जनसेवेतील ‘राम’

15 Apr 2024 21:45:27

ram
 
भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रदीर्घ काळ महाराष्ट्रात, नंतर संसदेत लोकप्रतिनिधित्व करणारे पद्मभूषण राम नाईक आज वयाची ९० वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त आज, मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता एफ. एम. बॅक्वेट हॉल, गोरेगाव (प), मुंबई येथे बालयोगी सदानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली राम नाईक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या औचित्यावर आपल्या लोकसमर्पित जीवनात जनसेवेतून ‘राम’ शोधणार्‍या राम नाईक यांच्या कार्यमग्न आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
एज इज जस्ट अ नंबर’ ही इंग्रजी म्हण तंतोतंत लागू व्हावी, असे एक ऊर्जावान व्यक्तिमत्त्व म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक. या वयातही त्यांचा कामाचा झपाटा, अफाट जनसंपर्क, व्यवस्थापन कौशल्य हे कुणा तरुणालाही लाजवेल असेच. चार-पाच दिवसांपूर्वी आपण नेमके काय करीत होतो, याचेही अनेकदा आपल्याला विस्मरण होते. परंतु, रामभाऊंना त्यांच्या आयुष्यातील अगदी पहिल्या निवडणुकीतील मतांच्या आकड्यांपासून ते अलीकडे उत्तर प्रदेशमधील राज्यपाल पदाच्या कारकिर्दीपर्यंत, सारे बारीकसारीक तपशील अगदी मुखोद्गत. या विलक्षण स्मृतिवरदानाचे आणि एकूणच तंदुरुस्त स्वास्थ्याचे रहस्य हे रामभाऊंच्या बालपणीच्या दिनचर्येत आणि संस्कारांच्या शिदोरीतच दडलेले दिसते.
 
रामभाऊंचे वडील सांगलीच्या औंध संस्थानातील आटपाडी येथे एका शाळेत मुख्याध्यापक होते. आता वडील मुख्याध्यापक म्हटल्यावर शिस्त ही ओघाने आलीच. शिवाय मैदानावर सामूहिक सूर्यनमस्कारही ठरलेलेच. पुढे महाविद्यालयीन जीवनातही खो खो, बास्केट बॉलसारख्या खेळांमुळे शारीरिक लवचिकता लाभली. अशा या शिस्त आणि आरोग्यदायी सवयींनी रामभाऊंच्या आयुष्याला कायमस्वरुपी वळण लागले. पण, केवळ शारीरिक नव्हे, तर लहानपणापासून झालेले रामभाऊंचे वैचारिक भरणपोषणही त्यांच्या जीवनात जनसेवेचे बीजांकुरण करणारे ठरले. वडिलांचे राष्ट्रनिष्ठ विचार, वाचनाची गोडी, शाखा, शिबिरे, कार्यक्रमांनी संघविचारांचा पाया अधिक भक्कम केला. सोबतच नाना पालकर, रामभाऊ म्हाळगी, मुकुंदराव कुलकर्णी, सदाशिव कोल्हटकर यांसारख्या संघातील दीपस्तंभांचे सान्निध्यही रामभाऊंना प्रकाशमान करून गेले. पुढे त्यांनी ‘बी.कॉम’ची पदवी पुणे येथील बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून १९५४ साली संपादित केली, तर नंतर १९५८ साली मुंबईतील किशनचंद चेलाराम विधी महाविद्यालयातून ‘एल.एल.बी’ची पदवी घेतली.
 
पुढे मुंबईतील ‘अकाऊंटंट जनरल’च्या कार्यालयातील लिपीक पदावर काही काळ त्यांनी नोकरीही केली. त्यानंतर एका खासगी क्षेत्रातील ख्यातनाम कंपनीत ‘कंपनी सेक्रेटरी’ म्हणूनही रामभाऊंनी काम पाहिले. संघविचारांशी त्यांची नाळ तर अगदी लहानपणापासूनच जोडली गेली होती. म्हणूनच मग भारतीय जनसंघाचा स्थानिक कार्यकर्ता म्हणून मुंबईतील गोरेगावमध्ये कामाला त्यांनी प्रारंभ केला. पुढे १९६९ साली मुंबई जनसंघाचे पूर्णवेळ संघटन सचिव म्हणून दायित्व स्वीकारण्यासाठी नोकरीचाही त्यांनी राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर पक्षाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा आमदार (१९७८ ते १९८९) आणि नंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा खासदार (१९८९ ते २००४) म्हणून प्रदीर्घकाळ रामभाऊंनी लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवेचे व्रत अंगीकारले. केवळ मतदानापुरता जनतेशी संपर्क न ठेवता, आपल्या मतदारसंघातील अगदी बारीकसारीक प्रश्नांचीही सोडवणूक करण्यात रामभाऊ सर्वस्वी यशस्वी ठरले. पं. दीनदयाळजींच्या ‘अंत्योदया’च्या विचारांनीच जनसेवेची प्रेरणा मिळाल्याचेरामभाऊ आवर्जून नमूद करतात.
 
७०च्या दशकापासून लोकप्रतिनिधी ते अलीकडे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ प्रवासात रामभाऊंनी सर्व पदांना अगदी पुरेपूर न्याय दिला. एवढेच नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या भावनेतून दरवर्षी ते कार्यअहवालही प्रसिद्ध करीत असत. खरं तर रामभाऊंच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी यशस्वीपणे राबविलेल्या कित्येक जनसेवेच्या अभिनव प्रयोगांची, लोकाभिमुख कामांची, संसदीय निर्णयांची यादीही तितकीच मोठी. पण, आज त्यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त मागे वळून पाहताना, या कृतिशील जनसेवकाच्या काही ठळक योगदानांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल.
आज मुंबईतील झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये आपल्याला दुमजली शौचालये सहज दृष्टिपथास पडतात. पण, या दुमजली शौचालयांच्या संकल्पनेचे जनक म्हणजे राम नाईक. प्रारंभी त्यांच्या या मागणीकडे काहीसे दुर्लक्ष झालेही, पण रामभाऊंनी या शौचालयांचे पटवून दिलेले महत्त्व आणि केलेल्या पाठपुराव्यानंतर ही दुमजली शौचालये वस्त्यावस्त्यांमध्ये उभी राहिली. मुंबईतीलच नव्हे, तर देशातील असा हा पहिलाच यशस्वी प्रयोग. यामुळे रस्त्यावर, रुळांलगत शौचाला जाणार्‍या महिलांची, पुरुषांची सोय झाली. तसेच शहरात स्वच्छताही राखण्यास हातभार लागला.
 
आमदारकीच्या निवडणुकीत मतदारसंघातून ७० टक्के मतदान घेऊन रामभाऊ विजयी झाले. पण, दोन मतदान केंद्रांमधून अवघी दोन आणि तीन मते मिळाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अन्य कुणी लोकप्रतिनिधी असता, तर याकडे कदाचित दुर्लक्षही केले असते. पण, रामभाऊंनी याबाबत माहिती घेतली असता, त्यापैकी एक मतदानकेंद्र कुष्ठरोग्यांचे आणि दुसरे मनोरी-गोराईतील असल्याचे निदर्शनास आले. मग काय, त्या मतदारांनी आपल्याला मतदान का केले नसेल, याचा चाणाक्ष रामभाऊंनी शोध घ्यायचे ठरविले. ते प्रत्यक्ष या मतदारांना भेटले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोग पीडितांच्या वस्तीत प्रत्यक्ष काम करायलाही सुरुवात केली. मुंबईसह महाराष्ट्रातही कुष्ठरोग पीडितांच्या वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी काम केले आणि ‘आंतरराष्ट्रीय कुष्ठनिवारण संस्था, पुणे’चेही कित्येक वर्षं त्यांनी अध्यक्षपद भूषविले. कुष्ठपीडितांच्या भोजन भत्त्यात वाढ करण्यापासून ते त्यांना पक्की घरे प्रदान करण्यापर्यंत रामभाऊंनी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत अगदी प्रयत्नांची शर्थ केली आणि त्यात त्यांना यशही आले. त्यांच्याच प्रयत्नांचे फलित म्हणून विविध महानगरपालिकांमध्ये कुष्ठपीडितांसाठीच्या भोजन भत्त्यातही घसघशीत वाढ झाली आणि उत्तर प्रदेश सरकारने २ हजार, ८६६ कुष्ठपीडित कुटुंबांना घरांचे वाटपही केले. असाच एक उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दुर्लक्षित भाग म्हणजे मनोरी-गोराई. इथे पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंत पायाभूत सोईसुविधांची वानवा.
 
या भागातही रामभाऊंच्या प्रयत्नांनी पाण्याची पाईपलाईन समुद्राखालून टाकली गेली. केंद्रात पेट्रोलियम मंत्री असताना, समुद्रातील ‘मुंबई हाय’मधील विहिरींमधून तेल शे-दीडशे किमी किमीच्या पाईपलाईन्सने समुद्रकिनार्‍यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे रामभाऊंनी पाहिले. मग जर तेलाचा समुद्राखालून पाईपलाईन टाकून पुरवठा शक्य असेल, तर मग दोन-तीन किमीची पाईपलाईन समुद्राखालून टाकून मनोरी-गोराईला पाणीपुरवठा करणेही सहज शक्य असल्याचे त्यांना ‘ओएनजीसी’च्या अध्यक्षांशी चर्चेअंती लक्षात आले. मग काय, रामभाऊंच्या प्रयत्नांनी हे पाईपलाईनचे काम झाले आणि मनोरी-गोराईवासीयांच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. यासंबंधी आयोजित एका कार्यक्रमात शेकापचे आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे नेते भाई बंदरकरही उपस्थित होते. “राम नाईकने गंगा आणली आहे. आता मी मरायला मोकळा झालो,” अशी अत्यंत उद्गार त्यांनी व्यक्त केल्याची आठवण आजही रामभाऊंच्या मनात ताजी आहे. अशाचप्रकारे अर्नाळ्यातही रामभाऊंच्या प्रयत्नांनी पूल बांधण्यात आला. त्यामुळे दळणवळणाची सोय उपलब्ध झाल्याने तेथील तरुणांच्या शिक्षणालाही चालना मिळाली. तसेच ग्रामस्थांची पाण्याची सोयही झाली. आजही तेथील नागरिक ज्या दिवशी त्यांना पाणी मिळाले, तो दिवस ‘प्रकाश दिवस’ म्हणून साजरा करतात आणि रामभाऊंनाही त्या कार्यक्रमासाठी अगदी आवर्जून आमंत्रित करतात.
 
त्याचबरोबर मुंबईकरांच्या उपनगरीय रेल्वेशी संबंधित कित्येक समस्याही रामभाऊंनी मागण्या, आंदोलनांतून मार्गी लावल्या. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ची स्थापना असेल, डहाणूपर्यंत प. रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेचा विस्तार असेल, गोरेगाव लोकल, महिला विशेष लोकल, बोरिवली-विरार रेल्वेमार्गाचे, कुर्ला-कल्याण सहापदरी रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाला वेग आला. मुंबईकरांसह देशभरातील गृहिणींना भेडसावणारा प्रश्न म्हणजे सिलिंडरचा. त्यावरही पाईप गॅसच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे तंत्र रामभाऊंनी अवलंबिले. अटलजींच्या काळात पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री असताना, देशातील एक कोटी, दहा लाख ग्राहक घरगुती गॅससाठी प्रतीक्षा यादीवर होते. या सर्वांसह एकूण ३ कोटी, ५० लाख नव्या गॅस जोडण्या देऊन रामभाऊंनी प्रतीक्षा यादी संपविली. तसेच ऊसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती, वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई-दिल्लीसारख्या शहरात ‘सीएनजी’ गॅस पुरवठा, परदेशात थेट इंधन विहिरींच्या खरेदीचा निर्णय यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्याचे धाडसही रामभाऊंनी दाखविले. परिणामी, वेळ, पैसा यांची बचत झाली आणि प्रदूषणावरही आळा बसला.
 
स्थानिक पातळीवर मतदारांच्या विविध समस्या मार्गी लावण्याबरोबरच खासदार, मंत्री म्हणून संसदेतील संविधानिक आयुधांचाही लोकहित आणि राष्ट्रहितासाठी त्यांनी पुरेपूर वापर केला. महाराष्ट्रातील आमदार निधीप्रमाणे संसदेतील खासदारांसाठी खासदार निधी सुरू करण्याबाबत राम नाईक आग्रही होते व अखेरीस त्यांच्या मागणीला यश आले आणि आज प्रत्येक खासदाराला मतदारसंघाच्या विकासासाठी पाच कोटी रुपये खासदार निधी दिला जातो. तसेच महिलांच्या स्तनपानाशी निगडित ‘प्रमोशन ऑफ ब्रेस्टफिडिंग अ‍ॅण्ड रिस्ट्रिक्शन ऑन अ‍ॅडर्व्हटिझमेंट’ हे खासगी सदस्य विधेयकही रामभाऊंनी मांडले आणि ते पारितही झाले. त्यामुळे स्तनपानासंबंधी जनजागृती आणि त्यासंबंधी अपप्रचार करणार्‍या जाहिरातींवर आळा बसला. पण, केवळ सत्ताधारी बाकांवर असतानाच नव्हे, तर विरोधी बाकांवरूनही रामभाऊंनी संसदीय आयुधांचा वापर राष्ट्रहितासाठी केला. पूर्वी ‘जन-गण-मन’ आणि ‘वंदे मातरम्’ संसदेत म्हटले जात नसे. याविषयी रामभाऊंच्या आग्रही मागणीनंतर संसदीय समिती स्थापन करण्यात आली आणि हा ऐतिहासिक निर्णय संसदेत घेण्यात आला. १९५० साली जरी आपण राज्यघटना स्वीकारली असली तरी राष्ट्रगीत संसदेत सुरु करण्याचा हा निर्णय घेण्यासाठी १९९२ साल उजाडावे लागले. म्हणूनच या निर्णयाला रामभाऊ ‘सोन्याचा दिवस’ म्हणून संबोधतात.
 
उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही राम नाईक यांची कारकिर्द सर्वस्वी संस्मरणीय ठरली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशला स्थापनेनंतर ६८ वर्षांनी ‘उत्तर प्रदेश दिवस’ मिळाला आणि आता दरवर्षी दि. २४ जानेवारी रोजी हा दिवस तिथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच लोकप्रतिनिधी नसतानाही रामभाऊंनी भारतीय जनता पक्षामध्ये शिस्तपालन समितीचे अध्यक्ष, आमदार-खासदार प्रशिक्षण वर्ग मार्गदर्शक, सुशासन समितीचे संयोजक अशी अनेकविध पदे भूषविली.
 
१९९४ साली रामभाऊंना वयाच्या ६०व्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले. पण, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कर्करोगावरही मात केली. असे हे रामभाऊ एखाद्या तरुण कार्यकर्त्याप्रमाणे तितक्याच उत्साहाने आणि निष्ठेने कार्यरत आहेत. आज त्यांना वाढदिवसानिमित्त मनस्वी अभीष्टचिंतन आणि असेच उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायू लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
Powered By Sangraha 9.0