आसेतु हिमाचल पसरलेल्या या खंडप्राय भारतभूमीला जर खर्या अर्थाने कशाने जोडले असेल, तर ते म्हणजे सनातन संस़्कृतीने! या संस़्कृतीची ओेळख म्हणजेच प्रभू श्रीराम होय. प्रत्येक भारतीयाला आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाण्याची मनोमन इच्छा असतेच आणि आतापर्यंत फक्त भक्तांच्या हृद्यसिंहासनावर विराजमान असणारे रामराय त्यांच्या राजसिंहासनावर स्वत: विराजमान झाले आहेत म्हटल्यावर, त्यांच्या दर्शनासाठी अयोध्येत तर रामभक्तांचा मेळा जमतो आहे. या ऐतिहासिक घडामोडीनंतर अयोध्येचे जणू रुपडेच पालटून गेले आहे. ती नटली आहे, सजली आहे...रामतत्वाच्या भक्तीत न्हाऊन निघाली आहे. ५०० वर्षांने तिचा विरह संपला असल्याने, तिचे सौंदर्य नववधूसारखे खुलले आहे. तिचे असणारे पौराणिक आणि सांप्रत कालिन बदललेल्या स्वरुपाचा आढावा या लेखात घेतला आहे.
अयोध्येचे पौराणिक महत्त्व
अयोध्या, मथुरा, माया(हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका(उज्जैन) आणि द्वारावती (द्वारका) ही सात नगरे अत्यंत पवित्र मानली जातात. या सगळ्यांमध्ये अयोध्या नगरी अग्रस्थानी आहे. ईश्वाकू कुळात धुंधुमार, मांधाता, हरिश्चंद्र, सागर, भगीरथ, दिलीप, रघु, अज, दशरथ आणि राम असे प्रसिद्ध राजे होऊन गेले. यातील दशरथ आणि रामाच्या काळात कोसल राज्य अत्यंत नावारूपाला आले. वाल्मिकी रामायणातील बालकांडात वर्णन केल्याप्रमाणे कोसल हे अत्यंत समृद्ध आणि सुखी महाजनपद होते. शरयू नदीच्या किनार्यावर बहरलेल्या या राज्याची अयोध्या ही राजधानी होती. १२ योजने (आठ ते नऊ मैल) लांब आणि तीन योजने रुंद असा तिचा विस्तार होता. अत्यंत सुंदर आणि प्रशस्त राजमार्ग, जागोजागी फुलवलेले फुलांचे ताटवे या नगराची शोभा वाढवत होते. राज्याला भव्य प्रवेशद्वारे, वेशी होत्या. इमारतींची वास्तूरचनाही सुबक होती.
राजमहालांवर मौल्यवान रत्ने जडवलेली होती. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी आणि नागरिक या नगरीला भेट देत असत. अयोध्या हे सर्वार्थाने समृद्ध नगर होते. अयोध्येत केवळ भौतिक समृद्धी नव्हती, तर या नगरात अत्यंत धर्मशील, ज्ञानी आणि तेजपुंज व्यक्ती वास्तव्य करत होत्या. सर्वजण धर्माचे, नीतीचे पालन करणारे होते. भक्कम दरवाजे आणि तटबंदी यामुळे ही नगरी नावाप्रमाणेच खरोखरच अजेय होती. ब्रह्मदेवाने आपल्या मनाच्या सामर्थ्याने कैलास पर्वतावर एक सरोवर निर्माण केले, असा पुराणात उल्लेख आहे. त्यालाच ‘मानस’ या नावाने ओळखले जाते. शरयू नदीचा उगम याच सरोवरातून झाला आणि पुढे ती अयोध्येवरून वाहत जाते. अयोध्येला मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. जैन मान्यतेनुसार आदिनाथांसह पाच तीर्थंकर यांचे जन्मस्थान अयोध्या आहे. एकूणच काय तर अयोध्येची ओळख ही मोक्ष नगरी, पुण्यनगरी म्हणून नोंद झालेली आहे.
श्रीरामांच्या पश्चात त्यांचे पुत्र कुश यांनी या नगरीची पुनर्रचना केली. नंतरच्या काळात सम्राट विक्रमादित्याने श्रीराम जन्मभूमी स्थानी ८४ खांबांवर उभे असलेले भव्य मंदिर निर्माण केले. पण, ११व्या शतकात आक्रमकांची टोळधाड या देशावर आली. भारतीयांना पूज्य असलेल्या गोमाता, मातृशक्ती आणि मठमंदिरे यांना आपल्या अत्याचाराचे भक्ष्य बनवले. अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. अशाच प्रकारचे आक्रमण १५२८ मध्ये श्रीराम जन्मभूमीवर झाले. मुगल सम्राट बाबराच्या आदेशाने हिंदूंना पवित्र असलेली श्रीरामजन्मभूमी उद्ध्वस्त झाली आणि त्या जागी बाबरी नावाने वादग्रस्त वास्तू उभी राहिली. जन्मभूमी मुक्तीसाठी हिंदू समाजाने सातत्याने संघर्ष केला. तीन लाखांहून अधिक राम भक्तांचे रक्त सांडले. सरते शेवटी या संघर्षाला यश मिळाले. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, सब भूमी श्री रामलला कीः..
श्रीराममंदिर प्रतिष्ठापनेनंतरचा सोहळा
श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त झाला. भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, असा क्षण दि. २२ जानेवारी रोजी साकार झाला. श्रीरामलला स्वगृही विराजमान झाले. संपूर्ण भारत वर्षात आनंदाला, उत्साहाला उधाण आले. नऊ लाखांहून अधिक मंदिरांमध्ये श्री रामनाम जपाचे, भजनाचे, सत्संगांचे कार्यक्रम झाले. घराघरांवर रोषणाई झाली, भगव्या ध्वजांनी सर्व रस्ते फुलून गेले. दि. २२ जानेवारीच्या कार्यक्रमात सर्वसामान्य रामभक्तांना सामावून घ्यावे, यासाठी देशभरात २० कोटी कुटुंबांमध्ये संपर्क करून अयोध्येहून आलेल्या पूजित अक्षता त्यांना देऊन जवळच्या मंदिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विश्वाच्या इतिहासात केवळ १५ दिवसांच्या अवधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क केल्याची दुसरी घटना अवगत नाही.
दि. ९ नोव्हेंबर, २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची निर्मिती झाली. करोडो राम भक्तांच्या अपेक्षांची पूर्तता झाली. त्या काळातील कोरोनाच्या संकटामुळे राम भक्तांना आपला आनंद लगेचच व्यक्त करता आला नव्हता, पण तदनंतरच्या वर्षांमध्ये देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा झाला.अयोध्येची शास्त्रीय सीमा ही ८४ कोस अर्थात ३०० किलोमीटरची आहे. त्या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात २०० कलाकारांनी त्यावेळी आपली कला सादर केली. ठिकठिकाणी भव्य सेट्स उभारून रामलीला सादर करण्यात आल्या.
शरयू नदीच्या किनारी राम की पैडी या ठिकाणी रामायण परिषदेचे आयोजन केले होते. संपूर्ण उत्तर प्रदेशात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा भरविल्या गेल्या. त्यात प्रामुख्याने सायकल, मॅरेथॉन, खो खो, नौकायन, व्हॉलीबॉल आणि कुस्ती स्पर्धांचा समावेश होता. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात अगदी तालुका, ग्राम पातळीपर्यंत श्रीराम कथा, कवी संमेलन, भजन संध्या आदींचे कार्यक्रम संपन्न झाले. श्रीराम मंदिरासमोरील स्वर्गीय लता मंगेशकर चौक ते शरयू घाट अशा २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली. अयोध्येप्रमाणेच संपूर्ण हिंदुस्थान ही रामभक्तीत न्हाऊन निघाला होता. गावागावातून, शहरा शहरांमधून शोभायात्रा, पालखी यात्रा काढण्यात आल्या होत्या.
अयोध्येचे बदललेले स्वरूप
शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हातून घडविलेल्या बाल श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दि. २२ जानेवारीला संपन्न झाली. विविध क्षेत्रातील आठ हजार मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्याचे कोट्यावधी रामभक्त साक्षीदार बनले. तदनंतर आलेल्या रंगपंचमीला पुष्पवृष्टी करून गुलाल उधळला गेला. बाल श्रीराम जणू रंगपंचमी खेळत आहेत, असे दृश्य उभे राहिले. नवनिर्मित न्यासाच्यावतीने वर्षभर संपन्न करावयाच्या कार्यक्रमांची घोषणा झाली. वसंत पंचमी, राम नवमी सीता नवमी, नरसिंह जयंती, श्रावणमेळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, विजयादशमी, शरद पौर्णिमा, दीपावली, विवाह पंचमी, मकरसंक्रांत अशा ११ कार्यक्रमांची योजना प्रस्तुत झाली. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात रामकुंड(यज्ञ शाळा) धार्मिक कार्यक्रमांसाठी सभागृह, हनुमान गढी येथे वीर मारुतीची भव्य मूर्ती, जन्मभूमी संग्रहालय, वेद, पुराण, रामायण, संस्कृत आदींसाठी संशोधन केंद्र, सत्संग भवन, ध्यान केंद्र, माता सीता रसोई अन्न क्षेत्र, महर्षी वाल्मिकी संशोधन केंद्र, गोशाळा, भाविकांसाठी अनेक सुविधा, बलिदान मेमोरियल आदी साकारणार आहे. आगामी एप्रिल २०२५ पर्यंत परकोटा(संरक्षक भिंत) आणि परिक्रमा जागेचे सुशोभीकरण पूर्ण करण्याचे अवघड शिवधनुष्य न्यासाने उचलले आहे.
मंदिराचे प्रकल्प व्यवस्थापन टाटा समूहाच्या आणि प्रत्यक्ष उभारणी-अंमलबजावणीचे ‘काम लार्सन अँड टुब्रो’ कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एकेकाळी अत्यंत संकीर्ण असलेल्या सर्व रस्त्यांचे रूपडे बदलले आहे. अयोध्या विकासाचे नवे मॉडेल देशापुढेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्याचा प्रयत्न न्यासाच्यावतीने करण्यात येत आहे. अयोध्येपासून किमान ८० किलोमीटर परिसरातील विकास कामांनी वेग घेतला आहे. नजीकच्या काळात अयोध्येपासून १४ किलोमीटर दूर वैदिक सिटी साकारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यांनी तेथे भवन उभारण्यासाठीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दिले आहेत, तर १५० लहान मोठ्या हॉटेल्सच्या उभारणीच्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू आहे. अयोध्येत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी ‘आयटीआय’ केंद्र सुरू झाले आहे. एरवी उत्तर प्रदेशातून बाहेर जाणारे अकुशल मनुष्यबळ आता अयोध्येकडे येत आहे. व्यापार उद्योगाच्या वाढीमुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला गती मिळत असल्याची चिन्हे दिसत आहेत.
मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना झाल्यावर सध्या दररोज दोन लाख भाविक येत आहेत. त्या दृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी होत आहे. सर्वसामान्य राम भक्तांसाठी ४० ठिकाणी अन्नछत्रे उभारण्यात आली आहेत. अयोध्या धाम रेल्वे जंक्शन आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ अयोध्या नगरीला साजेसे झाले आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी झाली आहे. तसेच लखनौ, गोरखपूर, वाराणसी आदी भागातून अयोध्येच्या दिशेने येणार्या महामार्गाचे रुंदीकरणही वेगाने होत आहे. एकूणच मंदिर निर्माणानंतर अयोध्येच्या पंचक्रोशीत विकास कामांचा धडाका सुरू आहे. केवळ अयोध्येतच नव्हे, तर संपूर्ण भारत वर्षात, धार्मिक पर्यटनाच्या आधारावर आर्थिक विकास संकल्पनेला गती मिळेल, असे दिसत आहे.
यंदाची राम नवमी
देशभर रामोत्सवाला अतिशय उत्साहात सुरुवात झाली आहे. देशातील मंदिरांमध्ये, छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये आणि गाव पातळीवर रामोत्सवानिमित्त श्रीराम नामाचा सामुदायिक जागर करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. त्याला रामभक्तांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पालखी यात्रा, शोभायात्रा, भजन कीर्तनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाची रामनवमी कुणा एका संस्थेची, पक्षाची, संघटनेची असणार नाही, ती सकल हिंदू समाजाची असेल. मंदिराच्या उभारणीबरोबरच प्रत्येक हिंदूंच्या मनातील रामत्व जागृत झाले आहे. त्या रामत्वाचा प्रकट अविष्कार यावेळच्या रामनवमीला दिसणार आहे.
दि. २२ जानेवारीनंतर अयोध्येत दररोज दोन लाख भाविक येत आहेत. प्रशासन अतिशय कुशलतेने गर्दीचे नियोजन करीत आहे. पण, प्राणप्रतिष्ठेनंतरच्या पहिल्या रामनवमीला ३० लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने न्यासाचे सचिव श्री चंपत राय यांनी सर्व रामभक्तांनी आपापल्या जवळच्या राम मंदिरात राम नवमीला जावे आणि टप्प्याटप्प्याने, स्वतःच्या सोयीने अयोध्येत दर्शनाला यावे, असे नम्र आवाहन केले आहे. यावेळी चैत्र नवरात्रीचे सर्व कार्यक्रम विकेंद्रित स्वरूपात करण्याचे न्यासाने ठरविले आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात, शहरात श्रीराम नवमी साजरी करण्याचे आवाहन न्यासाने केले आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी दुपारी ठीक १२ वाजता श्रीरामललांच्या कपाळावर सूर्यकिरणांचा तिलक करण्याची योजना न्यासाच्यावतीने करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारा सूर्यतिलक सलग चार मिनिटे रामललांचे मुखमंडल प्रकाशमान करणार आहे. हे अवर्णनीय दृश्य सर्व रामभक्तांना अनुभवता यावे, यासाठी न्यासाच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
आवाहन
प्रभू श्रीरामचंद्र प्रत्येक भारतीयांच्या नुसते मनात नव्हे, तर श्वासात बसलेले आहेत. उठता बसता सतत कुणाचे स्मरण होत असेल, तर ते श्रीरामचंद्रांचे. एकमेकांना भेटलेली माणसे सुद्धाराम राम म्हणून एकमेकांना नमस्कार करतात. अगदी हिंदी भाषिक मंडळीसुद्धा जय रामजी की असं म्हणूनच संभाषणाची सुरुवात करताना दिसतात. श्रीरामाप्रती असलेला आदर, प्रेम, कृतज्ञतेची भावना ही खरोखर आपल्या रक्तातच भिनलेली आहे. भारताबाहेरील देशांमध्येही ही भावना विविध रूपात प्रकट होते. कुठल्याही गोष्टीचा गाभा, त्याचे तेज, स्वत्व याला रामाची उपमा दिलेली असते. अमुक एखाद्या गोष्टीत आता काही राम उरला नाही, अशी वाक्ये आपण अनेकदा ऐकत आलेलो आहोत. श्रीराम संपूर्ण हिंदू समाजाचे आराध्य दैवत आहेत, म्हणूनच सावरकरांनी म्हटले आहे. ज्या दिवशी हिंदू समाज श्रीरामांना विसरेल, त्या दिवशी हिंदुस्थानला राम म्हणावे लागेल. पारतंत्र्याच्या काळात श्रीरामांचे चिंतन मनन जीवंत ठेवले म्हणूनच आपण टिकून राहिलो. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रत्येक भक्ताच्या मनातील रामत्व जागृत झाले आहे. सनातन संस्कृतीच्या विनाशासाठी दिवस-रात्र प्रयत्न करणार्या शक्तींना पराभूत करण्यासाठी, जागृत रामत्वाचा सूर्य तिलक आपल्याला करावा लागणार आहे.
अयोध्येच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर होणार्या पहिल्या रामनवमी कार्यक्रमाबाबत विचार करताना केवळ आपल्या हक्काचा विचार करून चालणार नाही, हक्काबरोबर कर्तव्य येत असतात. यंदाच्या रामनवमीला आपण कर्तव्याचरण करूया. दुसर्या भाषेत रामाचे अनुसरण केले तरच रामराज्य येईल. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बुद्धिभेद आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. अशावेळीराम प्रभू की सभ्यता का, भद्रता का ध्यान करिये या न्यायाने तमाम भारतीयांना मतदानाच्या रूपात रामत्वाचा अविष्कार करावा लागेल.
जय श्रीराम....
मोहन सालेकर
(लेखक विहिंप, कोकण प्रांताचे प्रांत मंत्री आहेत.)