पिता न तू वैरी...

18 Apr 2024 20:54:13
abc
 
रशियामधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने सोशल मीडियाच्या आहारी जाणे कसे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते, याचा नुकताच प्रत्यय आला. ४४ वर्षीय रशियन इन्फ्ल्युएन्सर मॅक्सिम ल्युटयी याने चक्क आपल्या लहान बाळाला उपाशी ठेवले. सूर्यप्रकाश हाच त्याचा आहार म्हणून अन्नपाण्याचा कणही त्या बाळाच्या पोटात जाऊ दिला नाही. बाळाच्या आईलाही स्तनपानापासून रोखले. अखेर त्या बाळाचा कुपोषण, डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवला आणि परिणामी बाळाचे वडील आणि आईदेखील आज गजाआड आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरील प्रसिद्धीची भूक आणि असे जीवघेणे अतिरेकी प्रयोग यांच्या परिणामांची मीमांसा करणारा हा लेख...
 
सोशल मीडियावर ट्रेंड होण्यासाठी, अल्पावधीत प्रसिद्धी पदरात पाडण्यासाठी काही मंडळी कुठल्या थराला जातील, याचा नेम नाही. सोशल मीडियाच्या जगतात झळकण्यासाठी मग ‘कंटेट’च्या नावाखाली अक्षरश: वेडेचाळे केले जातात. आपल्यासारखी सोशल मीडिया चाळणारी मंडळीही मग अशा अजबगजब व्हिडिओंवरुन काही सेकंद का होईना स्थिरावतात आणि अशा लोकांचे फावते. आपल्या बाळाला केवळ सूर्यप्रकाश दाखवून उपाशी मारणारा हा रशियन इन्फ्ल्युएन्सर मॅक्सिमही त्यापैकीच एक. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल ६० हजार फॉलोअर्स. हा मॅक्सिम ज्ञान पाजळायचा, ते अन्नधान्य हे कच्चे खाणेच कसे योग्य, याविषयी. तसेच डाएटिंगच्या विविध प्रकारांविषयीही तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असे. आता यावरुन कुणाला वाटावे की, मॅक्सिम हा कोणी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर वगैरे असावा. पण, तसेही काही नाही. तरीही केवळ प्रसिद्धीलोलुप मॅक्सिम असा ‘कंटेट’ तयार करत होता आणि बघ्यांची गर्दीही खेचत होता.
 
या माथेफिरु मॅक्सिमच्या डोक्यात मग कुठूनतरी ‘सन डाएट’ ही संकल्पना आली. त्याला ‘ब्रथेरियनिझम’ किंवा ‘प्राणिक नरिशमेंट’ असेही म्हटले जाते. त्यानुसार म्हणे, केवळ सूर्यप्रकाशावरच माणूस जगू शकतो. त्याला अन्न, पाणी वगैरेची मुळी जगण्यासाठी आवश्यकताच नाही. असे असतेस तर जगातील उपासमारीची समस्याच संपुष्टात आली असती! आता मॅक्सिमने हा प्रयोग स्वत:वर केला की नाही, ठाऊक नाही, पण आपल्या इवल्याशा बाळालाच त्याने या प्रयोगाचे ‘गिनिपीग’ बनविले. बाळाला आईचे दूध तर सोडाच, अन्नपाण्याचा कणही त्याने दिला नाही. माझे बाळ बघा कसे सूर्यप्रकाशावर जगते, म्हणत त्याने बाळाचे असे व्हिडिओ तयार करुन फुशारक्या मारायला सुरुवात केली. तुम्हीही असेच सूर्यप्रकाशावर जगू शकता, असा संदेश आपल्या व्हिडिओतून मॅक्सिमने सोशल मीडियावरील प्रेक्षकांना दिला. मॅक्सिमला आपल्या बाळाला ‘सुपरमॅन’ बनवायचे होते, म्हणून हा जीवघेणा प्रयोग करण्यापर्यंत त्याची मजल गेली. एवढेच नाही, तर बाळ आजारी पडल्यावर त्याला औषधोपचारही नाकारले. बाळाला बळजबरीने थंड पाण्याने अंघोळ घातली. पण, मॅक्सिमच्या या छळवादामुळे बाळाची तब्येत आणखीन बिघडली. अखेरीस मॅक्सिमच्या हातापाया पडून बायकोने बाळासह रुग्णालय गाठले खरे, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सूर्यकिरणे हेच अन्न मानण्याच्या या मूर्खपणाच्या प्रयोगात, त्याच प्रखर सूर्यकिरणांनी त्या तान्हुल्या जीवाचा घास घेतला.
 
या प्रकरणी मॅक्सिमला ९४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, त्याला साडेआठ वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. सध्या तुरुंगात असलेल्या मॅक्सिमला आता कच्चे अन्नधान्य खाण्याच्या सवयीचा, डेअरी उत्पादनांचे सेवन न करण्याच्या त्याच्या व्रताचाही सपशेल विसर पडला. आता बाळाला सूर्यप्रकाशावर आयुष्यभर जगवण्याच्या नादात त्याला ठार करणारा हा मॅक्सिम मांसाहारही करु लागला.
 
एकूणच काय तर, सोशल मीडियावरील प्रसिद्धीची हाव अशाप्रकारे एका माणसालाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबालाही उद्ध्वस्त करू शकते. म्हणूनच आहार, व्यायाम अथवा औषधे यासंबंधीच्या सोशल मीडियावरील फुकटच्या सल्लागारांकडे दुर्लक्ष करणेच योग्य. तसेच कुठल्याही क्षेत्राविषयी ‘कंटेंट’ निर्मिती करणार्‍यांचा अर्थोअर्थी त्या क्षेत्राशी संबंध आहे का? त्यांची अशी सल्ले देण्याची, शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता आहे का? याची खातरजमा सोशल मीडियावरील प्रेक्षकांनीही करणे तितकेच जरुरी. कारण, असा जीवघेणा प्रयोग ‘कंटेट’च्या नावाखाली खपवणारे जितके दोषी, तितकेच या ‘कंटेट’ला प्रोत्साहन देणारेही दोषीच!
Powered By Sangraha 9.0