ठाण्यासाठी भाजपचा आग्रह कायम; संजीव नाईक स्पष्टच बोलले

02 Apr 2024 20:34:53
BJP dr sanjeev naik thane


ठाणे :
    महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी भाजपने आग्रह करू नये, अशातला काही भाग नाही. प्रत्येक पक्ष आग्रही असतो. तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचे वक्तव्य करून ठाण्याचे माजी खा.डॉ. संजीव नाईक यांनी शिवसेनेचे टेन्शन वाढवले आहे. दरम्यान, ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच असताना पुन्हा एकदा या जागेवर भाजपने दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी भेट घेतल्यानंतर डॉ संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेकडून उमेदवारीबाबत कुणीही, कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचे स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही. पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. ठाण्याच्या उमेदवारी बाबत छेडले असता त्यांनी,जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही. असे सांकेतिक भाष्य करून याबाबत वरीष्ठ नेते निर्णय घेतील. असे स्पष्ट करून भाजपची सर्व तयार झाली असल्याचे म्हटले.


हे वाचलंत का? - उद्धव ठाकरेंनी तिकिटाच्या बदल्यात पैसे घेतल्याची माझ्याकडे यादी!


ठाण्याच्या जागेवर भाजपने आग्रह करू नये, अशातला काही भाग नाही. प्रत्येक पक्ष आग्रही असतो तसे भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणारच. प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती ओढवल्याचे सांगुन संजीव नाईक यांनी, मला विश्वास आहे, तिन्ही पक्षाचे नेते समजुतदार आहेत. तेव्हा वैचारिक तणातणी होणार नाही. ज्यादिवशी उमेदवारी जाहिर होईल, त्यादिवशी आम्ही सर्व एकदिलाने काम करू, असा विश्वास व्यक्त केला.


विचारेंना योग्यवेळी उत्तर देऊ - संजीव नाईक

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवार मिळत नसेल तर बिनविरोध निवडून द्या. याबद्दल संजीव नाईक यांना छेडले असता आत्ता ते उमेदवार आहेत त्यामुळे काही बोलणे योग्य नाही. मात्र, योग्यवेळ येईल तेव्हा उत्तर देणार असल्याचे सांगितले. तसेच ठाण्यात महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि तो मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल.असेही त्यांनी स्पष्ट केले.



Powered By Sangraha 9.0