‘कॅनडास्तान’ची नांदी...

17 Apr 2024 21:15:24
 
justine trudeo
 
जस्टिन ट्रुडो छुपे मुस्लीम आहेत का? त्यांनी धर्मांतरण केले आहे का? अशा आशयाच्या भरपूर चर्चा २०१७-१८ साली रंगल्या होत्या. त्यावर कॅनडाच्या समाजमाध्यमांवर भरपूर खल झाला. ही घटना आठवण्याचे कारण की, नुकतेच कॅनडाच्या ओंटारियो येथील संसदेत कॅनडा सरकारने अर्थसंकल्प सादर केला. त्यात एक विशेष तरतूद आहे. आता देशामध्ये मुस्लिमांना शरीयानुसार हलाल पद्धतीने कर्ज घेता येईल, वस्तू गहाण ठेवता येतील. पण, यात काही विशेष नाही. कारण, या देशाचे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो. ते जगभरातल्या मुस्लिमांचे गैरमुस्लीम कैवारीच जणू!
 
इस्लामनुसार कर्जावरचे व्याज वसूल करणे, हे हराम-पाप आहे. त्यामुळे व्याजखोरी न करता कर्ज मिळेल, त्यासाठी गहाण ठेवलेल्या वस्तूंवरही व्याज आकारले जाणार नाही, अशा प्रकारची बँकिंग व्यवस्था अधिकृतपणे कॅनडा सरकार उभारणार आहे. याबाबत जस्टीन ट्रुडोच्या सरकारने म्हटले की, कॅनडातील मुस्लिमांना त्यांच्या रितीरिवाज, संस्कृतीप्रमाणे जगता यावे म्हणून ‘हलाल बँकिंग पद्धती’ सुरू करण्यात येणार आहे. पण, जरा मागोवा घेताना दिसते की, देशातील मुस्लिमांनी गेले अनेक दशकापूर्वीच कॅनडातील अधिकृत बँकिंग व्यवस्थेला फाटा देत त्यांची स्वत:ची हलाल बँकिंग व्यवस्था सुरू केली आहे. अर्थात, त्यावर कॅनडा सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे मुस्लीम समुदायाच्या या व्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मुख्यतः देशातील मुस्लिमांना खूश करण्यासाठी ट्रुडो सरकार कॅनडामध्ये मुस्लिमांसाठी शरीयानुसार बँकिंग सुरू करणार आहे. पण, व्याज न घेता कर्ज दिल्यावर बँकेला नफा कसा होणार, याचे उत्तर ट्रुडो सरकारकडे नाही.
 
असो. मुस्लिमांचे लोकसमर्थन मिळवण्यासाठी ट्रुडो यांनी त्यांच्या देशातील दहशतवाद आणि कट्टरतावादासमोर गुडघे टेकले आहेत. त्यांच्या देशात मुस्लीम दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतवादी सुखनैव आसरा घेतात, हे जगाने पाहिले. दि. ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याविरोधात सगळे जग एकत्र आले. त्यानंतर इस्रायलने ‘हमास’वर हल्ला केला. तेव्हा कॅनडामध्येही ‘हमास’ समर्थक आणि इस्रायल समर्थक असे दोन गट झाले. ट्रुडो या काळात एका प्रमुख मशिदीमध्ये गेले, तेव्हा तिथे लाखो लोकांनी ट्रुडो यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जोपर्यंत ‘हमास’चे समर्थन करत नाही आणि इस्रायलला विरोध करत नाही, तोपर्यंत आमचा विरोध राहील, असे हा समुदाय म्हणत होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघामध्ये ट्रुडोंनी इस्रायल- ‘हमास’ युद्धबंदीचे समर्थन केले. गाझा पट्टीच्या नागरिकांच्या जीवन हक्काबद्दलही ते बोलले. ट्रुडो यांच्या या भूमिकेमुळे दहशतवादी संघटना ‘हमास’ने त्यांचे उघड उघड अभिनंदन केले. बंदी घातलेली दहशतवादी संघटना उघडपणे एखाद्या पंतप्रधानाचे अभिनंदन करते, ही घटना जगाने पहिल्यांदाच पाहिली. त्यामुळे कॅनडामध्ये वातावरण तापले.
 
पण, ट्रुडो यांच्यावर काही परिणाम झाला नाही. कारण, कॅनडामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत मुस्लीम दुसर्‍या क्रमांकावर आहेत. २००१ साली दोन टक्के लोकसंख्या असलेला मुस्लीम समाज आज पाच टक्के झाला आहे. बहुसंख्य असलेल्या ख्रिस्ती समाजाची मत विभागली जातात. मुस्लिमांची एकगठ्ठा मत मिळाली, तर सत्ता हातात येईल, असा विचार जस्टिन करतात. देशामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढावी, यासाठी जस्टिन यांनी जगभरातल्या शरणार्थी मुस्लिमांसाठी कॅनडाची कवाडे खुली केली. सीरियामधली ४० हजार मुस्लीम शरणार्थींचे त्यांनी कॅनडामध्ये पुनर्वसन केले, तर गेल्याच वर्षी त्यांनी जाहीर केले की, चीनमधील दहा हजार उघूर मुस्लिमांचे ते कॅनडामध्ये पुनर्वसन करणार आहेत. या सगळ्याविरोधात कॅनडाची जनता आवाज उठवत असते. शेवटी देशातील संघटित मुस्लिमांपुढे या जनतेचा आवाज दबला जातो. मात्र, असे सगळे सुरू असताना ट्रुडो हे कॅनडामध्ये मुस्लीम फोबियाविरोधात राष्ट्रीय परिषदा घेतात. त्यामुळे ट्रुडो त्यांच्या देशातील मुस्लिमांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. दुसरीकडे कॅनडातील गैर-मुस्लीम जनता एकवटत आहे. मुस्लीम बहुसंख्य होतील आणि देशाचे इस्लामीकरण करतील, अशी भीती कॅनडाच्या गैरमुस्लिमांमध्ये बळावली आहे. कट्टरपंथीयांपासून कॅनडाला वाचवा, असे जबरदस्त वातावरण तिथल्या जनतेत तयार झाले आहे. जस्टिन ट्रुडो यांचे लांगूलचालन त्यांना पुन्हा सत्तेत बसवेल की अज्ञातवासात पाठवेल, हे भविष्यात समोर येईलच!
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0