श्रीलंकेतील रामदर्शन

    16-Apr-2024
Total Views | 72

shrilanka
 
संपूर्ण भारत प्रभू रामचंद्रांच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेला आहेच. पण प्रभू रामचंद्रांवर प्रेम श्रीलंकेतही तितकेच केले जाते. स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला अशा त्या विश्वव्यापक परमात्म्याला सिमांचे बंधन नाही. तरीही समुद्रापल्याड असणार्‍या श्रीलंकेत जपलेल्या रामायणाच्या खूणा कौतुकास पात्र आहेत. पाहुया या लेखात...
 
श्रीलंकेतील काही रामायण निगडित प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. जी बघण्यासाठी आजही तिथे गर्दी दिसून येते. त्यातील काही निवडक स्थळांचा उल्लेख नेहमी वाचण्यात येत असतो. श्रीलंकेतील पुट्टलम तालुक्यात चिलाव शहर शांत समुद्रकिनारे लाभलेले, सांस्कृतिक वारसा सांगणारे धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथील मुनेश्वर आणि मनवारी अशी दोन प्राचीन शिव मंदिरे, प्रसिद्ध देवस्थान आहेत. रावणाचा वध केल्यावर प्रभू श्रीरामाने प्रथम या शिवलिंगाचे दर्शन घेतले, अशी कथा प्रचलित आहे. नवरात्री आणि शिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. तसेच इथल्या मुनेश्वर देवस्थानातील पारंपरिक चार आठवडे चालणारा उत्सवदेखील खूप प्रसिद्ध आहे. रावण हा शिवभक्त होता. त्याला मारल्यावर ब्रह्महत्येचे पातक नष्ट करण्यासाठी शिव शंकराने पाच शिवलिंग स्थापित करण्याचा आदेश श्रीरामाला दिला. त्यातील पहिले शिवलिंग शिवशंकराच्या आदेशानुरूप श्रीलंकेतील मुनेश्वर मंदिर परिसरात श्रीरामाने स्थापन केले. आजही लोक देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने इथे गर्दी करतात. त्रिंकोमालीमधील कोनेश्वर मंदिर उंच पहाडावर आहे. रावणाची भक्ती पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांच्या आदेशानुसार कश्यप ऋषींनी शिवआज्ञा प्रमाण मानून त्रिंकोमाली येथे सुंदर मंदिर बांधले.
 
जिथे रावण आपल्या आई समवेत रोज शंकराची आराधना करत असे. येथेच श्रीरामाने दुसरे शिवलिंग स्थापित केले. त्रिंकोमाली हे श्रीलंकेतील एक बंदर तसेच पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे व कँडी शहरापासून 110 किमी अंतरावर आहे. त्रिंकोमालीच्या काही ठळक वैशिष्ट्यांमध्ये पांढर्‍या-वाळूचे किनारे व व्हेल मासे पाहण्याचे निसर्गरम्य ठिकाण असा उल्लेख असतो. कोनेश्वरम मंदिराची तमिळ हिंदू वैशिष्ट्यीकृत असलेली संस्कृती व जीवनपद्धती पाहण्याची संधी इथे मिळू शकते. सीतामाईची सुटका करण्यासाठी नेण्यात आलेल्या वानरसेनेसाठी बांधलेला रामसेतू श्रीलंकेतील मन्नर जागी होता. जी जागा भारतापासून भौगोलिकदृष्ट्या सर्वांत जवळ आहे. भारतातील रामेश्वर ते श्रीलंकेतील मन्नर बेट सगळ्यात जवळचे अंतर दर्शवते. रामसेतूचे जे वर्णन आहे त्याच्या मागोवा आपण इथे घेऊ शकतो. श्रीलंकेत महत्त्वाची अशी पाच शिवलिंगे आहेत. ज्याचा फार जवळचा संबंध रामायणाशी जोडला जातो. प्रभू रामचंद्राने एकूण पाच शिवलिंगाची स्थापना त्या देशात केली. त्यातील तिसरे शिवलिंग मन्नार येथे आहे. एला हे श्रीलंकेतील गाव तेथील चहाचे मळे, शांत पहाडी निसर्ग आणि रामायणातील एक माहीत असलेले ठिकाण म्हणजे येथील रावण गुंफा आणि अतिउंच रावण धबधबा जो लोकांना आकर्षित करत असतो. येथील रावण गुहा आतून दुसर्‍या गुहांशी जोडली आहे. ज्यामुळे आतल्या आत संपूर्ण शहराचा फेरफटका होऊ शकतो.
 
कोलंबोमधील पंचमुखी हनुमानाचे अंजनेय मंदिर असेच एक प्रेक्षणीय मंदिर आहे. रामबोडा हे श्रीलंकेतील छोटे गाव आहे, जेथून हनुमानाने सीतेचा शोध चालू केला. रामाने सर्व वानर सेनेस एकत्र करून येथून पुढे प्रयाण केले. तिथे 18 फूट उंचीची हनुमान मूर्ती ‘चिन्मय मिशन’ संस्थेच्या साहाय्याने नंतर स्थापन केली गेली. सीता एल्ल्या आणि अशोक वाटिका हे एकच आहे. अशोक वाटिकेच्या रमणीय परिसरात सीता अम्मा मंदिर आहे. सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते. ज्या रथामार्गे सीतामाईला नेण्यात आले, त्याच मार्गावर एक छोटा तलाव आहे. जो सीतादेवीच्या अश्रूंनी तयार झाला, अशी कथा ऐकण्यात येते. डोंगर माथ्यावर असणार्‍या या तलावाभोवतीचा परिसर नेत्रसुखद आहे. गायत्री पीठ आश्रम परिसरात लंकाधीश मंदिर आहे, असे मानतात की याच ठिकाणी रावण पुत्र मेघनादने शिव-तप करून ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीला प्रसन्न केले होते. कोठमाळे या जागी सीतामाई तिला अन्न ग्रहणासाठी ठेवलेल्या भाताचे गोळे अतिशय योजनापूर्वक सोडत गेली ज्यायोगे तिचा मागोवा काढणे श्रीरामाला सुकर झाले, अशी कथा प्रचलित आहे. दिवुरामपोला हे श्रीलंकेतील प्रसिद्ध क्षेत्र आहे.
 
या ठिकाणी सीतामय्याचे सुंदर मंदिर आहे. सुरेख सीतामाईची तेजस्वी मूर्ती इथे पाहायला मिळते. याच जागी सीतेने अग्नी परीक्षा दिली. डोलुकांडा संजीवनी पर्वत हा श्रीलंकेत रामायणासंदर्भात प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध पाच संजीवनी थेंब जे श्रीलंकेत पडले त्यातील ही एक जागा आहे जिथे हनुमानाने संजीवनी गुटी मिळवण्यासाठी हिमालयातील द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना त्या पर्वताचा तुकडा इथे पडला तोच डोळुकांड संजीवनी पर्वत. इथे छानसा ट्रेक होऊ शकतो. जाफनामधील निलावरी गावात रामचंद्राने आपल्या सेनेची पाण्याची गरज भागवगण्यासाठी भूगर्भात बाण मारून जलस्रोत निर्माण केला होता. आजही ज्याचा तळ माहीत नाही, असे जलकुंड या गावात बघायला मिळते. श्रीलंकेत रामायणातील घडलेल्या गोष्टींचा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी रामायण निगडित पर्यटनस्थळांना भेट देणे एक वेगळाच आनंद देऊन जातो.

-सोनाली चितळे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121