दोडामार्ग - तिलारी खोऱ्यात हत्तीच्या पिल्लाचा जन्म; कळपातील हत्तींची संख्या झाली...

13 Apr 2024 00:47:16
sindhudurga elephant
फाईल छायाचित्र



मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या पिल्लाचा जन्म झाला आहे (sindhudurg elephant). याठिकाणी अधिवास करणाऱ्या हत्तीच्या मादीने गुरुवारी दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी पिल्लाला जन्म दिला (sindhudurg elephant). त्यामुळे तिलारी खोऱ्यात अधिवास करणाऱ्या हत्तींच्या संख्या सहा झाली आहे. (sindhudurg elephant)
गेल्या दोन दशकांपासून दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात मानव-हत्ती संघर्ष सुरू आहे. हत्तींकडून होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. अशातच तिलारीच्या खोऱ्यात हत्तीच्या नव्या पिल्लाचा जन्म झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून तिलारी खोऱ्यात हत्तींचा कळप वावरत आहे. २०२० मध्ये या भागात वावरणाऱ्या कळपात टस्कर (बाहुबली), मादी आणि दोन पिल्लांचा समावेश होता. त्यानंतर २०२२ साली कळपात एक पिल्लू वाढून पाच हत्तींचे दर्शन होऊ लागले. काही महिन्यांपासून मादी हत्ती ही दोन पिल्लांसह अज्ञातवासात होती. टस्कर हा त्याच्या एका पिल्लासह गावांमध्ये फिरत होता. मात्र, गुरुवारी रात्री मोर्ले गावात कळप एकत्रित झाला आणि त्यामधील मादीने पिल्लाला जन्म दिल्याची माहिती स्थानिक रहिवासी उदय सातर्डेकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. गुरुवारी सायंकाळी गावातील झुडपांमध्ये बसून मादी जोरजोरात ओरडत होती, शुक्रवारी सायंकाळी आम्हाला तिच्यासोबत नवे पिल्लू दिसल्याचे सातर्डेकर यांनी सांगितले. पिल्लाच्या जन्मापासून बाहुबली नामक कळपातील तस्कर अधिक आक्रमक झाल्याचे निरीक्षण सातर्डेकर यांनी नोंदवले. यामुळे तिलारी खोऱ्यातील हत्तींची संख्या सहा झाली असून चंदगड तालुक्यात गणेश नामक टस्कर वावरत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील मानव-हत्ती संघर्षाची सुरुवात कर्नाटकातील हत्तींचे कळप विलग होण्याच्या प्रक्रियेतून झाली. २००२ साली कर्नाटकातील सात हत्तींचा कळप हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पोहोचला. नवीन समृद्ध अधिवासाच्या शोधार्थ कर्नाटकातून मार्गस्थ झालेले हे गजराज कोल्हापूर जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या तिलोत्तमा नदीच्या कुशीत विसावले. तिलोत्तमा नदी म्हणजे तिलारी नदी. महाराष्ट्राचे ॲमेझॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारीच्या जैवसमृद्ध अशा खोऱ्यात हे हत्ती विस्थापित झाले. पुढील वर्षभर या कळपाच्या हालचाली दोडामार्गपुरत्याच मर्यादित होत्या. याच दरम्यान २००४ साली कोल्हापूरमध्ये देखील आठ हत्ती दाखल झाले. बघता बघता पुढच्या काळात दोडामार्ग तालुक्यातील हत्तींची संख्या २५ झाली. वन विभागाने त्यामधील १६ हत्तींना पुन्हा कर्नाटकात पिटाळून लावले. त्यांच्या येण्याच्या वाटा चर खोदून बंद केल्या. मात्र, अतिशय बुद्धिमान असलेल्या या प्राण्याचे सिंधुदुर्गातील मार्गक्रमण काही थांबले नाही. २००५ साली खऱ्या अर्थाने हत्ती हे सिंधुदुर्गवासी झाले. विसावलेल्या हत्तींवर तिलारी प्रकल्पाच्या विकासकामाची कुऱ्हाड कोसळली. तिलारी खोऱ्यातील नैसर्गिक जंगल, अधिवास आणि देवराया नष्ट झाल्या. यातूनच मानव-हत्ती संघर्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
Powered By Sangraha 9.0