या विकासात हिंसात्मक अडथळा आणणार्या नक्षलवाद्यांना भीक घालणार नाही. सगळा भारत लोकशाही संविधान आणि मुख्यतः रामनामाने समरस झाला आहे. या अनुषंगाने नक्षलवादाबद्दल गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत की, “देशातील नक्षलवाद संपूर्ण संपवणार. देशाच्या सुरक्षिततेबद्दल कसलीही तडजोड नाही.” प्रभू श्रीरामाने समुद्र लांघत रावणाचे राज्य उधळून लावले. आताही देशाची सज्जनशक्ती आणि केंद्र राज्यातले भाजप सरकार नक्षलवाद्यांचे हिंस्र मनोरथ उद्ध्व्स्त करणार नक्कीच!
९५९४९६९६३८