राम गावा राम ध्यावा..! श्रीरामरक्षा स्तोत्राची साधना, सिद्धी व महात्म्य.

    16-Apr-2024
Total Views |
ram raksha
 
खर व दूषण यांच्यासह १४ सहस्त्र असुरांना दंडकारण्यात, एकाहाती यमसदनी धाडणारे श्रीराम, अंतिम युद्धासाठी हजारो वानरांनासोबतीला घेऊन गेले नसते. म्हणूनच कलियुगासाठी श्रीराम हे सामूहिक प्रयत्नांच्या मार्गाने कार्यसिद्धी घडवण्याची प्रेरणा आहेत. जे श्रीराम यांच्याबाबत तेच त्यांच्या नावाने असलेल्या, रक्षा स्तोत्राबाबतसुद्धा सत्य आहे. या लेखात पाहूया श्रीरामरक्षा स्तोत्राविषयी..!
 
रक्षा स्तोत्र नसून, एक कवच आहे. अनेक मानसिक, शारीरिक, बौद्धिक व अंततः आत्मिक प्रेरणा, क्षमता आणि उद्धार प्राप्ती करवून घेण्याचं. कवच म्हणजे एखाद्या बुलेट प्रुफ जॅकेट किंवा ब्लॅक कॅट कमांडोप्रमाणे असते. ज्याने या कवचाला धारण केले आहे, त्याचे सर्वांगांनी रक्षण हे या कवचाचे कार्य असते. पण, श्रीराम रक्षा स्तोत्राचे वैशिष्ट्य हे आहे की, ते धारण करणार्‍याला सद्हेतूने प्रेरित करून, चुकीचं वागण्यापासून परावृत्तदेखील करते.मुळात कोणतेही स्तोत्र किंवा मंत्र हा सिद्ध व्हावा किंवा करावा लागतो. सिद्ध केल्यावर, त्यानंतरच, त्या स्तोत्राचं कवच, आपल्या कार्यास सिद्ध होऊ शकते. पण सिद्ध करणे म्हणजे काय. तर ते स्तोत्र किंवा मंत्र ज्या कार्यासाठी रचण्यात आलेले आहे, त्यासाठी त्याला तयार करणे. ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते. ती प्रत्येक स्तोत्र व मंत्र, यांच्या सिद्धयर्थ मांडलेली असते. सर्वसाधारणपणे, एखादा स्तोत्र किंवा मंत्र ठरावीक संख्या म्हणून, त्याचं पारायण केल्यास, त्या स्तोत्राची निर्मिती ज्यासाठी केलेली आहे, त्या कार्याला ते स्तोत्र व मंत्र सिद्ध होते. उदाहरणार्थ एखादा अ‍ॅप डाऊनलोड करून, तो वापरण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी कराव्या लागतात, त्याचप्रमाणे हे अनुष्ठान आहे.
 
रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्यासाठी त्याचे अनुष्ठान करावे लागते. अनुष्ठान म्हटले की, त्यासाठी काही यम नियम असतात. अगदी नुकताच घडलेला श्रीराम मंदिर सोहळा आठवा. त्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प्रत्यक्ष पंतप्रधान मोदीजी यांनी सुद्धा, २२ जानेवारी आधी ११ दिवसाचं अनुष्ठान ठेवून, मगच स्वतःला त्या कार्यासाठी सिद्ध केले. अनुष्ठानाचे मुख्य कारण, त्या स्तोत्र व मंत्र यांची सिद्धता प्राप्तीसाठी स्वतःला शुचिर्भूत करणे.
 
म्हणजे त्या स्तोत्रात ते गुणधर्म, तो भावधर्म, तो बीजधर्म अस्तित्वात असतो. पण तो प्राप्त करून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ एखाद्या छोट्याशा बीजामध्ये, एक महावृक्ष होण्याची योग्यता आणि गुणधर्म असतो. परंतु त्यासाठी जमिनीची मशागत करून, त्या बीजाला धरित्रीच्या कुशीत पेरावं लागते. त्याची काळजी घ्यावी लागते, निगा राखावी लागते, खत पाणी द्यावे लागते. त्यानंतर त्यातून कोंब येऊन कालांतराने तेच बीज वृक्षात परिवर्तीत होते.
 
याच नियमानुसार, रामरक्षेच्या सिद्धतेसाठी अनुष्ठान करावे लागते. ते अनुष्ठान, चैत्र किंवा आश्विन यापैकी एका नवरात्रात नऊ दिवसांत त्या स्तोत्राचं ठराविक पठण करून, पूर्ण करावे लागते. त्याची पद्धती याप्रमाणे आहे.चैत्रातील शुद्ध प्रतिपदा ते नवमी अर्थात रामनवमीपर्यंत किंवा आश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून नवरात्राचे नऊ दिवस, या रामरक्षेचे प्रतिदिन १२ वेळा पठण करावे. एकच वेळ, एकच स्थळ, एकच बैठक योजून नऊ दिवस, त्याच स्थानी बसून, प्रतिदिन १२ याप्रमाणे ९ दिवसांत १०८ वेळा रामरक्षेचा पाठ, खणखणीत आवाजात, करावा.
 
प्रतिदिन पहिल्यांदा म्हणताना अस्य श्री रामरक्षा ....... पासून राम रामेती रामेती..... या श्लोकापर्यंत म्हणून झाल्यावर पुढे ११ वेळा चरीतम् रघुनाथस्य पासून .....राम रामेती रामेती इथपर्यंत पठण करावं. असे एकूण १२ वेळा झाल्यावर, बाराव्या वेळी इतिश्री बुधकौशिक विरचीतं.... या श्लोेकाने समाप्ती करून, अनुष्ठान पूर्ण करावं.हो स्तोत्रमंत्र शुद्ध सात्विक लहरी निर्माण करून, त्यांना आपल्या कार्यार्थ सिद्ध करायचे असल्यामुळे, अनुष्ठान सुरू करण्याआधी शुचिर्भूत होणे अर्थात स्नान करून, धुत वस्त्र नेसून, बसण व त्यासाठी एक स्वच्छ बैठक अंथरून घेणे आवश्यक आहे. एकच स्थान प्रतिदिन असावे. कारण एकच स्थान व पूर्ण क्षमतेच्या ऊर्जा व शक्ती निर्मिती यांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे आणि हे विज्ञान सिद्ध आहे.
 
१२ वेळा पठण होईपर्यंत काहीही बोलू नये. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जी अतिरिक्त ऊर्जा व बलनिर्मिती होत असते, ती योग्य प्रमाणात साठवण्यासाठी मन बुद्धी हे स्थिर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उत्तम वातावरण निर्मितीसाठी सुवासिक धूप, उदबत्ती व एक तुपाचा /तेलाचा दिवा लावावा. याचा उपयोग सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी उपयोग होतो. हे अनुष्ठान सकाळी अथवा सायंकाळी करावे. त्यामुळे सकाळी केल्यास दिवा तुपाचा आणि सायंकाळी केल्यास दिवा तेलाचा लावावा. नऊ दिवसाचं अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर, नवव्या दिवशी गोड धोड करून पारणे फेडावे.स्तोत्र सिद्धी पश्चात साधकाला काही नियम आयुष्यभर पाळावे लागतात. कारण, रामरक्षा शुद्ध आणि सात्विक स्वरूपाच्या लहरी प्रक्षेपित करत असल्या कारणाने, त्यांची सात्विकता आयुष्यभर सांभाळली तरच ती सिद्धी आपल्या सोबत राहील, हे ध्यानात ठेवावे.
 
सिद्ध झालेल्या रामरक्षेने आपल्या आयुष्यात आपण एक प्रकारचे सुरक्षा कवचसोबत असल्याची अनुभूती प्राप्त करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील सात्विक ऊर्जा वाढते. सात्विक लहरी प्राप्तीमुळे, नकारात्मक लहरी आपल्यापर्यंत येण्यास अटकाव केला जातो. रामरक्षा अनुष्ठान एखाद्या विशिष्ट उद्देशाने अथवा प्राप्तीसाठी केले जावे. त्याचा उद्देश भौतिक लाभ अथवा धनप्राप्ती असा नसावा. अर्थात हे सिद्ध झाल्यानंतरचे काही लाभ आहेत. पण मुळात रामरक्षा हा स्वयं सिद्ध मंत्र असल्याकारणाने, आपल्या प्रतिदिन कार्यातसुद्धा, रामरक्षेच्या एकदा नित्य पठणाने, आयुष्यातील, विचारातील, आचारातील व बुद्धितील नकारात्मक भावभावना नष्ट होऊन, कोणत्याही विपरित परिस्थितीत मनाचा, बुद्धीचा, वाचेचा आणि देहाचा तोल जाणार नाही, अशी अनुभूती आपल्याला वेळोवेळी येते किंबहुना कोणत्याही संकटात किंवा ऊर्जित काळात, आपल्या विचार आचार उच्चार यांचे पाय जमिनीवर राहण्यास, या स्तोत्राचं नित्य पठण नक्कीच सहाय्यभूत होते.
 
मुळात एक लक्षात घ्या की, हे संपूर्ण विश्व हे लहरी अर्थात र्ींळलीरींळेपी वर आधारित असल्यामुळे, देह, बुद्धी मन हे त्याच माध्यमातून कार्य करतात. त्यामुळे सकारात्मक व नकारात्मक यांपैकी ज्या लहरी श्रेष्ठ व बलवान असतात, त्यानुसार माणसाचे विचार असतात. त्यामुळे सध्याच्या विपरित, स्पर्धात्मक, आव्हानात्मक आणि माणसाच्या गुणांची परीक्षा घेणार्‍या काळात, स्थिर मन व बुद्धी यांची कसोटी लागते.रामरक्षा स्तोत्र हे यात उत्तम ताळमेळ जमवून, मनाला शांत व स्थिर राखण्यास मदत करते. याच्या शब्दांच्या उच्चाराने, शरीरातील उपयुक्त स्राव पुरेश्या प्रमाणात कार्यरत होऊन, अपायकारक स्राव निर्मितीस अटकाव होतो. त्यामुळे मनाचा व बुद्धीचा तोल टिकून राहतो. याच्या प्रतिदिन पठणाने, उत्तम व सुदृढ स्वास्थ्य, मानसिक संतुलन आणि उत्तम ऊर्जा निर्मिती होऊन, शरीर कोणत्याही कार्यासाठी, सदैव सिद्ध असते. याचा एक वैज्ञानिक आधार म्हणजे रा शब्द सूर्य ऊर्जेचा कारक आणि पिंगला नाडीवर प्रभाव पाडणारा आहे. त्याचप्रमाणे म शब्द चंद्र ऊर्जेचा कारक असून इडा नाडीला प्रभावित करतो. म्हणून या स्तोत्रात खड्या आवाजात उच्चारल्या गेलेल्या राम नामामुळे श्वास उष्वास यांचं संतुलन उत्तम प्रकारे राखले जाते. ज्यामुळे मनाचे, शरीराचे संतुलन राखले जाते.
 
रामरक्षा स्तोत्राचं सौंदर्य असे आहे की, श्लोक क्र. चार ते श्लोक क्र. नऊ या सहा श्लोकांमध्ये, हे सौंदर्य दोन बाजूंनी किंवा दोन अर्थाने जाणवते.पहिली गोष्ट म्हणजे शरीराच्या शीश अर्थात आपले मस्तक किंवा शीर तिथपासून ते पायापर्यंत रामरक्षा कशाप्रकारे आपले रक्षण करते, याचे वर्णन शिरोमे राघव पातू इथपासून पातु रामो खिलम वपू इथपर्यंत संपूर्ण शरीराला रामरक्षा कशाप्रकारे कवचरूप कार्य करते, हे मांडण्यात आले आहे.
 
दुसर्‍या अर्थाने श्लोक क्रमांक चारपासून श्लोक क्रमांक नऊमध्ये श्रीरामाच्या संपूर्ण जीवनातील त्या त्या कालखंडातील विशिष्ट नामाभीधानाने उल्लेखित करून, या सहा श्लोकात संपूर्ण रामायण, राघव या बालरूपापासून विभीषणश्री अर्थात रावणाचा वध केल्यानंतर विभीषण यांचा राज्याभिषेक करण्यापर्यंतच संपूर्ण रामायण मांडण्यात आले आहे आणि ही एक अलौकिक आणि अद्वितीय अशी अभिव्यक्ती आहे, असे माझे मत आहे.
 
दुसरे असे की, हेच स्तोत्र शंकराने रचला आहे याचा अजून एक पुरावा प्रत्यक्ष एका श्लोकात उपलब्ध आहे जिथे भगवान शंकर स्वतः ग्वाही देतात की इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥२४॥
इथे प्रत्यक्ष भगवान शंकर असे सांगतात की, या रामनामाचा राम रक्षा स्तोत्राचा पाठ, माझे जे भक्त नित्य करतील, त्यांना अश्वमेध यज्ञा पेक्षाही अधिक पुण्याचा लाभ होईल. यामध्ये शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांचा मिलाप सापडतो किंवा प्रत्यक्ष भगवान शंकरांनीच, मी आणि प्रभू श्री राम अर्थात विष्णू रूप हे भिन्न नाहीत किंवा त्यांची भक्ती ही माझी भक्ती करण्याइतकीच श्रेष्ठ भक्ती आहे, असे स्वतःहून सांगितले आहे. म्हणून माझे आग्रहाचे सांगणे आहे की, अनुष्ठान जरी शक्य नसेल तरी प्रतिदिन, ठरावीक वेळी एकदा रामरक्षेचा पाठ करून, उत्तम आरोग्य व मनःशांतीचा अनुभव घ्यावा.
श्रीराम जयराम जय जयराम!!

प्रसन्न आठवले
९०४९३५३८०९