जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारणार बुक स्ट्रीट

19 Apr 2024 14:44:28

book street 
 
मुंबई : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने डोंबिवली येथेंबुक स्ट्रीट आयोजित केली आहे. 'पुंडलिक पै' यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली पै फ्रेंड्स लायब्ररी अनेक उपक्रम राबवित असते. यावर्षी देखील भव्य बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीपासून सुरू झालेला भारतातील हा पहिल्यावहिला उपक्रम आहे. यावेळी प्रत्येक वाचन प्रेमींसाठी १ विनामूल्य पुस्तक प्रदान करण्यात येणार आहे. डोंबिवली मधील फडके रोडवर रविवार, दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजता बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर सकाळी १० वाजेपर्यंत हा बुक स्ट्रीट रसिक वाचकांसाठी खुला रहाणार आहे.
 
वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रसिकांना कूपनद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. त्यावर तिथे उपलब्ध असलेले कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत निवडता येणार आहे. पुस्तकांपासून तयार केलेली 'आय लव्ह बुक्स' ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे खास आकर्षण असणार आहे. गतवर्षी ४५०० वाचकांनी या उपक्रमाला भेट दिली होती, तर यंदाचे वर्षी सहा हजार वाचनप्रेमी उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी ७५०६२९६०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0