अभिनयाशी भावनिक नाते जपणारे विद्या आणि प्रतीक

19 Apr 2024 21:02:38
 sdscd
 
वैवाहिक आयुष्य आणि नवरा-बायकोमधील बदलते भावनिक संबंधांवर भाष्य करणारा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शिरीषा ठाकुर्ता यांचे दिग्दर्शन असणार्‍या या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेते प्रतीक गांधी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दोन्ही हरहुन्नरी कलाकारांशी साधलेला सुसंवाद.

कलाकारांनी प्रेक्षक म्हणूनही कलेकडे पाहावे : विद्या बालन
२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘परिणिता’ या चित्रपटापासून विद्या बालन यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा प्रवास सुरू झाला. मग पुढे ‘जलसा’, ‘इश्किया’, ‘कहानी’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘भूल भूलैय्या’ अशा अनेक चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन केले. आजवर साकारलेल्या भूमिकांबद्दल बोलताना विद्या बालन म्हणाल्या की, “आजवरच्या माझ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत माझ्यातील कलाकार ओळखूनच प्रत्येक भूमिकेबद्दल मला विचारणा करण्यात आली असेल, असे मला वाटते. कारण, आत्तापर्यंत मी ज्या विविधांगी भूमिका साकारल्या, त्या करताना एक अभिनेत्री म्हणून मी माझ्यातील ते पैलू नव्याने स्वत: अनुभवत होते आणि प्रेक्षकांपर्यंत मांडतदेखील होते, याचा मला आनंद आहे. मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे, ज्यावेळी एखाद्या चित्रपटातील पात्र तुम्हाला उमगते, त्यावेळी तुमच्यातील एक माणूस म्हणूनही तुम्ही स्वत:ला नव्याने समजून घेत असता. माझ्याकडे जेव्हा जेव्हा नवी कथा आली आहे, त्यावेळी मला नव्याने माझ्यातील कलाकार सापडला आहे, हे मी नक्कीच खात्रीने म्हणून शकते.
 
कलाकारांनी प्रेक्षक म्हणूनही कलेकडे पाहावे...
वैवाहित दाम्पत्याची कथा ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात दाखवली असून, सध्याच्या काळातील प्रत्येक पती-पत्नी स्वत: त्या कथेशी एकरुप होऊ शकतो, अशीच ही कथा आहे. याबद्दल बोलताना विद्या म्हणाल्या, “ ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाच्या निमित्ताने मी दहा वर्षांनंतर प्रेमपटात काम केले आहे. कारण, हल्ली खूप कमी प्रेमपट प्रदर्शित होतात किंवा अशा कथा ऑफर केल्या जातात, ज्यामध्ये काम करण्याची इच्छा होते. कारण, मी केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही, तर प्रेक्षक म्हणूनही बराच काळ चित्रपट किंवा ओटीटीवरील आशय पाहात होते. त्या कथांमधील तोच रटाळपणा, बोल्ट कंटेंट यामुळे मला तो पाहण्यातही रस उरला नव्हता. त्यामुळे मी विचार केला की, जर का प्रेक्षक म्हणून मला एखादी कलाकृती पाहाविशी वाटत नसेल, तर एक अभिनेत्री म्हणूनही मी विचारपूर्वकच चित्रपट किंवा कथेची निवड करायला हवी. वैयक्तिकदृष्ट्या मला सध्या विनोदी किंवा अगदी हलक्या विषयांना अगदी मार्मिकपणे हाताळणार्‍या चित्रपटांचाच भाग व्हायचे आहे, हे मी मनाशी पक्के केले आहे आणि त्यामुळेच ‘दो और दो प्यार’ या चित्रपटाची मी निवड केली. त्यामुळे कलाकारांनी चित्रपट किंवा कोणत्याही मनोरंजक कलेकडे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे,” असा नकळत सल्ला विद्या यांनी कलाकारांना दिला.
 
तरुणाई आणि नातेसंबंध
“काळानुसार लोकांचा नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलला आहे. पण, जर का वैवाहिक आयुष्यात सुख आणि समाधान हवे असेल, तर नवरा आणि बायकोमध्ये सुसंवाद असणे फार महत्त्वाचे आहे. याशिवाय एकमेकांसोबत वेळ घालवणे, विचारांची देवाणघेवाण करणे, यामुळेच कमकुवत झालेल्या नात्याला नवी झळाळी येते आणि ते नाते पुन्हा एकदा बहरू लागते आणि जर का नाते टिकवण्याची इच्छा असेल, पण मार्ग सापडत नसेल, तर नक्कीच कुणाचे मार्गदर्शन किंवा सल्ला नवरा-बायकोने घ्यावा,” अशी सुखी संसाराची टीपदेखील विद्याने दिली, तर नातेसंबंध आणि आजची तरुण पिढी यावर भाष्य करताना विद्या म्हणाली की, “ही पिढी नात्यांना एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे हाताळू लागली आहे. पण, असे न करता नाते म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय, याची जाणीव त्यांना करून देण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांची असून त्यांनी ती पूर्ण केली, तर नक्कीच तरुणाईचा नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल,” असे मत विद्या यांनी मांडले.

कलेची जाण एका उत्तम कलाकारालाच असते : प्रतीक गांधी
हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसीरिजमुळे अभिनेते प्रतीक गांधी सुरत ते मुंबई हा मनोरंजनाचा प्रवास करू शकले. या वेबसीरिजबद्दल बोलताना प्रतीक म्हणतात, “ ‘स्कॅम’ या वेबसीरिजमधील हर्षद मेहता या भूमिकेने मला ओळख मिळवून दिली. जवळपास १६-१७ वर्षं मी या भूमिकेच्या शोधात होतो. कारण, नोकरी, नाटक आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपट इतकाच माझा एक कलाकार म्हणून प्रवास होता. पण, ज्यावेळी ‘स्कॅम’ या वेबसीरिजचा मी भाग झालो, त्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीच्या प्रेक्षकांसोबत माझे संबंध जोडले गेले आणि एक अभिनेता म्हणून माझी कला त्यांच्यासमोर सादर करण्याची जबाबदारी वाढली. प्रतीक गांधी हे मूळचे सुरतचे असून, त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही शिक्षक आहे. पण, ते अभिनयाकडे कसे वळले, याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “माझ्या घरातच कला आहे. मी तबलावादन माझ्या वडिलांकडून शिकलो. माझे वडील भरतनाट्यम नृत्यकार आहे. त्यामुळे बालपणापासून शिक्षणासोबत कलेचे संस्कार आमच्यावर होत गेले आणि माझ्यात अभिनयाचे बीज आपोआप रोवले गेले.”
 
‘दो और दौ प्यार’ या चित्रपटात प्रतीक गांधी विद्या बालनसोबत झळकणार असून, यात त्यांनी विद्याच्या पतीची भूमिका साकारली आहे, तर खर्‍याखुर्‍या जीवनातील साथीदाराबद्दल बोलताना प्रतीक म्हणाले की, “मी आणि माझी पत्नी दोघेही कलाक्षेत्रातील असल्यामुळे एकमेकांच्या कामाचा आम्ही आदर करतो. लवकरच आम्ही गांधी चित्रपटात एकत्र काम करणार आहोतच. पण, आम्ही आजही एकत्र गुजराती किंवा अन्य भाषेतील नाटकांमध्ये कामं करतो. मुळात आम्ही दोघेही कलाकार जरी असलो, तर आमच्यात कोणत्याच प्रकारची स्पर्धा नाही आहे. आज मी एक अभिनेता म्हणून तुमच्याशी संवाद साधत आहे, याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या पत्नीलाच देतो,” असे प्रतीक गांधी म्हणाला. कारण, नोकरी सांभाळून मी नाटकांमध्ये कामं करत होतो आणि त्यावेळी आमच्या नात्याला वेळ देण्याऐवजी, मी त्या वेळेत नाटकांच्या तालमी करत होतो. पण म्हणतात ना, कलेची जाण ही एका उत्तम कलाकारालाच असते; ते आमच्याबाबतीत सुदैवाने घडले आणि मी गुजराती नाटकांमध्ये कामं करू शकलो आणि भविष्यात हिंदी चित्रपटांत कामं करण्याचे स्वप्न पाहू शकलो.”
 
रंगभूमी हे कलाकाराच्या तालमीचे मैदान
नट आणि रंगभूमी हे विधिलिखत समीकरण आहे. सुरतमध्ये नोकरी सांभाळून नाटकात काम करणार्‍या प्रतीक यांनी त्यांच्यासाठी रंगभूमी म्हणजे काय, हे सांगितले. प्रत्येक कलाकारासाठी नाटक हे फार महत्त्वाचे आणि प्रभावी माध्यम आहे. रंगभूमी हे कलाकाराच्या तालमीचे मैदान आहे; जिथे जाऊन एक नट स्वत:मधील गुण, कल ओळखतो आणि त्यावर मेहनत करून ते प्रेक्षकांना लोकार्पण करतो. कारण, ज्यावेळी आपण नाटकात काम करतो, त्यावेळी एखाद्या विशिष्ट भावनेला कसे वैविध्यपूर्ण अंगाने मांडायचे आहे, याचे शिक्षण मिळते आणि याचा योग्य उपयोग चित्रपटात काम करताना होतो. कारण, तेव्हा कॅमेरा अगदी जवळून तुमचे हावभाव कैद करत असतो. जेव्हा आम्ही चित्रपटात काम करत असतो, तेव्हा जवळपास तीन ते चार महिने आम्ही त्या कलाकृतीचा भाग असतो. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी मिनिटांचे पैसे निर्मात्यांना मोजावे लागत असतात, त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची टंगळमंगळ करणे कुणालाही झेपण्यासारखे नसते आणि अशावेळी जर का मुख्य कलाकाराच आपल्या भूमिकेसाठी तयार नसेल, तर त्याचा आर्थिक परिणाम भोगावा लागतो आणि तोच आर्थिक भुर्दंड निर्मात्यांना आणि कलाकारांना बसू नये, यासाठी रंगभूमीच कलाकाराला घडवते आणि आईसारखी पाठीशी खंबीरपणे उभी राहाते.”
 
रंगभूमी उत्तम माणूस घडवते...
रंगभूमीची अधिक वैशिष्ट्ये सांगताना प्रतीक म्हणाले, “दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरण्याचे धडे देतो. कारण, एका नाटकाचा एक प्रयोग हाऊसफुल्ल जाईल. परंतु, त्याच नाटकाचा दुसरा प्रयोग कदाचित यशस्वी होणार नाही. अशा परिस्थिती खचून न जाता, आपल्या भावनांना आळ घालून आत्मविश्वासाने कला सादर कशी करावी हे नाटक शिकवते.”
Powered By Sangraha 9.0