विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. इथे नांदणारी प्रत्येक संस्कृती एकमेकांपासून वेगळी आहे. तरीही इथल्या प्रत्येक संस्कृतीला रामनामाने जोडले आहे. इथल्या प्रत्येक संस्कृतीची स्वत:ची एक रामकथा आहे. या कथेत फरक आहे. तिथल्या चालीरीती परंपरा यांचा प्रभाव या रामकथेवर आहे. भारताचा अविभाज्य अंग असणार्या ईशान्य भारतातल्या रामकथेबाबत या लेखात जाणून घेऊया.....
आसेतु हिमाचल पसरलेल्या भारताला जोडणारा हिंदू आस्थेचा भक्कम दुवा म्हणजे प्रभू श्रीराम. दीर्घकाळ स्वतःच्याच घरात निर्वासित असलेले श्रीराम, जानेवारी महिन्यात अयोध्येत विराजमान झाले आणि देशभर आनंदोत्सव साजरा झाला. या आनंदोत्सवात रंगायला ईशान्य भारतात २०२० पासूनच सुरुवात झाली होती. राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी देशभरातल्या पवित्र ठिकाणांची माती आणि नद्यांचे जल अयोध्येत आणले गेले होते. ईशान्य भारतातल्या ब्रह्मपुत्रा, बराक, तीराप, इंफाळ, उमियाम, जवटींग, धनसिरी, धालेश्वरी, डिसंग, कोपिली, माहूर, लान्गटिंग, गुमती, कुशियारा, लोंगाई , तूत, तलावांग, कर्णफुली, जैरल, सिपू, सियोम, डिकरॉन्ग, मोरणा गंगा, दिफु, लाँग्नीत, महामाया सुरमा यासारख्या नद्यांचे जलही अयोध्येत पोहोचले होते. या नद्यांच्या काठावर वसलेली आणि पाण्याने जोपासलेली ईशान्य भारताची प्राचीन संस्कृतीच जणू अयोध्येत पोहोचली होती. दीर्घकाळ, देशाच्या मुख्य धारेपासून दूर राहिलेल्या ईशान्य भारताकडे संपन्न सांस्कृतिक वारसा आहे. मात्र, आजही भारतासारख्या खंडप्राय देशात, ईशान्य भारताबद्दल अनभिज्ञता आहे.
एकेकाळी हिंदू संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेला ईशान्य भारत, दक्षिणपूर्वेकडच्या देशांना आणि चीनला जोडणार्या व्यापाराच्या प्रसिद्ध रेशीम मार्गाचा हिस्सा होता. मात्र, ब्रिटिशांच्या आणि मिशनरींच्या दबावामुळे हळूहळू स्थानिक संस्कृती नष्ट झाली. ईशान्य भारतातल्या सर्व राज्यांमध्ये थोड्याबहुत फरकाने हेच झाल्याने, एकेकाळी हिंदू संस्कृतीचा पगडा असलेली समाज व्यवस्था विस्कळीत झाली. स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण देशाला ईशान्य भारत अपरिचित होताच आणि जेव्हा परिचय होऊ लागला तेव्हा तिकडे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात झाले होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या धर्मांतरणामुळे, या भागातील प्राचीन हिंदू संस्कृतीच्या अस्तित्वाला पद्धतशीरपणे पुसून टाकण्यात आले. अलीकडे, २०१४ नंतर केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे, ईशान्येकडची लुप्त होत असलेली विविधरंगी जनसंस्कृती उर्वरित भारतासमोर येतेय. राम मंदिराच्या निमित्ताने प्रभू रामचंद्रांचा स्थानिक जनमानसावर असलेला पगडा देशासमोर येतो आहे.
शेकडो जनजाती जमातींमध्ये विभागलेला ईशान्य भारत शेकडो वर्षांचा सांस्कृतिक इतिहास बाळगून आहे. यातल्या बहुतांश जमातींच्या लोककथा आणि संस्कृतीवर रामायणाचा पगडा तर दिसून येतो. इथे अनेक जनजातीचे स्वतःच्या भाषेत लिहिलेले रामायणही प्रचलित आहे. ईशान्य भारतातल्या अनेक जनजाती आदिवासी, जंगलांत राहणार्या, भटक्या असून त्यांच्या रामायणातले अनेक संदर्भ, कथा वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळ्या आहेत. भिल्ल, मुंडा, संथाल, कोरकू, सौरस यासारख्या अनेक जनजातींची रामायणं स्थानिक भौगोलिक स्थितीनुसार बदलली असूनही रामायणाचा मूळ गाभा, प्रभू श्रीराम हाच असून त्यांच्या गाणी, कथा, गोष्टींमधून समाजासाठी श्रीरामाला आदर्शस्थानी ठेवले गेलंय.
ईशान्य भारताचे दार समजले जाणारे आसाम हे इथले सर्वांत मोठे राज्य. ६०० वर्षांहून जास्त काळ, ओहोम राजांचे साम्राज्यं इथे होते. त्यांच्या राज्यकाळात विविध ओहोम राजांनी श्रीरामाला जमिनी दान दिल्याचे शिलालेख राज्यात बघायला मिळतात. प्राचीन काळात दक्षिणपूर्व देश आणि चीनला जोडणारा व्यापारी मार्ग इथूनच जात असल्याने ईशान्य भारताला अनन्यसाधारण महत्त्वाकांक्षा होते. ओहोम राजसत्तेने केलेल्या राममंदिराच्या निर्मितीचा सर्वांत जुना उल्लेख सलेला टीबी प्रकारातला ताम्रपट सातव्या शतकातील राजा भास्करवर्मापर्यंत जातो. सर्व ओहोमराजांनी श्रीरामाच्या मंदिरांखेरीज इतर देवतांच्या मंदिरांचीही निर्मिती केली. यावरून जाणवते की, तत्कालीन राज्यकर्त्यांनी राज्यकारभारात धर्मकारणालाही महत्त्व दिले होते आणि प्रजेच्या आस्थेचा आदर केला होता.
सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या आसामात लोकसाहित्य व कलांवर रामायणाचा प्रभाव पडलेला दिसतो. १४ व्या शतकातील प्रख्यात आसामी कवी माधव कंदाली यांनी आसामी भाषेत लिहिलेले सप्तकांड रामायण हे सर्वांत जुने लिखाण समजले जाते. आसामी साहित्यिक श्रीमंता संकरदेवा यांनी १६ व्या शतकात प्रभू रामचंद्राला केंद्रस्थानी ठेवून राम विजय सारख्या अनेक अंकी नाटकांची निर्मिती केली. संकरदेवांनी रामाला मर्यादा पुरुषोत्तम, त्यागाचे प्रतीक उल्लेखलंय. त्यांच्याच जोडीला, दुर्गाबर कायाथा या आसामी कवींनी गीती -रामायणाची निर्मिती केली. ज्यातून लोकप्रिय लोकगीतांची निर्मिती झाली आहे. १७व्या शतकात, अनंत दासा यांनी रचलेले राम कीर्तन, प्रभू रामाचे तत्कालीन समाजात रुजले असणे अधोरेखित करते. आसाममधल्या कर्बी जनजामातीत साबीन आलून नावाने कर्बी भाषेत लिहिलेले रामायण आहे. दक्षिण पूर्वेकडच्या देशातील रामायणाशी साम्य ठेवणारे हे रामायण खूप स्वारस्यपूर्ण आहे. हे कर्बी स्वत:ला सुग्रीवाचे वंशज मानतात आणि शेती करून जगतात. यांच्या रामायणात, राजा जनक हा शेतकरी असून, त्याच्या शेतात काम करणार्या लोकांना लांडोरीच्या अंड्यांमध्ये वेगळे दिसणारे अंड मिळते, जे तो आपल्या हेमफी नावाच्या बायकोला सांभाळायला देतो.
काही दिवसांनी, त्या अंड्यांच्या जागी एक सुंदर मुलगी दिसून येते जिचं नाव सिंटा ठेवले जाते. या रामायणात, सिंटाला जिंकल्यावर, राम आपला भाऊ लोखोन यांच्यासोबत जनकाच्या घरी राहून जातो आणि शेतीच्या कामात मदत करतो. वाल्मिकी रामायणाच्या उलटं, इथे राम वनवासात जात नाही, तर जंगलात जाऊन सिंटा आणि लोखोनसोबत वनवासी लोकांसोबत शेतीसाठी जंगल साफ करून शेती कशी करायची हे शिकवतात. या रामायणाचा आपल्याला न पचणारा भाग म्हणजे, इथे साबीन म्हणजेच शूर्पणखा वाईट रूपात दाखवली नाहीये. ती नारोजीनच्या पहाडांमध्ये राम लोखोन आणि सिंटाला पाहते. ती सिंटाशी मैत्री करते. पुढे ती लंकेत जाते आणि सिंटाच्या सौन्दर्याचं वर्णन आपल्या भावाला, रावणाला सांगते की, माझ्याहून सुंदर स्त्री तिकडे आहे. इकडे सिंटा, लोखोनला सांगते की तू साबीनबरोबर लग्न कर. पुढे लोखोन साबीनबरोबर अर्थात शूर्पणखेबरोबर लग्न करतो. नंतर, पहिल्या रात्री ती लोखोनसमोर सिंटाबरोबर ईर्षा करायला सुरुवात करते, तेव्हा तो तिचं नाक कापून टाकतो आणि मुळातच या रामायणाचं नाव साबीन आलून- शूर्पणखेचे गाणे असे आहे. हे सगळे आपल्यासाठी खूप कठीण आहे. पण रामायणाच्या अशा अनेक आवृत्या ईशान्य भारतात आहे.
आसाम राज्यातल्या तिवा जमातीचं रामायने खरांग म्हणून, वाल्मिकी रामायणातल्या कथांचं मौखिक रामायण म्हणून पिढ्यानपिढ्या चालत आलेला सांस्कृतिक ठेवा रुपसिंग देउरी यांनी १९९२मध्ये आसामी भाषेत नोंदवून ठेवल्याने जगापुढे आणला गेलाय. आज आसाममध्ये ३२ बोलीभाषा बोलणार्या जनजाती असून यातील प्रत्येकावर रामायणाचा पगडा आहे. लग्नाची, सणाची, समारंभाची गाणी, लोकसंगीत, लोककथा यांत रामाचा आणि रामायणाचा पगडा दिसून येतो. यातल्या प्रत्येक जनजातीच्या लोककलांचा उल्लेख जागेअभावी करणे कठीण आहे. मात्र, रामकथा सादर करणार्या उल्लेखनीय लोककलांबद्दल न लिहिल्यास आसामातल्या प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा बघितल्याच नाही असे होईल.
धूलिआ भाओना या लोकप्रिय लोककला प्रकारात, साधारण २० ते २५ सदस्य असलेला समूह गायन वादन आणि नृत्य प्रकाराने ढोल,मृदूंग, पिपाण्या आणि मोठ्या थाळ्यांसारख्या झांजा घेऊन गायन नृत्य करून रामायणातील प्रसंग सादर करतात. याचसारखं, खुलीआ भाओना या कलाप्रकारात, मुखवटे घालून, एक सूत्रधार आणि अन्य कलाकार वेगवगेळी वाद्य घेऊन रामायण आणि महाभारतातले विविध प्रसंग नृत्य, गायनाद्वारे सादर करतात. याखेरीज उल्लेखनीय म्हणजे, कुसान गान या लोककला प्रकारात पारंपरिक पद्धतीने गाऊन रामकथा सादर केली जाते. भारी गान या लोककला प्रकारात लाकडाचे मुखवटे घालून, नाट्य व गायन करून रामकथा सादर केली जाते. पाटी राभा ही जमात यासाठी प्रसिद्ध आहे. दुर्गाबारीय ओजा पाली हा थोडासा शास्त्रीय नृत्य नाटकाकडे झुकणारा प्रकार आहे. ज्यासाठी दुर्गाबारांच्या गीती रामायणाचा जातो. पुतला नाच हा प्रकार, अजूनही आसाममध्ये लोकप्रिय आहे. ज्यात कठपुतळ्यांचा वापर रामकथा सांगायला केला जातो.
आजच्या घडीला, ईशान्य भारतातली बरीचशी जनता धर्मांतराने ख्रिश्चन झाली असली तरीही, त्यांच्या लोककथा, गाण्यांवर रामाचा प्रभाव दिसतो. याचं उदाहरण म्हणजे मिझोराम राज्य. मिझोराममध्ये ब्रिटिशपूर्व काळात मिझोरामची जनता श्रीराम आणि लक्ष्मणाला आपला परमेश्वर मानायचे. राम आणि लक्ष्मणाने त्यांना भातशेती करायला शिकवले असाही त्यांच्या मौखिक साहित्यातून सांगितले जायचे. आजही खेंना आणि रामा-ते उनाउ थू अर्थात राम आणि लक्ष्मणाची कथा या लोकप्रिय लोककथेतून रामायण सांगितले जाते. मिझोरामच्या रामायणात, राम आणि सीतेखेरीज खेंना, हावलावमान, लुफिरबॉन, लुसरीहा म्हणजेच लक्ष्मण, हनुमान, महिरावण आणि रावण अशी पात्रं दिसतात. आपल्याला परिचित वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळ्या कथा मिझो रामायणात आहेत.
मिझो रामायणात सीतेने रामाच्या सांगण्यावरून लुसरीहाचा रावणाचा मातीचा पुतळा बनवला. हा पुतळा जीवंत झाल्याने, रामाने सीतेवर संशय घेऊन तिला वनवासात पाठवले. हे संदर्भ दक्षिण पूर्वेकडच्या रामायणात आढळतात. आपल्यासाठी, हे संदर्भ वादग्रस्त हलकल्लोळ उडवणारे ठरू शकतात. पण, आदिवासी जनजातींच्या रामायणात हे अनेक शतकं प्रचलित आहेत. मिझो जनतेत, आजही, राम आणि खेंना अर्थात लक्ष्मण, हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग आहेत. लग्नसमारंभ, जन्म मृत्यू घटनांमध्ये, तांदूळ हातात घेऊन मिझोराममध्ये म्हटले जाते की, जेव्हा मातीतल्या गांडुळांनी दुनिया बनवण्यासाठी माती घेतली, निसर्ग देवतेने दुनिया बनवली. सत्य सांगण्यासाठी आणि गाण्यासाठी तुला रामाने आणि खेंनाने बनवले आहे. रामाचं आणि लक्ष्मणाचं आयुष्याला जोडलेले असे हे या गाण्यातून दिसून येते.
माणिक सरकारच्या अधिपत्याखाली भरडल्या गेलेल्या त्रिपुरात पुरातन काळापासून राम पूज्य असून १५व्या शतकात लिहिलेल्या राजरत्नाकर या राज्य लेखात, पुरु सेन हा त्रिपुराचा राजा, दशरथाच्या सोहोळ्यास उपस्थित होता व पुढे त्याच्या वंशजांनी, रामाची भक्ती सुरू ठेवली. पुढे १९व्या शतकाच्या सुरुवातीस, त्रिपुराचा तत्कालीन राजा, रामगंगा माणिक्य याने, शिवेंद्र द्विज यांच्याकडून अध्यात्म रामायण संस्कृतमध्ये लिहून घेतले. राजा, प्रभू रामाचा निस्सीम भक्त असल्याने हे रामायण पुढे सर्वसामान्य जनतेला शिकवले गेले. सद्यःस्थितीला, त्रिपुरात, बंगाली भाषेतील रामायण अत्यंत प्रचलित असून लोककलांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. आजही त्रिपुरातल्या खेडोपाडी, राम पांचाली अत्यंत साधासुधा लोकगीतांचा रामकथांवर आधारित कार्यक्रम श्राद्धाच्या वेळी सादर केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये, गावोगावी रामायण पाला कीर्तन हा रामकथांभोवती गुंफलेला गाणी, नृत्य आणि नाटक असा मिश्र कार्यक्रम सादर केला जातो. त्रिपुराच्या लोककला संस्कृतीमध्ये, रामाच्या कथांभोवती गुंफलेल्या नृत्य, नाट्य आणि गीतांच समृद्ध परंपरा आहे. इथल्या चहाबागांमध्ये, संथाल, मुंडा, नुनीसा, तांतीस आणि गौड जनजाती होळीदरम्यान यांचे सादरीकरण करून आनंद घेतात. त्रिपुरात प्रचलित असलेली अजून एक लोकप्रिय लोककला म्हणजे कथामौ. चरक पूजेदरम्यान, व्यावसायिक नाट्यमंडळी रामकथा सादर करतात. रंगीबेरंगी मुखवटे, पोशाख घालून आकर्षक नृत्य व पदन्यास करत, सीतास्वयंवर, वनवास, सीता हरण, राम रावण युद्ध, सीता त्याग, लव कुश जन्म असे लोकप्रिय विषय या कथामौचा विषय असतात.
त्रिपुराची ही रामकहाणी तर, अरुणाचल प्रदेशातही लोकसंस्कृतीवर रामाच्या पाऊलखुणा जागोजागी उमटलेल्या दिसतात. खामती जनजातीच्या लीक चाव लामांग या खामती रामायणाने लोकांच्या धार्मिक श्रद्धा, चालीरीती, प्रथा आणि जमातीच्या विचारधारेवर प्रभाव टाकल्याचे ठळकपणे जाणवते. अरुणाचलातल्या मिश्मी जमातीत रामकथा सांगितली जाते, एका राजाच्या मुलीला, राक्षस राजाने पळवून नेले आणि समुद्रापार नेऊन ठेवले. राजकुमारीच्या पित्याने, माकडांच्या राजाबरोबर हातमिळवणी करून या राक्षस राजाला मारून लेकीची सुटका केली आणि त्या राजाच लग्न आपल्या लेकीबरोबर लावून दिले. रामायण असे लोककथेत मिसळले आहे. कामेंग जिल्ह्यातली अका जमात स्वतःला जांबवानाची वारस समजते आणि रामायणकाळापासून रामाशी जोडलेले असण्याच भाग्य मानते. इकडे, ईशान्य भारतातल्या सर्वांत सुंदर , निसर्गसंपन्न राज्य मेघालयातल्या बहुतेक मुख्य जनजमातींमध्ये रामायणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. १९०० साली, जिबोन रॉय या सेंग खासी सामाजिक धार्मिक संघटनेच्या संस्थापकांनी खासी भाषेत रामायण एका पुस्तिकेच्या स्वरूपात बनवून घेतले.
गारो जमातीच्या लोककथा प्रकारात, इतिहासनी कट्टरांग म्हणजेच इतिहासातल्या कथा या नावाच्या लघुकथांच्या स्वरूपात रामायण उपलब्ध आहे. याच जोडीला, १९९२ साली , रेडीन मोमीन यांनी गारो भाषेत अनुवादलेले संपूर्ण रामायण छापण्यात आले. दीर्घ काळापूर्वी हिंदुत्व स्वीकारलेल्या जैंतिया जमातीतही रामायण अत्यंत लोकप्रिय आहे. री वार भागातली संत्री त्यांच्या गोडव्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. इथल्या खासी जमातीचा दृढ समाज आहे, की रावणावर विजय मिळवल्यावर, अयोध्येला परत जाताना, प्रभू रामाने स्वतः फळांच्या बिया इथे फेकल्याने या संत्र्यांमध्ये गोडवा आला आहे आणि हे रामाचं देणं आहे. मणिपूरमध्ये वैष्णव परंपरा पूर्वापार चालत आल्याने, रामकथा हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. मणिपुरी भाषेत श्रीरामाच्या कथा लारिक थिबा माईबा म्हणून लोकप्रिय आहेत. प्रचलित वाल्मिकी रामायणाचं पूर्ण मणिपुरी भाषांतर एल यब्युनगो याईमा सिंग यांनी केले असून, पंडित कलाचंद शास्त्री आणि पंडित ब्रिजबिहारी शर्मा यांनी कालिदास लिखित ‘रघुवंश’ या पुस्तकाचे मणिपुरी भाषेत अनुवाद केले आहेत. वारी लिबा या पारंपरिक कथाकथनात, पेन साकपा या पारंपरिक गानप्रकारात खोंगजोम पर्व या ढोल वाजवून, गाणी गात गप्पा गोष्टी करण्याच्या प्रकारात आणि जत्रा मेळाव्यांत रामकथा सांगितल्या जातात. आश्चर्य म्हणजे, मणिपूरमध्ये बुद्धीझम हा रामायण परंपरेचा भाग समजला जातो. टाई फाके जमातीत राम हा बोधिसत्व समजाला जातो. किती वेगळे आहे हे ने आपल्या पारंपरिक कल्पनेपेक्षा? ईशान्य भारतातल्या प्रत्येक राज्याबद्दल, तिथे नांदणार्या शेकडो जनजातींबद्दल त्यांच्या संपन्न सांस्कृतिक वारशाबद्दल लिहायचे म्हटले तर शब्दं कमी पडतील. २०१४ पासून केंद्राकडून झालेल्या सकारात्मक बदलांमुळे, आज संपूर्ण ईशान्य भारत उर्वरित देशाला खुल्या मनाने आपल्याकडे बोलावतोय. राममंदिराच्या निमित्ताने हीच वेळ आहे. ईशान्य भारतात राम अनुभवण्याची. जय श्रीराम!
रूपाली पारखे देशिंगकर,
लेखिका माय होम इंडियाच्या कार्यकर्त्या आहेत.