रामनवमीनिमित्त दर्शन व्यवस्थेत मंदिर न्यासाकडून मोठे बदल
15 Apr 2024 16:11:11
मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येत यंदाची रामनवमी (Ram Navami Ayodhya) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ३.३० वाजल्यापासून भाविकांसाठी रांगेत उभे राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पहाटे ५:३० वाजता शृंगार आरती होईल, श्री रामललाचे दर्शन व सर्व पूजाविधी एकाच वेळी सुरू राहतील.
रामनवमीच्या कालावधीत १६ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत सर्व प्रकारचे विशेष पास/दर्शन-आरती इत्यादींचे बुकिंग आधीच रद्द करण्यात आले आहे. सर्वांना एकाच मार्गावरून दर्शनाकरीता जावे लागेल. सुग्रीव किल्ल्याखाली, बिर्ला धर्मशाळेसमोर, श्री रामजन्मभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ, 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र' तर्फे एक प्रवासी सेवा केंद्र उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत.
दर्शनाची वेळ १९ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मान्यवरांना १९ एप्रिल नंतर दर्शनासाठी येण्याती विनंती मंदिर न्यासने केली आहे. अयोध्या शहरात सुमारे शंभर मोठ्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून रामजन्मोत्सवाचे प्रसारण होणार आहे. त्याचबरोबर ट्रस्टच्या सोशल मीडिया अकाउंटवरही याचे थेट प्रक्षेपण दिसेल. दर्शनादरम्यान होणारा त्रास आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी भाविकांना मोबाईल फोन, मौल्यवान वस्तू न आणण्याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.