पाकिस्तानचा नतद्रष्टपणा

14 Apr 2024 22:39:26
pakistan
देश पुरता रसातळाला गेला, तरी पाकिस्तानची हेकडी कायम आहे. स्वतःच्या गुर्मीत राहणार्या पाकला द्वेषाच्या राजकारणाशिवाय दुसरे काही सुचेल तरी कसे म्हणा? स्वतंत्र मुस्लीम राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली खरी, पण तरीही त्याठिकाणी हिंदू संस्कृतीच होती. फाळणीनंतर बदलत्या स्थितीमुळे पाकिस्तानमध्ये हिंदूंची गळचेपी सुरू झाली. आता तर पाकिस्तानमध्ये हिंदू फार कमी प्रमाणात राहिले आहेत. सर्वधर्मसमभाव हा शब्द पाकिस्तानात तसा हास्याचाच विषय म्हणावा लागेल.
 
पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, नव्हे, तर ती कमी कशी होईल, यासाठी थेट पाकिस्तानी सत्ताधार्यांकडूनही प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंची संख्या घटण्याबरोबरच तेथील हिंदू अस्मितेची प्रतीकेही जमीनदोस्त करण्याचा सपाटा सुरू आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू आणि त्यासंबंधी कोणतीही गोष्ट शिल्लक राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी पाकिस्तान सरकारदेखील पुढाकार घेत आहे. नुकतेच पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील एक हिंदू मंदिर तोडण्यात आले. हे मंदिर तोडून आता त्या जागेवर मोठा मॉल उभा केला जाणार आहे. मागील सात दशकांपासून बंद असलेले हे हिंदू मंदिर तोडण्यासाठी पाक सरकारनेच परवानगी दिली होती.
 
खैबर पख्तूनख्वामध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ लंडी कोटल शहरात हे हिंदू मंदिर होते. शहरातील बाजारात असलेले हे मंदिर १९४७ पासून निर्मनुष्य होते. यावरूनच अंदाज येतो की, इथे हिंदूंच्या मनात किती दहशत पसरवली असेल की, ते मंदिरात पूजा-अर्चना करायलाही जाऊ शकत नव्हते. नुकतेच युएईमध्ये भव्य हिंदू मंदिर उभे राहिले. ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जगभरात ठिकठिकाणी हिंदू मंदिरे उभी राहत असताना नतद्रष्ट पाकला मंदिर उभे करणे, तर दूरच पण आहे ती हिंदू मंदिरे सांभाळणेही जड झाले आहे.
 
१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर मोठ्या संख्येने हिंदू भारतात वास्तव्यास आले होते. फार अल्प प्रमाणात हिंदू या ठिकाणी राहिले. फाळणीनंतर हे मंदिर दर्शनासाठी, पूजेसाठी बंद करण्यात आले होते. १९९२ साली काही कट्टरपंथीयांनी मंदिरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मंदिराचा एक भाग तोडण्यात आला. अशा स्थितीमध्ये पाकिस्तान सरकारने मंदिराकडे दुर्लक्ष केले. मंदिराच्या संरक्षणासाठी व पुनर्निर्माणासाठी कोणतीही पावले उचलली नाही आणि आता तर हे अतिप्राचीन हिंदू मंदिर तोडण्याची परवानगी पाकिस्तान सरकारने दिली आहे.
 
या मंदिराच्या जागेवर मोठा मॉल उभारण्यास काहीही हरकत नाही, अशी भूमिका पाक सरकारने घेतली आहे. या ठिकाणी हिंदू मंदिर होते हे मान्य करण्यासही पाक सरकार तयार नाही. दरम्यान, मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी वक्फ बोर्डाची आहे. मात्र, याठिकाणी या बोर्डाचे ना कार्यालय आहे ना कुठले कर्मचारी. पाकिस्तान हिंदू मॅनेजमेंट कमिटीचे हारून सरब्दियाल यांनी सांगितले की, मंदिर संरक्षणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची होती. मात्र, ही जबाबदारी पार पाडण्यात आली नाही. जर असेच होत राहिले, तर सगळी हिंदू मंदिरे जमीनदोस्त होतील.
 
चीनच्या कर्जाच्या बोझ्याखाली पाक दबत चालला आहे. माजी पंतप्रधान इमरान खान सध्या तुरुंगात आहे. पाकिस्तानी सैन्याचा सरकारमधील हस्तक्षेप वाढतोय. जागतिक स्तरावरदेखील नाचक्की होण्याशिवाय दुसरे काहीही हाती लागतं नाहीये. त्यातच भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवात हिंदू मंदिर पाडून पाक सरकार मिठाचा खडा तर टाकत नाही ना असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. इमरान खान सध्या तुरुंगात असून त्यांच्या समर्थकांनी अपक्ष उभे राहूनही ९० पेक्षा अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे भेदरलेल्या शरीफ बंधूंनी कडबोळ्याचे सरकार स्थापन केले. पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचार ही काही नवी गोष्ट नाही. फाळणी झाल्यापासूनच पाकिस्तानमध्ये हिंदू भीतीच्या सावटाखाली जगत आहे. त्यामुळेच मोदी सरकारने आणलेल्या ‘सीएए’ कायद्याचे पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित हिंदूंनी स्वागत केले आहे.
 
 
७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0