‘शिका आणि संघटित व्हा’ असा संदेश संपूर्ण जगाला देणारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना लोकांसमोर मांडणारा, ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा खास संवाद...
निर्माते सुनील शेळके यांनी आजच्या तरुणाईपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचणे फार गरजेचे असल्याचे मत दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.ते पुढे बोलताना म्हणाले की, “महापुरुषांवर आधारित चित्रपट मुळात फार कमी येतात आणि जरी आले तरी माहितीपटाच्या स्वरुपात ते प्रेक्षकांसमोर सादर केले जातात. त्यामुळे बर्याचदा प्रेक्षकांचा असा समज होतो की, शाळेत पाठ्यपुस्तकात जे वाचलं किंवा थोरामोठ्यांकडून जो इतिहास ऐकला, त्यापेक्षा वेगळं काय चित्रपटात दाखवलं असणार? म्हणून जरी चित्रपट तयार केले गेले, तरी माहितीपटाकडे प्रेक्षकांचा अधिक कल दिसून येतो आणि परिणामी चित्रपटांकडे दुर्लक्ष होतं. खरं तर आपल्या जीवनातील ‘रिअल हिरो’ असणारे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट येत नाही, ही शोकांतिका आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘सत्यशोधक’ या क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मितीदेखील सुनील शेळके यांनी केली होती. भविष्यात आपली निर्मिती असलेले कोणते चित्रपट भेटीला येत आहेत, असे विचारले असता शेळके म्हणाले की, “मुळात मी चित्रपट किंवा मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती नाही. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कथेमुळेच मी चित्रपटसृष्टीकडे वळलो. त्यामुळे भविष्यात मी जे चित्रपट करेन, ते केवळ महापुरुषांच्या आयुष्यावर आधारित असतील आणि आजच्या आणि भविष्यातील पिढीला आपल्या महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल माहिती चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवणे, हे माझे ध्येय असेल,” अशी ग्वाही सुनील शेळके यांनी यावेळी दिली.
दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले. त्यांची महापरिनिर्वाण यात्रा कॅमेर्यात कैद करणार्या नामदेव व्हटकर यांच्यावर आधारित ’महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे कथानक आहे. त्याविषयी शेळके म्हणाले की, ”या चित्रपटात बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण यात्रा दाखवली आहे; तसाच व्हटकरांचा प्रवास आणि संघर्ष यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.”
शैलेंद्र भागडे दिग्दर्शित आणि सुनील शेळके निर्मित ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटात नामदेव व्हटकर यांच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक दिसणार आहे. दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. ”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्त्वे फार महत्त्वाची असून, त्यांचे पालन आजच्या आणि भविष्यातील तरूण पिढीने केल्यास, एक नवा भारत देश भविष्यात पाहायला मिळेल,” असे मत सुनील शेळके यांनी व्यक्त केले.