गांधीनगर : गुजरातमधील एक अब्जाधीश उद्योजक आणि त्यांच्या पत्नीने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन जैन भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश भंडारी असे त्यांचे नाव असून त्यांच्याकडे जवळपास २०० कोटींची संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, भावेश भंडारी यांचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला असून व्यवसायात आल्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रांत काम केले. त्यानंतर हळूहळू ते श्रीमंत बनत गेले आणि भारतातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले. परंतू, काही काळानंतर त्यांची पुढे जाण्याची ईच्छा संपली आणि कुठल्याही मोहापासून त्यांचे मन लांब जात गेले.
हे वाचलंत का? - सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींची कबूली, म्हणाले, "आमचा हेतू..."
त्यानंतर त्यांनी स्वतःला कामापासून दूर केले आणि नंतर जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ भावेश भंडारी आणि त्यांच्या पत्नीनेच घेतला नसून त्यांच्या दोन्ही मुलांनीदेखील दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जैन भिक्षू बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर भावेश भंडारी यांनी आपली २०० कोटी रुपयांची संपत्ती दान करुन टाकली. येत्या २२ एप्रिल रोजी ते जैन भिक्षूंची दीक्षा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.