गदिमांच्या गाडीखाली येणार होते महर्षी कर्वे! एक न झालेला अपघात

गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी सांगितला किस्सा

    18-Apr-2024
Total Views |

gadima karve 
 
मुंबई : गदिमा, त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या जीवनातील किस्से याबाबतीत सुमित्र माडगूळकर नेहमी आपल्या फेसबुक वरून ब्लॉग्स लिहीत हातात. अशातच एके दिवशी त्यांच्या गाडीखाली शिक्षण महर्षी धोंडो केहव कर्वे येणार होते. गाडी चालवत होते त्यांचे स्वीय सहाय्यक. याबात सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी एक किस्सा त्यांच्या फेसबुकवरून शेअर केला आहे.
ते म्हणतात, "ग.दि.माडगूळकरांना भेटण्यासाठी तीन फाटके ओलांडावी लागतात पहिले वाकडेवाडीचे रेल्वे फाटक,दुसरे पंचवटी बंगल्याचे फाटक व तिसरे त्यांचे स्विय सहाय्यक "बाबा फाटक (पाठक)!"... पु.ल.देशपांडे यांचे एक गंमतशीर वाक्य!,तसे म.गो तथा बाबा पाठकांनी गदिमांचे लेखनिक म्हणून सुरवात केली व पुढे या आपल्या शिष्याला गदिमांनी आपले बोट धरून मराठी चित्रपटसृष्टीत वाट मोकळी करून दिली,एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून बाबा पाठकांनी प्रपंच,संथ वाहते कृष्णामाई,मुक्काम पोस्ट ढेबेवाडी,गरिबाघरची लेक,चांदोबा चांदोबा भागलास का,स्वयंवर झाले सीतेचे,संत निवृत्ती ज्ञानदेव,वारसा लक्ष्मीचा सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले.बाबा पाठक रूपेरी पडद्यावरील त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले. अगदी गदिमांच्याच शब्दात..
 
येतो सामोरा वसंत
आता पाकळ्या फुलू दे
तुझ्या कर्तृत्त्व- सुगंधे
माझे मस्तक झुलू दे
केल्या सेवेचे सार्थक
अडते ना कळी- काळा
फडकते यशोध्वजा
याचि देही याचि डोळा
 
बाबांनी जवळ जवळ १० वर्षे गदिमांचे लेखनिक व सहाय्यक म्हणून काम केले असेल,असाच बाबांच्या पोतडीतून घडलेला एक अफलातून किस्सा जो घडला असता तर गदिमांच्या निष्कलंक कारकिर्दीला त्यांची काहीच चूक नसताना एक मोठा कलंक लागला असता व भारताच्या इतिहासात एक अतिशय दुर्दैवी घटना म्हणून नोंदवली गेली असती.
 
गदिमांनी स्वतः कधी गाडी घेतली नाही कारण त्यांना कोणीतरी सांगितले होते ज्यादिवशी तुम्ही स्वतःची गाडी घ्याल त्या वेळी तुमच्या आईच्या जीवाला धोका निर्माण होईल,गदिमांचे मातृप्रेम अफाट होते त्यांनी विश्वास अंधविश्वास कशाचीही तमा न बाळगता स्वतःच्या नावावर कधीच गाडी घेतली नाही.राजा परांजपे यांच्या बरोबर त्यांनी गजराज (गजानन -गज ,राजा - राज ) चित्र म्हणून एक संस्था काढली होते.कदाचित त्या संस्थेची अम्बॅसेडर गाडी ड्राइव्हरसकट काही काळ पंचवटीबाहेर गदिमांच्या सेवेत असायची.
 
गदिमांना भल्या पहाटे उठून लिहिण्याची सवय होती,असेच एकदा एका चित्रपटाच्या लेखनासाठी सकाळी ५.३०/६ वाजता बाबा पाठक व गदिमांचे भेटण्याचे ठरले,सकाळी साडेपाच वाजता गदिमांचा ड्राइव्हर गाडी घेऊन बाबा पाठकांना आणण्यासाठी प्रभात रोड/लॉ कॉलेज परिसरात गेला ,थंडीचे दिवस होते,त्याकाळी प्रभात रोडला जास्त वस्तीही नव्हती,वाहनांची वर्दळ तर अगदी तुरळक.बाबा पाठकांना ड्रायव्हरने गाडीत घेतले,भली पहाट,रिकामे रस्ते पाहून बाबांना गाडी चालवायची हुक्की आली,गाडी चालवता तर येत नव्हती पण गाडी चालवण्याचा मोह मात्र त्यांना आवरला नाही,ड्राइवर कनवाळू असावा ,अर्थात मालकाच्या इतक्या जवळच्या माणसाला नाही तरी कसे म्हणायचे,ड्राइव्हरबुवा शेजारी बसले व बाबा पाठक गाडीच्या चाकावर. ड्राइव्हर बुवांच्या अधिपत्याखाली गचके खात खात गाडी प्रभात रोड ने निघाली.दाट धुके पसरलेले होते जास्त लांबचे काही दिसत नव्हते ,थोडा आत्मविश्वास आल्यावर बाबा पाठकांच्या अम्बॅसेडर रथाने जरा वेग पकडला.
 
ड्राइव्हर बुबा कर्तव्यदक्ष असल्यामुळे जरा सावध होते,बाबांचा गाडी रथ जरा वेगात धुक्यातून प्रभात फेरीला निघाला होता.काही वेळ जातो न जातो तितक्यात ड्राइवर ने मध्येच अचानक तंगडे घालून करकचून ब्रेक दाबला,बाबांनी समोर बघितले तर एक जख्खड म्हातारे गृहस्थ काठी टेकीत टेकीत धुक्यातून एकदम पुढ्यातच अवतरले होते,ब्रेक दाबला गेला नसता तर गाडीने जवळ जवळ उडवलेच असते त्यांना.पांढरी लांब दाढी,गोल जाड भींगाचा चष्मा,चेहऱ्यावर निर्विकार भाव,लहान चणीचे वृद्ध गृहस्थ या धुक्यातून प्रगटलेल्या अनाहूत वाहनाच्या अचानक थांबून खिंकाळण्यामुळे क्षणभर थबकले,बावचळले पण तितकाच निर्विकार कटाक्ष टाकून वाहन ओलांडून काठी टेकत टेकत चालू लागले.
 
आपल्या वाहन साधनेत व्यत्यय आल्यामुळे बाबांची सातारी प्रतिभा जागृत होण्याच्या मार्गावर होती,एक सातारी शिवी हासडावी व "या वयात घरी बसावे आजोबा,इतक्या पहाटे पहाटे धुक्याच्या थंडीत कश्याला बाहेर पडता,आमच्याच गाडीखाली....." असा अनाहुत सल्ला देण्यासाठी आपला मुखचंद्रमा बाबांनी बाहेर काढावा व त्याच वेळी ते वृद्ध गृहस्थ तठस्थ पणे निर्विकार कटाक्ष टाकून तिथून निघून जावे याला बोला फुलाची गाठ पडली.बाबांनी त्यांना पाहिले मात्र त्यांच्या पायातले त्राणच निघून गेल्यासारखे झाले,प्रचंड घाम फुटला,शरीर कापायला लागले.
 
ड्राइव्हर ला म्हणाले गाडी घे ताब्यात अण्णांना हे कळले तर मला म्हणतील "बाब्या,लेका गाढवा,तुला काही अक्कल बिक्कल आहे कि नाही... ",पंचवटीतच मला अख्खाच्या अख्खा गाडतील ते आता.
अरे परमेश्वर कृपेने एक महाअनर्थ माझ्या हातून होता होता राहिला,उद्या अख्या भारतातल्या वृत्तपत्रातल्या पहिल्या पानावर ठळक मथळा तयार झाला असता...
 
"गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांच्या गाडीच्या धडकेने भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे अपघाती..... ".....अरे ते वृद्ध गृहस्थ होते शिक्षणमहर्षी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे!....
 
बाबा पाठक जरी गाडी चालवत होते व गदिमा गाडीत नव्हते तरी गाडी त्यांच्याच मालकीच्या संस्थेची होती,खरंच हा महाअनर्थ झाला असता तर त्याचे बालंट गदिमांच्यावरच आले असते इतके मात्र नक्की ...केवळ परमेश्वर कृपा व समोर आलेला पुण्यात्मा म्हणूनच अनर्थ होता होता राहिला.आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही अश्या अतर्क्य गोष्टी जगात घडतात!.
त्यामागे एकच सत्य....
 
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.."