मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमीनिमित्त मुंबईतील विविध मंडळांना भेटी दिल्या आणि विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वरळीमधील जिजामाता नगर, वरळी पोलीस ग्राउंड, वरळी पोलीस कंपाउंड येथील विविध मंडळे, परेलमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ, भोईवाडामधील श्रीराम स्पोर्ट्स मंडळ, काळाचौकी येथील अजंठा क्रीडा मंडळ, डोंगरीमधील श्रीराम मित्र मंडळ यासह इतर अनेक मंडळांना मंत्री लोढा यांनी भेट दिली.
याप्रसंगी या मंडळांनी सत्यनारायण पूजा, विविध यज्ञ, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामुळे शहराचे वातावरण राममय झाले होते. ५०० वर्षांनंतर प्रभू श्रीरामांचे अयोध्येत आगमन झाल्याने भाविकांमध्ये वेगळाच उत्साह बघायला मिळाला.
रामनवमीनिमित्त शुभेच्छा देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी आहे. त्यामुळे सर्वांसाठीच त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देताना आज अतिशय आनंद होत आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर पुन्हा निर्माण झाले याचा आज प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार! विकासाच्या कामांसह भारतीय संस्कृती, तत्व, विचार आणि आदर्शांचे पालन करूनच आपल्या देशाचे भविष्य उज्वल होईल हा विश्वास आहे. त्यामुळे या मूल्यांचा, संस्कृतीचा, आदर्शांचा विनाश करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या समाजकंटकांना कधीच थारा मिळणार नाही, याची आपण काळजी घेऊया," असे ते म्हणाले.