धम्मउपासक अनुराधा रोकडे आई

15 Apr 2024 22:59:23

rokde
 
न्यायासाठी, सत्यासाठी संघर्ष-समन्वय करायचा; मात्र बुद्धांंनी दिलेल्या करूणेचा, मंगल मैत्रीचा मार्ग सोडायचा नाही, असे जगणार्‍या अनुराधा रोकडे. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेणारा हा लेख....
 
१९६५ सालची गोष्ट असावी. आकाशात विमान जाताना दिसले आणि साधारण दहा वर्षांच्या असलेल्या अनुराधा यांनी त्यांच्या काकांना विचारले, “मला त्या विमानात जायचे आहे.” त्यावर काका म्हणाले, “येडी का काय? इतक्या उंच उडणार्‍या विमानामध्ये चढता तर आले पाहिजे.” त्यावेळी अनुराधा यांना वाटले खरंच, आपण काय इतकी उंच उडी मारू शकत नाही. पण, अनुराधांच्या भाळी कर्तृत्वाचे संकेत होते. त्याच अनुराधा बुद्ध धम्माच्या उपासिका आणि अभ्यासक म्हणून चीन, जपान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, थायलंड या देशांमध्ये गेल्या आणि त्यांनी स्वतःसोबत धम्मउपासक महिलांनाही नेले. अनुराधा रोकडे आज ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’ या धम्म संस्थच्या विश्वस्त आणि खजिनदार आहेत. तसेच, ‘उत्क्रांती स्त्री मंच’ या संस्थेच्या संस्थापक- अध्यक्षही आहेत. दिव्यांगांसाठी सर्वतोपरी कार्य करणार्‍या अपंग सेवा संस्थेच्या सचिव आहेत, तर मागासवर्गीय बालकांच्या शिक्षण आणि विकासासाठी स्थापन झालेल्या विश्वदीप वसतिगृह संस्थेच्या समन्वयक आहेत. धम्मकार्यासाठी अनुराधा यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. मुंबईतील धम्मकार्य करणारी बहुतेक सगळीच मंडळे, संस्था आणि विहार यांच्याशी अनुराधा यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, तर अशा या अनुराधा रोकडे.
 
अहिल्यादेवी नगरमधील पारनेर गावच्या मांडवखुर्द गावच्या अनुराधा बागुल ते महाराष्ट्रातील धम्म चळवळीचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजिका आणि मुलबाळ, नातवंड आणि संपूर्ण समाजावर प्रेम करणारी एक मातृशक्ती अनुराधा रोकडे, हा त्यांचा प्रवास सोपा मुळीच नव्हता. एक स्त्री म्हणून वाट्याला आलेला संघर्ष त्यांच्याही वाट्याला आलाच. पण, अनुराधा यांनी या सगळ्या संघर्षावर मात केली. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतला, तर जाणवते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो तेजाचा, संघर्षाचा वारसा दिला तो वारसा अनुराधा जगल्या. अनुराधा यांचे पिता अंबुलाल बागुल आणि आई सावित्री हे दाम्पत्य मूळचे पारनेरचे. त्यांना चार अपत्य. त्यापैकी एक अनुराधा. अंबुलाल हे मुंबईत नोकरी करायचे. अंबुलाल आणि सावित्रीबाई देाघेही आंबेडकरी चळवळीतले खंदे कार्यकर्ते. अंबुलाल यांचा दादासाहेब रूपवते यांच्याशी घनिष्ठ संपर्क. मुलांनी दररोज बुद्धवंदना केलीच पाहिजे, असा अंबुलाल यांचा कटाक्ष. बागुल दाम्पत्य अनुराधाला सांगत, ”बाय, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जगायलाच पाहिजे. आपण जिथे कुठे असू तिथे स्वाभिमानाने चारित्र्य जपत अन्यायाविरोधात उभे राहायलाच पाहिजे,” अशा संस्कारात अनुराधा यांचे लहानपण गेले.असो. पुढे दादासाहेब रूपवते यांच्या मध्यस्थीने समाजातील श्रीमंत उद्योगपती उमाकांत रोकडे आणि अनुराधा यांचा विवाह झाला. सासर-माहेर जपत अनुराधांचे जगणे सुरू झाले.
 
उमाकांत अनेक कार्यक्रमांना आर्थिक साहाय्य करत असत. त्यांची प्रतिनिधी म्हणून ते अनुराधा यांना कार्यक्रमाला पाठवू लागले. या कार्यक्रमामध्ये अतिथी म्हणून उपस्थित राहिल्यानंतर अनुराधा यांना समाजाचे त्यातही आयाबायांचे प्रश्न जवळून अनुभवायला मिळाले. गरिबी, अज्ञान, भोळेपणा यामुळे लोक त्रस्त होते. समाजातील शोषित, वंचित बांधव एकत्र यायला हवेत, असे अनुराधा यांना वाटले. पण, ते एकत्र कसे येतील? तर त्यांना असे वाटले की, धम्मच माणसाला जगण्याची ताकद देतो. धम्माच्या माध्यमातून समाजाने एकत्रित यायला हवे. त्यावेळी चेंबूर, टिळकनगर येथे छोटे बुद्धविहार होते. इथे महाथेरो भन्ते डॉ. राहुल बोधी धम्मसाधना, धम्मप्रचार प्रसाराचे काम करत. त्यांचे धम्मकार्य आणि धम्मज्ञान पाहून या विहारात समाज मोठ्या प्रमाणात एकत्र होत असे. धम्मकार्यासाठी अनुराधाही विहारात जात. विहारात येणार्‍या बांधवांच्या समस्या ऐकून अनुराधा यांनी ठरवले की, आपण समाजासाठी काम करायचे. त्यासाठी शक्य होईल तिथे धम्माचे सकारात्मक समुपदेशन करायचे. गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करायचे आणि व्यसनाधीन व्यक्तींना धम्माच्या मार्गावर आणून व्यसनापासून मुक्त करायचे. भन्ते राहुल बोधी यांच्या आशीर्वाद-मार्गदर्शनाने आणि सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी हे काम सुरू केले. यात अडथळे आले. मात्र, तथागत बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहत अनुराधा यांनी सर्व अडथळ्यांवर मात केली.
 
पुढे समाजासाठी सढळ हस्ते मदत करता यावी, म्हणून त्यांनी ‘अनुराधा कॅटरर्स’ सुरू केले. पुढे ‘अनुराधा एंटरप्रायजेस’ ही प्रकाशन कंपनी सुरू केली. या सगळ्या काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते आणि आहेत. ‘भिक्खू संघाज युनायटेड बुद्धिस्ट मिशन’ संस्थेच्या माध्यमातून आज वयाच्या सत्तराव्या वर्षीही अनुराधा रोकडे सक्रिय आहेत. समाजकार्याचा, धम्मसहभागितेचा हा वारसा अनुराधा यांनी मुलांनाही दिला. त्यांच्या धम्मकार्यात त्यांची दोन्ही मुलं आणि सुनाही मनापासून सहभागी होतात. विषय महिलांच्या स्वयंरोजगाराचा असो की दिव्यांगांच्या जगण्याचा असो की, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा असो की व्यसनाधीन व्यक्तींच्या नरक झालेल्या आयुष्याचा असो, अनुराधा रोकडे आईच्या मायेने या सगळ्यांना सहकार्य करतात. धम्माने दिलेला मार्ग सांगतात अणि या सगळ्यांमध्ये ‘अत्तदीप भव’चा मंत्र जागवतात. हजारो लोक आज अनुराधा यांना ‘अनुराधा आई’ असे उगीच म्हणत नाहीत. अनुराधा म्हणतात, ”तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत धम्मकार्य करायचे आहे.”
९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0