सौंदर्यजतन, सौंदर्यवर्धन-आयुर्वेदासंगे... भाग २३

15 Apr 2024 21:06:54

DFGDF
 
मागील लेखात आपण व्यसनांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली होती. आजच्या लेखात त्याच विषयाची आणखीन खोलात जाऊन काही पैलू उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
व्यसनाधीनता ही केवळ तंबाखू, मद्यपान व ड्रग्जचीच असते, असे नाही. कुठलीही गोष्ट जी प्रमाणाबाहेर खाल्ली जाते, प्यायली जाते, वापरली जाते इ. ज्या गोष्टीवर अवलंबित्व येते आणि ज्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होतो, त्या सर्व वस्तू सवयींचे ’व्यसन’ या वर्गात केले जाते. अति चहापान, कॉफीचे सेवन, मिठाचा अतिरेकी वापर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा अतिरेक वापर (मोबाईल, टेबल टीव्ही, लॅपटॉप) इ. शरीरावर होणारा परिणाम मनावर-भावनांवर प्रतिबिंबित होत असतो. तसेच, मानसिक अनारोग्याचे पडसाद शारीरिक स्वास्थ्यावरही उमटतात. चेहर्‍यावर या सर्व गोष्टी लगेच भासू लागतात, दिसतात. उदा: अति तंबाखू सेवन (बिडी, सिगारेट, सिगार, पान मसाला, मावा, हुक्का इ.) केल्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. केस रूक्ष, राठ आणि तुटक होतात. त्वचादेखील रूक्ष होते, काळवंडते. त्वचेवर काळे डाग येऊ शकतात. नखे पिवळी पडतात. रुक्ष त्वचेमुळे विविध त्वकृ विकार होतात. केसांची रया जाते (SHINE & GLOW) आणि केसांचा रंगही बदलतो. केस लवकर पिकू शकतात.
 
अतिरेकी मद्यपानामुळे शरीरात उष्णता वाढते. शरीराचा नैसर्गिक ताल बदलतो. झोपेच्या, भूकेच्या, शौचाच्या वेळा बदलतात, स्वरुपात बदल होतो. एकाग्रता आणि ताजेतवाने वाटणे हेदेखील कमी होते. उत्साह कमी होऊन, चिडचिड, अस्वस्थता वाढते. त्वचेवर पुरळ येणे, त्वचा तापणे, त्वचेचा ग्लो जाणे, त्वचेचा पोत बदलणे, अतिरिक्त घाम येणे आणि घामाची दुर्गंधी येणे. अशाप्रकारे केसांवर ही अतिरेकी मद्यपानाचा परिणाम होतो. केस गळणे (HAIR THINNING, SPARSENESS, HAIR LOSS, BALDNES) इ. लक्षणे उत्पन्न होतात.
 
चहा-कॉफी-चॉकलेट, अतिरेक मिठाचा वापर इत्यादीचाही परिणाम त्वचेवर आणि केसांवर होतो. ज्यांना मुरुमांचा वारंवार त्रास होत असतो, त्यांना चॉकलेट खाणे कमी करण्यास पथ्यकर ठरते. हल्ली व्यसनांचे प्रमाण तर वाढले आहेच, पण त्यापेक्षा जास्त धोक्याची आहे ती लहान वयातील व्यसनाधीनता. वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत शरीराची सूक्ष्म स्तरावर जडणघडण होतच असते. बरेचदा शालेय जीवनातच विविध कारणांमुळे व्यसने जडतात. त्याचा अनिष्ट परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. ज्यांना आरोग्याची कास सदैव धरायची आहे, त्यांनी व्यसनांपासून दोन हात दूर राहणेच इष्ट.
 
व्यायामाचा दिनचर्येत जर समावेश केला, तर याने केवळ शरीरसौष्ठव प्राप्त होते असे नाही, तर मनाला तजेला आणि उत्साहही जाणवतो. हा आनंद, ही प्रसन्नता चेहर्‍यावरून झळकते. व्यायामाने रक्तपुरवठा सुधारतो, स्वेद प्रवृती चांगली होते, म्हणजे रामरंध्रे उघडतात व शरीरातील स्वंदरुपी मल बाहेर टाकला जातो. शरीरात हलकेपणा आणि मांसपेशी सुदृढ होतात. शरीराची क्षमता वाढविण्यासही व्यायामाचा फायदा होतो. डोक्यावरील केस आणि चेहर्‍याची तुकतुकी वाढविण्यासाठी 'topsy turvy posture'’चा फायदा चांगला होतो. याने डोक्याला रक्तपुरवठा चांगला होतो. व्यायाम म्हटले की, फक्त जीम किंवा योगसाधना एवढेच अपेक्षित नाही. शरीराच्या विविध अंग अवयवांना stretching and relaxation exercises, ज्या ज्या कृतीतून मिळते, त्या सर्वच्या सर्व व्यायाम पद्धती होतं. फक्त ते नियमित स्वरुपात नित्यनियमाने होणे, शरीराच्या क्षमतेच्या निम्म्याने व्यायाम करावा, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. त्याचबरोबर उन्हाळ्यात किंवा निद्रा अपुरी असताना व्यायाम टाळावा. संपूर्ण शरीराची तालबद्ध हालचाल ही सायकलिंग, स्विमिंग, जॉगिंग, झुंबा विविध नृत्य प्रकार इ.तून असते. तेव्हा या सगळ्या शारीरिक हालचालींना ‘व्यायाम’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
बरेचदा व्यायाम कोणता, यापेक्षा कधी आणि किती, यात चूक होत असल्यामुळे विविध शारीरिक कष्ट, व्याधी ओढावले जातात, याची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. 'topsy turvy postures' बरोबरच शीतली, सित्कारी इ. प्राणायम प्रकाराने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत होते. कुठलाही व्यायाम प्रकार पहिल्यांदा सुरू करताना, त्यातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली तो सुरू करावा. व्हिडिओ बघून इन्स्टाग्रामवर कुणाला तरी फॉलो करू नये. याचे मुख्य कारण म्हणजे, प्रत्येक व्यक्तीची भिन्न-भिन्न प्रकृती आणि शारीरिक क्षमता. ‘अ‍ॅण्टी-एजिंग थेरपी’मध्ये सक्रिय छंदांची मोठी भूमिका आहे. छंद हे मुख्यत्वे करून दोन प्रकारांत मोडतात. ‘सक्रिय’ आणि ‘निष्क्रिय.’ एक उदाहरण देऊन सांगते. गाणं ऐकणे हा निष्क्रिय छंद झाला आणि गाणं म्हणणे हा सक्रिय छंद झाला. कुठलाही छंद जेव्हा सक्रिय सहभागाने केला जातो, त्याने मनाला तजेला, अधिक समाधान मिळते. ‘अ‍ॅण्टी-एजिंग थेरपी’मध्ये कवल आणि गण्डूष या दोन आयुर्वेदातीलउपक्रमांना खूप महत्त्व आहे. सध्या ‘ऑईल पूलिंग’ या नावाने अधिक प्रचलित आहे. कवल धारण म्हणजे तोंडामध्ये द्रव धारण करणे, धरणे, पकडून ठेवणे (विशिष्ट कालावधीसाठी) आणि गण्डूष म्हणजे गुळण्या करणे. या दोन्हीने मुखाचे आरोग्य तर सुधारतेच, तसेच मुखदुर्गंधीही कमी होते आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. मुख विवर (oral cavity) मधील रक्त प्रवाह सुधारला जातो आणि गाल, जे वयापरत्वे ओथंबू लागतात, त्यात मजबुती येण्यास मदत होते. यासाठी कोणते द्रव (कोमट पाणी, औषधी तेल वा अन्यर काही) घ्यावे, हे तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनानेच घ्यावे.
 
केसांची निगा याअंतर्गत नियमित केसांना व मुळांना थोडे तेल लावणे, हलका मालिश करणे, खूप मोकळे न ठेवणे तसेच वारंवार शॅम्पू इ. बदलत राहू नये. केस धुवायला गरम पाणी टाळावे. तसेच आठवड्यातून एक वेळ केसांना तेल लावण्यापेक्षा थोडं तेल रोज लावणे, हे महत्त्वाचे. कुठले तेल, कसे लावावे, किती घ्यावे, हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, त्रासानुसार आणि ऋतूमानानुसार ठरवावे. सर्व साधारणपणे खोबरेल तेल लावावे.
 
ज्यांचे केस खूप रुक्ष किंवा खूप तेलकट आहेत, त्यांनी शिरोपिचूचाही अवलंब करावा. (रुक्ष केस असल्यास शिरोीभ्यंग व शिरोपिचू दोन्ही करावे आणि खूप तेलकट, चिकट असल्यास केवळ शिरोपिचू केला तरी पुरतो.) काही विशिष्ट कोंड्यांच्या प्रकारात अतितेल केसांच्या मुळांना असल्यास ता कोंडा लवकर बरा होत नाही. म्हणूनच मग स्वत:च्या मनाप्रमाणे वैद्यकीय उपचार घेणे टाळावे. (मग ती मुरुमे असोत वा कोंडा) टाळावे. बाहेरून छोटे कारण व लक्षण जरी दिसत असले, तरी त्याचे पक्के कारण जर समजले नाही, तर छोटी व्याधीही बळावू शकतो.
 
केसांच्या व त्वचेच्या विविध तक्रारींवर आयुर्वेदोपचाराने केवळ उत्तम गुण येतो, असे नाही, तर त्याचबरोबर त्याचा recapse (सतत उत्पन्न होण्याची प्रक्रिया) ही आटोक्यात येण्यास मदत होते. पुढील लेखांपासून नवीन विषयाबद्दल जाणून घेऊया..
(क्रमश:)
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९
vaidyakirti.deo@gmail.com
Powered By Sangraha 9.0