रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा...

17 Apr 2024 20:41:03
manasa
 
एका लहानशा खेड्यातून आधी मुंबई आणि नंतर अगदी परदेशात भरारी घेतलेले प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गणपत सावंत यांच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी...
 
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून आज अनेक डॉक्टर्स समाजात कार्यरत आहेत. असेच गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मुंबईत स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आपल्या वैद्यकीय सेवेची छाप उमटविणारे डॉक्टर गणपत सावंत. सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी या छोट्याशा खेडेगावात एका शेतकी कुटुंबात त्यांचा १९६५ साली जन्म झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते मुंबईला त्यांच्या आत्याकडे वास्तव्यास आले. मुंबईतील सँडहर्स्ट रोडजवळील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पुढे काय करायचे, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा, याबाबत अस्पष्टताच होती. पण, दहावीच्या परीक्षेतील उत्तम गुणांमुळे मित्रांनी पुढाकार घेत, त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याबाबत गणपत यांना आश्वस्त केले आणि त्यांना रूपारेल महाविद्यालयात अकरावीला प्रवेशही मिळाला.
 
महाविद्यालयातील हुशार विद्यार्थी पाहून, गणपत यांच्या मनात काहीसा न्यूनगंड निर्माण झाला. मात्र, अकरावीला मिळालेले उत्तम गुण बारावीमध्ये त्यांच्या मनात आत्मविश्वास जागृत करुन गेले. न्यूनगंडाची जागा आत्मविश्वासाने घेतली आणि अकरावी-बारावी अगदी विशेष प्रावीण्य श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. पुढे त्यांना ‘केईएम’च्या ख्यातानाम महाविद्यालयात ‘एमबीबीएस’साठी प्रवेश मिळाला. मुळातच ‘जीवशास्त्र’ हा आवडीचा विषय असलेल्या गणपत यांनी चांगल्या गुणांनी पदवी प्राप्त केली. मुलगा डॉक्टर झाला, हे समजल्यावर आईवडिलांसह इतरांचेही ‘गावी परत येऊन गणपत यांनी एखादा छोटा दवाखाना सुरू करावा’ असे मत पडले. पण, ‘केईएम’मधूनच पुढे जिद्दीने त्यांनी पदव्युत्तर पदवी घेत ‘एमडी’चे शिक्षणही पूर्ण केले. ‘एमडी’च्या पुढे शिक्षण घेणे आर्थिक कारणांमुळे त्यांना शक्य नव्हते. म्हणून नव्याने सुरू झालेल्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. अनेक पुढच्या पदव्या मिळवत, त्यांनी वीस वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांचे विद्यार्थी कार्यरत असून, ते चांगली कामगिरी बजावत आहेत. पण, ‘एमडी’पर्यंतच न थांबता, गणपत यांनी पुढे ‘डीजीओ’, ‘एफसीपीएस’, ‘डीएफपी’, ‘डीआयसीओजी’, ‘डीएनबी’ अशा वैद्यकीय क्षेत्रातील जवळजवळ सगळ्याच पदव्या संपादित केल्या. त्याचबरोबर त्यांनी जर्मनीतील ’डिप्लोमा इन गायनॉकॉलॉजिकल एंडोस्कोपी’हा अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी घाटकोपर येथे स्वतःचे नर्सिंग होम सुरू केले.
 
घाटकोपर येथे ‘नोबल’ व पुढे ‘नोबल प्लस’ रुग्णालय सुरू केले. आज एकाच छताखाली स्त्रियांसंबंधी सर्व उपचार करणारी त्यांची ही अत्याधुनिक रुग्णालये कार्यरत आहेत. १९९२ पासून ते आजतागायत अशी तब्बल ३२ वर्षे ते अखंडपणे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवा बजावत असून, त्यांनी आजवर ५० हजारांहून अधिक स्त्रियांवर उपचार केले आहेत. मासिक पाळी, वंध्यत्व, गर्भाशयाच्या समस्या यांसारख्या अनेक लहान-मोठ्या आजारांवर उपचार केल्याचे ते सांगतात. गरोदर न राहू शकणार्‍या स्त्रियांवरील उपचारानंतर त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद समाधान देणारा असतो, असेही ते सांगतात. केवळ स्वतःची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती करुन न थांबता, डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण शिकलेल्या फलटणजवळच्या ‘मठाची वाडी’ शाळेत दरवर्षी मोफत वैद्यकीय शिबिरे घ्यायला सुरूवात केली. त्याचबरोबर गावातील काही गरजू व्यक्तींना ते मोफत उपचारही देतात.
 
अनेक लहान, तरूण मुली त्यांच्या या शिबिरांचा लाभ घेतात. तसेच, आता वाढत चाललेल्या ‘ऑटिझम’ या आजारासाठीही ते जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करतात. शैक्षणिक प्रगतीबरोबरच गेली अनेक वर्षे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारलेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपणार्‍या डॉ. गणपत यांना विविध राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅक्स’, ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स‘, ‘मुंबई ऑब्स्टेट्रीक अ‍ॅण्ड गायनॉकोलॉजिकल सोसायटी’, ‘फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ अशा नामवंत संस्थांचे ते सभासद राहिले आहेत. तसेच ‘मेनोपॉज सोसायटी ऑफ इंडियाचे‘ही ते सदस्य होते. नुकतेच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या ‘नॉर्थ-ईस्ट मुंबई सबअर्बन ब्रँच’चे अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.
 
“तरूणींना पोषक आहाराबरोबरच, उत्तम जीवनशैली, मानसिक आरोग्य आणि व्यायामाची आज नितांत गरज आहे. ‘वर्क- लाईफ बॅलन्स’ सांभाळत प्रत्येक स्त्रीने सशक्त व्हायला हवे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. खेड्यातून येऊन रुग्णसेवेच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त करणार्‍या डॉ. गणपत सावंत यांना दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून आरोग्यमय सदिच्छा!
Powered By Sangraha 9.0