राहुल गांधींनी भाजपशी थेट लढत द्यावी; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा टोला!

02 Apr 2024 18:37:53
Pinarayi Vijayan On Rahul Gandhi


नवी दिल्ली:
काँग्रेसने केलेल्या तक्रारीमुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज तुरुंगात आहेत. त्याचवेळी भाजपशी थेट लढत देण्याऐवजी राहुल गांधी वायनाडमध्ये भाकपच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहेत, असा टोला केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी काँग्रेसला लगावला आहे.

काँग्रेसप्रणित इंडी आघाडीतर्फे रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानात भाजपविरोधात शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. आघाडीतील सर्व घटकपक्ष एकजूट असल्याचा दावा करण्यात येत असला तरीदेखील भाकपने आपला काँग्रेसविरोध सुरूच ठेवला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पुन्हा एकदा काँग्रेस खासदार आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांच्यावर टिका केली आहे.

केरळमधील कोझिकोडे येथे पक्षाच्या प्रचार कार्यक्रमावेळी विजयन यांनी राहुल गाधींना टोले लगाविले. ते म्हणाले, राहुल गांधी केरळमधून भाकपच्या ॲनी राजा यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. ॲनी राजा या भाकपच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावर भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केल्याने त्यांना देशद्रोही म्हटले गेले. मात्र, त्यावेळ राहुल गांधी यांनी याप्रकरणी कोणत्याही प्रकारची भूमिता घेतली नव्हती. देशातील भाजपविरोधातील अनेक आंदोलनांमध्ये ॲनी राजा उपस्थित होत्या, मात्र राहुल गांधी तेथे उपस्थित नव्हते. कोणी कोठून निवडणूक लढवावी, हे काँग्रेस ठरवू शकते. मात्र, राहुल गांधी हे भाजपशी थेट लढत देण्याऐवजी इंडी आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भाकपविरोधात निवडणूक लढवत आहेत. या प्रकाराची देशभरात चर्चा होत असल्याचेही मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0